Monday, 15 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नागपूर अधिवेशनाचा समारोप,१६ विधेयकं मंजूर,२३ फेब्रुवारीपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन

·      राज्याची अर्थव्यवस्था सक्षम आणि स्थिर, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन- मराठवाडा ‘ईव्ही कॅपिटल’ म्हणून विकसित होत असल्याची माहिती

·      अधिवेशनातून विदर्भ आणि राज्याच्या वाट्याला काहीही आलं नाही, विरोधकांची टीका

·      परभणी शहर आणि ग्रामीण तहसील कार्यालयाचा प्रस्ताव, तर जालना जिल्ह्यातल्या ७८ तांड्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा-महसूल विभागाची माहिती

आणि

·      राज्याच्या बहुतांश भागात पारा घसरला, पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या सात बैठकांमध्ये एकंदर ७२ तास ३५ मिनिटं काम झाल्याची माहिती विधानसभेचे राहुल नार्वेकर यांनी दिली. तर विधानपरिषदेच्या सात बैठकांमध्ये ४८ तास १६ मिनिटं कामकाज झालं, असं विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. या कालावधीत विधानसभेत एकंदर १८ विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली आणि त्यातली १६ मंजूर झाली, तर विधानपरिषदेत ४ विधेयकं संमत झाली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईत होणार आहे.

****

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातली सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधानसभेत काल अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचं त्यांनी नमूद केलं. सभागृहातल्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन रचनात्मक कार्यातून राज्याला वेगाने पुढे नेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

 

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आलेल्या विविध आव्हानांना सामोरं जात निर्णयक्षम आणि समन्वयातून कारभार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचा उल्लेख करताना ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री – व्हिजन डॉक्यूमेंट

 

मराठवाड्याच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, मराठवाडा ‘ईव्ही कॅपिटल’ म्हणून विकसित होत असल्याचं सांगितलं. विभागात टोयोटा, स्कोडा, एथर यांसारख्या मोठ्या ब्रँड्सची गुंतवणूक झाली असून, यातून एक लाख २७ हजार लोकांना रोजगार प्राप्त झाला असल्याचं ते म्हणाले. मराठवाडा विभाग लवकरच दुष्काळमुक्त करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री – मराठवाडा

****

विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं.

****

या अधिवेशनातून शेतकऱ्यांना आणि विदर्भातल्या जनतेला काहीही मिळालं नाही, अशी टीका विरोधी पक्षांतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.

धानाला आणि सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली मात्र सरकारने कार्यवाही केली नाही, तसचं अंमली पदार्थासंदर्भातही कारवाईची ठोस भूमिका घेतली नाही, अशी टीका काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते म्हणाले,

बाईट – विजय वडेट्टीवार

 

विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी कापूस खरेदीचे केंद्र वाढवण्याच्या केलेल्या मागणीवर निर्णय झाला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही, विरोधी पक्षाने राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले त्यावरही ठोस उत्तर मिळालं नाही, त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली.

****

परभणी शहर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. परभणी तहसील कार्यालयावर परभणी शहर आणि ग्रामीण भागातल्या जवळपास १०० हून अधिक गावांचा कार्यभार अस प्रशासन आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे दोन स्वंतत्र तहसील कार्यालयं स्थापन करण्यात यावेत, अशी मागणी, आमदार राजेश विटेकर यांनी केली होती.

****

जालना जिल्ह्यातल्या ७८ तांड्यांना आता स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्याचा निर्णयही बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे तांड्यावरील रहिवाशांना आता हक्काचं गाव आणि स्वतंत्र ओळख मिळणार आहे. काल नागपूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नेमणूक झाली आहे. भाजपाच्या संसदीय मंडळानं ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नितीन नबीन सध्या बिहार मंत्रिमंडळात मंत्री असून, ते जे पी नड्डा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार घेतील.

****

राज्यातल्या १३ वर्षांखालच्या फुटबॉल खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट महादेवा’ या योजनेचा प्रारंभ काल मुंबईत वानखेडे मैदानावर लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या हस्ते झाला. मेस्सी हा गोट इंडिया दौऱ्याच्या निमित्ताने काल मुंबई दौऱ्यावर आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता टायगर श्रॉफ, अजय देवगण यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

प्रोजेक्ट महादेवा’ अंतर्गत निवडलेल्या ६० खेळाडुंना पाच वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार असून, अव्वल खेळाडू नक्कीच फिफा विश्वचषक मध्ये खेळतील अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

स्क्वॅश विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारताने हाँगकाँगचा तीन – शून्य असा पराभव करत पहिल्यांदाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. चेन्नई इथं झालेल्या या स्पर्धेत जोशना चिनप्पा, अभय सिंग आणि अनाहत सिंगने आपापल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत हा विजय मिळवून दिला.

****

१९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला ९० धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४६ षटकं आणि एका चेंडूत २४० धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४१ षटकं आणि २ चेंडूत १५० धावात सर्वबाद झाला.

****

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धर्मशाला इथं झालेल्या तिसर्या टी–ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ११७ धावा केल्या. भारतीय संघानं हे लक्ष्य १६व्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत दोन – एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला चौथा सामना परवा बुधवारी लखनौ इथं होणार आहे.

****

जालना इथं मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि जालना एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित वारकरी संत साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. समारोप सत्रात बोलताना, अध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी, संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा व्हावी, महाराष्ट्रात संतपीठ कार्यान्वित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नाना महाराज पोखरीकर, सोनुने गुरूजी, डॉ.अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात हनुमान टेकडी परिसरातली सद्‌गुरू श्री निपट निरंजन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज यात्रा होत आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही कुस्तीचा आखाडा रंगणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा युवक विकास मंडळातर्फे आयोजित प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला कालपासून सुरु झाली. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी काल पहिलं पुष्प गुंफलं. मी आणि माझे साहित्य या विषयावर बोलताना त्यांनी, शिवाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रम प्रत्येकाने वाचला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

****

राज्यात विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. राज्यात काल सर्वात कमी आठ अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. पुणे आणि नाशिक इथइ सरासरी नऊ, तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि परभणी इथं सरासरी ११ अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली.

येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

****

No comments:

Post a Comment