Wednesday, 17 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      निवडणूक अधिनियम १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

·      गड-किल्ले अतिक्रमणं मुक्त करण्याच्या तरतुदींच्या व्याप्तीत वाढ-राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश

·      शंभर गिगावॅट अणू ऊर्जेचं उद्दीष्ट असलेलें अणु ऊर्जा विधेयक लोकसभेत संमत

आणि

·      सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

****

निवडणूक अधिनियम १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली. १९६१ च्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमानुसार नामनिर्देशनपत्रे स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होतं. मात्र अशा प्रलंबित अपीलांमुळे निवडणूक प्रक्रिया कालबद्धरित्या घेणं शक्य होत नसल्याने, अपील करण्याची तरतूद वगळण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला.

****

संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणं रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आज झालेल्या या बैठकीत गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं काढण्याबाबतच्या तरतूदींची व्याप्ती वाढवण्यात आली असून, यामध्ये राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी स्थापन होणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये चार निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यात येईल. त्यासोबतच प्रत्येक जिल्हास्तरीय समितीमध्ये चार अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमण रोखणं तसंच काढून टाकण्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास निधीतून खर्च करता येणार आहे.

****

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलं.

****

पारंपरिक पद्धतीने पथकर वसुली पद्धतीऐवजी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली पुढल्या वर्षीपासून लागू केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. महामार्गावर वाहनांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि वाहतुकीचा वेळ कमी करण्यासाठी नवी प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

देशात सुमारे दोन हजार किलोमीटर रेल्वेमार्गावर कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच ही स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणाली सुरू करण्यात आली असून आतापर्यंत चार हजार किलोमीटर रेल्वेमार्गावर ही प्रणाली स्थापन करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात रेल्वेचं ९९ टक्के विद्युतीकरण झाल्याचं वैष्णव यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. देशभरात रेल्वेच्या २६ राज्यातल्या १४ विभागांचं पूर्णपणे विद्युतीकरण झाल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.

बाईट – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

****

अणु ऊर्जा विधेयक आज लोकसभेने संमत केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सदनात मांडलं. प्रस्तावित कायद्यामुळे २०४७ पर्यंत शंभर गिगावॅट अणू ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य साध्य होईल, असं सिंग यांनी सांगितलं. काँग्रेसने या विधेयकाला विरोध दर्शवला. या विधेयकात पुरवठादाराचं दायित्व ठरवलं नसल्यानं देशासाठी ही बाब हानीकारक असल्याचं, काँग्रेसचे मनिष तिवारी यांनी या चर्चेत नमूद केलं. भाजपचे अनुप धोत्रे, शिवसेनेचे धैर्यशील माने, शिवसेना उबाठाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, यांच्यासह अनेक सदस्यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला.

****

अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत आज काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधातल्या काळा पैसा वैध प्रकरणी आरोपपत्राची दखल घ्यायला, दिल्लीतल्या न्यायालयाने नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर, या खासदारांनी घोषणाबाजी करत सरकारने गांधी कुटुंबाची माफी मागावी, अशी मागणी केली.

****

सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मात्र शिक्षेच्या निर्णयाला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी कोकाटेंच्या वकीलांनी केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी परवा शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, याप्रकरणी आज नाशिक न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. कोकाटे रुग्णालयात असल्याचं सांगत त्यांच्या वकीलांनी सवलत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून कोकाटे यांनी मिळवलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना काल दोषी ठरवत, न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा कायम ठेवली.

कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी, तक्रारदाराचे वकील आशुतोष राठोड यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळालेली नसल्याने, कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय अद्याप झालेला नसल्याचं सांगितलं.

दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. कोकाटे यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही याचा निर्णय, अजित पवार घेतील, असंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध वाङ्गमयीन पुरस्कारांसाठी येत्या १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज पाठवण्याचं आवाहन परिषदेतर्फे करण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरात म्हणजेच एक जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेले काव्य तसंच कथा संग्रह, कादंबरी, नाटकं, या पुरस्कारासाठी पात्र आहेत. संबंधितांनी आपल्या साहित्यकृती छत्रपती संभाजीनगर इथल्या परिषदेच्या कार्यालयात पाठवाव्यात, असं यासंदर्भातील पत्रकात म्हटलं आहे.

****

अद्ययावत सुविधा देणारं महाराष्ट्रातलं पहिलं जेन झी टपाल कार्यालय मुंबईत सुरू होत आहे. आयआयटी मुंबई परिसरात उद्या या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून

मोफत वाय-फाय सुविधा, कॅफेटेरिया, वाचनालय, संगीत कक्ष या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या कार्यालयात पूर्णपणे डिजिटल, क्यूआर आधारित सेवा वितरण, आधार नोंदणी आणि आधार अद्ययावत करण्याची सोय देखील असेल. तसंच या टपाल कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. स्पीड पोस्ट सेवांवर दहा टक्के सवलत तर मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांना पाच टक्के सवलत दिली जाणार आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन यांनी उपस्थितांना ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. ऊर्जेचा विवेकी वापर, नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब आणि दैनंदिन जीवनात ऊर्जा बचतीचं महत्त्व, डॉ महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विशद केलं. येत्या २० डिसेंबरला या सप्ताहाची सांगता होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशाने या नियुक्त्या करण्यात आल्या. मनपा क्षेत्रातल्या २० प्रभागांसाठी १० निवडणूक निर्णय अधिकारी, तसंच आचारसंहिता कक्षासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात इतर सुविधांचाही प्रशासकांनी आज आढावा घेतला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मालेगाव इथली यात्रा उद्यापासून सुरु होत आहे. २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत कृषी प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच कृषी आणि पशुसंवर्धन विषयक स्‍पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

बीड इथं येत्या ३१ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान स्वर्गीय झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानतर्फे २५ वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या महोत्सवात वारकरी संप्रदायातील आठ कीर्तने तसेच संतांच्या जीवनावर आधारित संगीतमय चार संतचरित्र कथा सादर केल्या जाणार आहेत. शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अकरा दिवस सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत विविध सत्रांमध्ये कार्यक्रम होणार असून हा महोत्सव सर्वांसाठी खुला असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

****

भोपाळमध्ये सुरू असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरनं पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात जागतिक विक्रम मोडत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. या स्पर्धेत नीरज कुमारने रौप्यपदक मिळवलं, तर अखिल शेओरानला कांस्यपदक मिळाले. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे या स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहिला.

****

राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल अहिल्यानगर इथं साडे नऊ, नाशिक तसंच जळगाव इथं सुमारे साडे दहा अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं साडे अकरा तर परभणी इथं सुमारे १२ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment