Monday, 15 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातील सर्व महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर-आचारसंहिता लागू

·      अपुऱ्या तयारीने निवडणुका घेणं अयोग्य-शिवसेना उबाठा पक्षाची टीका

·      पंतप्रधानांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी संसदेत गदारोळ

आणि

·      देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भाड्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण

****

राज्यातील सर्व २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. या घोषणेसोबतच सर्व महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली. सर्व महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मजमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले -

बाईट - राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

२३ ते ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. तर दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. तीन जानेवारीला चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एकूण २ हजार ८६९ जागांसाठी निवडणूक होईल.

जालना तसंच इचलकरंजी वगळता, उर्वरित सर्वच महापालिकांचा कार्यकाळ संपलेला आहे. मुंबई महानगरपालिकेत एक सदस्यीय प्रभाग रचना तर इतर महापालिकांमध्ये बहु सदस्यीय प्रभाग रचना आहे. जितके प्रभाग सदस्य मतदारांना तितकं मतदान करावं लागणार आहे. ही मतदान प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे होणार आहे. तीन कोटी ४८ लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत मतदान करतील, असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

****

दरम्यान, मुंबई महापालिकेची मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची घाई का केली, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विचारला आहे. याबाबतचं निवेदन शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाला सादर केलं आहे. अपुऱ्या आणि त्रुटीयुक्त तयारीने निवडणुका घेणं, हे कायदेशीर तसंच नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं, शिवसेनेनं या पत्रात म्हटलं आहे.

****

जालना शहर महानगरपालिकेची अंतिम मतदार यादी आज प्रसिध्द करण्यात आली. या यादीमध्ये १६ प्रभागात मिळून दोन लाख ४५ हजार ९२९ मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या एक लाख २८ हजार ८९४, महिला मतदारांची संख्या एक लाख १७ हजार १, तर इतर ३४ मतदार आहेत.

****

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने हरीत कुंभ अंतर्गत वृक्षारोपण मेाहिमेला आज सुरूवात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत नाशिक परिसरात १५ हजार रोपे लावून वनराई फुलवण्यात येणार आहे. यासाठी हैदराबाद इथून वाढलेली झाडेच आणण्यात आली असून या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. दरम्यान नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या निमित्ताने हेाणाऱ्या अमृत योजनेंतर्गत मलनि:सारण व्यवस्था विकासित करण्यासाठी २२७ कोटी रूपयांची कामे तसेच नाशिक म्युनिसिपल बाँड अंतर्गत मलनि:सारण व्यवस्था विकसित करण्याचा २२५ कोटी रूपयांचा प्रकल्प शहरातील ७ रस्ते व २ पूल विकसित करण्यासाठी २३७ कोटी रूपयांच्या कामांचा शुभारंभ देखील महाकवी कालीदास मंदिर येथे आज दुपारी झाला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

****

सांगली जिल्ह्यात इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकती तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अनावरण झालं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणात संभाजी महाराज तसंच अहिल्यादेवी यांच्या कार्याला उजाळा दिला. महापालिकेच्या वतीनं प्रातिनिधीक स्वरूपात झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं आणि महावितरणच्या पाच नवीन वीज उपकेंद्रांचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी करत, संसदेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आज गदारोळ केला. यामुळे लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर काल झालेल्या काँग्रेसच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.

 

दरम्यान, संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना रिजीजू यांनी या घटनेचा निषेध करत, दोन्ही सदनांच्या विरोधी सभागृहांमधे माफी मागावी अशी मागणी केली. ते म्हणाले -

बाईट – किरेन रिजीजू

राज्यसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाला. आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी सभागृह नेते जे पी नड्डा यांनी केली. त्यानंतर घोषणांचा गदारोळ वाढत गेल्यानं उपाध्यक्ष हरिवंश यानी सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर निवडणूक सुधारणांविषयी चर्चेला सुरुवात झाली.

 

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी भाजपाचे हे आरोप फेटाळून लावले. हे आरोप बिनबुडाचे असून सरकारला सभागृह चालवायची इच्छा नाही, असंही गांधी यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या -

बाईट – प्रियंका गांधी

****

अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचे शाश्वत वापर आणि संवर्धन विधेयक २०२५ – शांततासादर केलं. राष्ट्राच्या कल्याणासाठी अणुऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या सुरक्षित वापरासाठी नियम तयार करणे हे या विधेयकाचं उद्दीष्ट असल्याचं सिंह यांनी सांगितलं. मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधेयकाला विरोध केला.

****

राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांवरील चर्चा झाली. सदस्य वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी निवडणुकांचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करणं आणि मतदान केंद्रांचं प्रत्यक्ष चित्रीकरण अनिवार्य करण्याची मागणी केली.

****

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने भारतीय खाजगी हज यात्रेकरूंना हज २०२६ साठी १५ जानेवारी पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. यात्रेदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी आणि सर्व अनिवार्य प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्यासाठी मंत्रालयानं निर्देश दिले आहेत.

****

देशांतर्गत विमान प्रवास भाड्यांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमान प्रवास भाड्यांवरही केंद्र सरकार नियंत्रण ठेवणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. यासंदर्भात प्रवाशांना मंत्रालयाच्या पोर्टलवर तक्रार करता येणार असून, माहिती मिळाल्यानंतर, मंत्रालय संबंधित विमान कंपनीविरुद्ध कारवाई करेल, असं नायडू यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार पदवी परीक्षांना आजपासून सुरूवात झाली. २६८ परीक्षा केंद्रावर ८१ हजार विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक वरिष्ठ प्राध्यापक डॉ. बाबासाहेब डोळे यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली. नायलॉन मांजा वापरल्याने शहरात अनेक दुर्घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबवण्यात आला.

****

पंजाब पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना मुंबईतून अटक केली आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी हत्या, खंडणी आणि तत्सम गुन्ह्यांमध्ये हे दोघं सामील असल्याची माहिती पंजाब पोलीसांनी दिली.

****

राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णां तीन अंश सेल्सियस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल पुण्यात नऊ अंश, तर नाशिक इथं साडे नऊ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं साडे दहा अंश, धाराशिव इथं ११ पूर्णांक दोन तर छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment