Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 15
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
दिल्लीत काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी राष्ट्रीय
लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात केली. यावरुन झालेल्या गदारोळामुळे
लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज बाधित झालं.
लोकसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हा मुद्दा उपस्थित
केला. काँग्रेस पक्षानं या रॅलीत पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध करत
ते म्हणाले,
बाईट – किरेन रिजिजू
यानंतरही सभागृहात दोन्ही बाजुच्या सदस्यांनी घोषणाबाजी
करण्यास सुरुवात केल्यानं सदनाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत
स्थगित झालं.
तत्पूर्वी,सभागृहानं माजी सदस्य सुभाष अहुजा, प्राध्यापक सलाहुद्दीन आणि बाळकृष्ण चौहान यांना श्रद्धांजली
वाहिली.
राज्यसभेतही आज कामकाज सुरु झाल्यावर भाजप नेते जे.पी.
नड्डा यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया
गांधी यांनी माफी मागावी,अशी मागणी केली. अशा प्रकारच्या वक्तव्यातून विरोधी पक्षाची विचारसरणी आणि मानसिकता
दिसून येते असं नड्डा म्हणाले.यावरुन झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही १२
वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी आज जॉर्डनला
रवाना झाले. अम्मान इथं ते जॉर्डनचे राजा अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसेन यांच्यासोबत
द्विपक्षीय आणि शिष्टमंडळस्तरीय चर्चा करणार असून, भारत–जॉर्डन बिझनेस फोरमला संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून, ऐतिहासिक पेट्रा शहरालाही भेट देण्याची शक्यता आहे. भारत–जॉर्डन
राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्षानिमित्त ही भेट होत असून, गेल्या ३७ वर्षांत भारतीय पंतप्रधानांची ही पहिली पूर्ण
द्विपक्षीय भेट आहे. व्यापार, संरक्षण, दहशतवादविरोधी सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीतील दृढ संबंधांना
या दौऱ्यामुळे नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
जॉर्डनचा दौरा आटोपून पंतप्रधान १६ आणि १७ डिसेंबर रोजी
इथियोपियाला भेट देतील, त्यानंतर १७ आणि १८ तारखेला ते ओमानला जाणार आहेत.
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त
आज त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. सरदार पटेल यांची ७५ वी पुण्यतिथी
ही स्वावलंबी भारतासाठी प्रेरणा मिळवण्याचा एक विशेष प्रसंग आहे. त्यांनी आपल्या देशवासीयांमध्ये
निर्माण केलेली राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित भारतासाठी उर्जेचा स्रोत आहे. राष्ट्र
उभारणीतील त्यांची अद्वितीय भूमिका मजबूत आणि शक्तिशाली भारतासाठी मार्गदर्शक ठरत राहील,असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि गृहमंत्री अमित शहा
यांनीही सरदार पटेलांना आदरांजली अर्पण केली.
****
पहिला स्क्वॅश विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदी
यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. यामुळे भारताचं जागतिक क्रीडा स्पर्धांमधलं
वर्चस्व दिसून येतं तसंच या खेळाची लोकप्रियता वाढून खेळाडूंना प्रेरणा मिळेल,असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील भारतीय स्क्वॅश
संघाचं केलं अभिनंदन. या संघानं देशासाठी एक गौरवशाली इतिहास रचला असून, त्यांचं क्रीडा कौशल्य नवीन प्रतिभांसाठी प्रेरणा ठरेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
राज कुमार गोयल यांनी आज मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ
घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात गोयल यांना गापनियतेची शपथ
दिली. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज त्याच्या GOAT इंडिया दौर्याच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी नवी दिल्लीत
पोहोचेल. अरुण जेटली मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी मेस्सी तीन युवा ट्रॉफी
जिंकणाऱ्या मिनर्वा अकादमीच्या संघांचा सत्कार
करणार आहे, तसंच काही मान्यवर खेळाडू फुटबॉलचा
सामना देखील खेळणार आहेत.
****
भारतीय रेल्वे संपूर्ण ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण
पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. २५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९९ टक्क्यांहून
अधिक विद्युतीकरण पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. २०१९ ते २०२५
दरम्यान ३३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गाचं विद्युतीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीत
विद्युतीकरण झालेलं एकूण अंतर जर्मनीच्या संपूर्ण नेटवर्कच्या अंतराइतकं असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment