Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 16
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज
सिंह चौहान यांनी आज लोकसभेत, विकसित भारत
रोजगार आणि आजीविका हमी अभियान – ग्रामीण म्हणजेच व्ही बी जी राम जी हे विधेयक सादर
केलं. हे विधेयक वीस वर्षे जुन्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
– मनरेगा ची जागा घेईल. यामध्ये जल-संबंधित कामांद्वारे जलसुरक्षा, मुख्य ग्रामीण
पायाभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि तीव्र हवामान बदलांचा सामना करण्यासाठी
विशेष कामांचा समावेश आहे. नवीन विधेयकाचा उद्देश मजुरांना अधिक हमीचे कामाचे दिवस, चांगलं वेतन, अधिक मजबूत
संरक्षण आणि अधिक पारदर्शक अंमलबजावणी यंत्रणा प्रदान करणं हा आहे.
दरम्यान, या विधेयकावर
बोलताना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी, हे विधेयक स्थायी समितीकडे
पाठवण्याची मागणी केली.
**
अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी लोकसभेत सबका बिमा सबकी रक्षा विधेयक, २०२५ सादर केलं. हे विधेयक
विमा कायदा १९३८, जीवन विमा महामंडळ कायदा १९५६ आणि विमा नियामक आणि विकास
प्राधिकरण कायदा १९९९ मध्ये आणखी सुधारणा करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
देशभरात आज विजय दिवस साजरा
केला जात आहे. १९७१ साली पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवत भारतानं आपलं निर्विवाद वर्चस्व
सिद्ध केलं. या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ १६ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय विजय दिवस
म्हणून साजरा केला जातो. १९७१ च्या युद्धानंतरच बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळालं. या
युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या शूरवीरांना
देश आज कृतज्ञ नमन करत आहे. त्यांचं शौर्य, त्याग आणि मातृभूमीप्रतीची
निष्ठा हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहे.
विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री
राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. संरक्षण
प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख
एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यावेळी उपस्थित
होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी विजय दिनानिमित्त भारत मातेच्या वीर पुत्रांना आदरांजली अर्पण केली. ऑपरेशन सिंदूरनं
सैन्याची आत्मनिर्भरता, सामरिक दृढता आणि आधुनिक युद्धशैलीचं प्रभावी दर्शन घडवल्याचं
त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
१९७१ च्या ऐतिहासिक विजयासाठी आपल्या शौर्य आणि बलिदानाने भारताला गौरव मिळवून देणाऱ्या
वीर जवानांना आदरांजली अर्पण केली. त्यांचं धैर्य, नि:स्वार्थ सेवा आणि पराक्रम
पिढ्यान्पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी युद्धात आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहिली.
१९७१ साली आजच्या दिवशी अदम्य शौर्य आणि अचूक रणनीतीच्या जोरावर भारतीय सुरक्षा दलांनी
पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं, अन्याय आणि
अत्याचाराविरोधात मानवतेचं रक्षण करणारा हा विजय भारतीय सेनेच्या अद्वितीय पराक्रमाचं
प्रतीक ठरल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
जॉर्डन दौऱ्यामुळे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण परिणाम
साधले गेले आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव डॉ. नीना मल्होत्रा
यांनी सांगितलं. या दौऱ्याविषयी त्यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. पंतप्रधान
मोदी यांनी येत्या पाच वर्षांत भारत-जॉर्डन द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून पाच अब्ज
अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडला. दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करारही
करण्यात आले. यामध्ये नवीकरणीय ऊर्जा, जलसंधारण आणि जलपुनर्भरण, डिजिटल सार्वजनिक
पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा समावेश आहे. या दौऱ्याचा एक महत्त्वाचा परिणाम
म्हणजे पर्यटन आणि सांस्कृतिक सहकार्याला चालना देण्यासाठी जॉर्डनमधील पेट्रा शहर आणि
महाराष्ट्रातल्या वेरूळ यांच्यात जुळे शहर करार अर्थात ट्विनिंग ॲग्रीमेंट करण्यात
आलं.
****
भारताच्या बेरोजगारी दरात
लक्षणीय घट झाली असून, नोव्हेंबर महिन्यात हा दर चार पूर्णांक सात टक्क्यांवर
आला असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. एप्रिलपासूनच्या कालावधीत हा बेरोजगारीचा
सर्वात कमी दर आहे. ही आकडेवारी देशातील रोजगार परिस्थिती सुधारत असल्याचं संकेत देत
असून, आर्थिक घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
****
राज्य शासनानं सर्व सरकारी, अनुदानित आणि
खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शिक्षेवर पूर्णपणे बंदी
घातली आहे. या संदर्भात काल नवीन ठराव जारी करण्यात आला. शिक्षक, मुख्याध्यापक
आणि तात्पुरत्या किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना
शिक्षा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या ठरावात शाब्दिक शिवीगाळ, टोमणे मारणं, आक्षेपार्ह
भाषेचा वापर करणं, विद्यार्थ्यांमध्ये मानसिक त्रास किंवा कनिष्ठता निर्माण
करणारं कोणतंही वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment