Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१४ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
नागपूर इथं सुरू विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर
काल चर्चा सुरु झाली. राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा
अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून
काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना टिका
केली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
हस्ते आज उर्जा पुरस्कार प्रदाण करण्यात येणार आहेत. नवी दिल्ली इथं उर्जा संवर्धन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या पुरस्कारांचं
वितरण केलं जाणार आहे.
****
वंदे भारत रेल्वेगाड्यांमध्ये स्थानिक
खाद्यपदार्थ उपलब्ध होतील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी
वैष्णव यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत काल ते बोलत
होते. प्रवाशांना त्या विशिष्ट प्रदेशांची संस्कृती आणि स्वाद प्रतिबिंबित होईल, असे अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, असा या मागचा उद्देश आहे. भविष्यात
हळूहळू इतर सर्व रेल्वेगाड्यांमध्ये सुद्धा ही सोय उपलब्ध करून दिली जाईल. बनावट ओळखपत्रांचा
वापर करून रेल्वे तिकिटे आरक्षित करणाऱ्यांविरुद्ध भारतीय रेल्वेने
केलेल्या कारवाईचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असेही केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केलं आहे. वापरकर्त्यांची ओळख पडताळण्यासाठी आणि बनावट ओळखपत्रे
शोधून काढणारी काटेकोर व्यवस्था लागू केल्यानंतर, आता आयआरसीटीसी संकेतस्थळावर दररोज सुमारे ५ हजार नवीन
वापरकर्ता आयडी जोडले जात आहेत. तिकीट प्रणालीमध्ये सर्व प्रवासी खऱ्या ओळखपत्राच्या आधारे सहजपणे तिकिटे आरक्षित करू शकतील, अशा पातळीवर सुधारणा करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात
आले आहेत.
****
"आपले नाशिक - हरित नाशिक" या
संकल्पनेवर आधारित "हरित नाशिक" मोहिमेचा उद्या १५ तारखेला शुभारंभ
करण्यात येणार आहे. मखमलाबाद परिसरातील
कॅनॉल लगतच्या नाशिक महानगरपालिकेच्या हरित पट्ट्यातील सुमारे अडीच एकर जागेवर तसेच
गोदावरीच्या किनारी सुयोजित प्रकल्पालगत एकत्रितपणे सुमारे १ हजार विविध देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात
येणार आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच
विविध मान्यवरांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका
प्रशासनाद्वारे देण्यात आली. मंत्री महाजन यांच्या पुढाकारातून टप्प्याटप्प्यातून एकूण
१५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार
असून २५ पेक्षा अधिक रोपट्यांची एखाद्या संस्था किंवा व्यक्तीमार्फत त्यांच्या उपलब्ध
जागेनुसार मागणी करण्यात आल्यास त्यांना प्रशासनामार्फत ती उपलब्ध करून देण्यात येणार
आहेत.
****
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं
आयोजित पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन काल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर
करण्यात आलं. यावेळी केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील
उपस्थित होते. हा महोत्सव येत्या 21 तारखेपर्यंत सुरु राहणार
आहे. या महोत्सवात पुस्तक प्रकाशकांनी आठशे दालनं स्थापन केली आहेत.
****
बीड मुख्यालयात काल आयोजित लोकअदालतमध्ये
बीड न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी ५४३ प्रकरणं निकालात काढण्यात आली. या लोकादालत
मध्ये एकूण ८ हजार २६५ प्रकरणं ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादनाची प्रकरणे आदी प्रकरणांचा
समावेश होता. या व्यतिरिक्त दाखलपुर्व प्रकरणांमध्ये एकूण ३३ हजार २२१ प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार २६१
प्रकरणं निकाली निघाली, त्यामुळे एकूण १ हजार
९०३ प्रकरणं काल बीड लोकअदालतीत निकाली निघाली आहेत.
****
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर
शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय लोक अदालतीला थकबाकीदार मालमत्ताधारकांचा काल उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला. यात ३००० थकबाकीदार मालमत्ता धारकाना नोटीस बजावण्यात आली होती त्यापैकी
८०० थकबाकीदार यांनी कर भरला आहे. लातूर महापालिकेनं जाहीर केलेल्या सात टक्के शास्ती
माफी योजनेस एक दिवसाची म्हणजे आज १४ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या
टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाला इथं खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या
या मालिकेत दोन्ही संघ १-१ सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
स्क्वॅश विश्वचषक स्पर्धेमध्ये आज
भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. चेन्नई इथं ही स्पर्धा सुरू आहे.
****
राज्याच्या अनेक भागांमध्ये थंडीची
हुडहुडी भरलेली आहे. राज्यात काल सर्वात कमी सात अंश सेल्सियस तापमान जळगाव इथं नोंदवलं
गेलं. त्या खालोखाल अहिल्यानगर इथं साडे सात, पुणे तसंच नाशिक इथं साडे आठ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक
सात दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आज हवामान सूर्यप्रकाशयुक्त कोरडं राहण्याचा
अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment