Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१७ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी इथिओपियाच्या
दौऱ्यावर असून, एडिस अबाबा इथल्या इथिओपियन
नॅशनल पॅलेसमध्ये इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान विविध सामंजस्य करार
करण्यात आले. इथिओपियाच्या परराष्ट्र मंत्रालयात डेटा सेंटर स्थापन करणं, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांच्या प्रशिक्षणातील सहकार्यासाठी अंमलबजावणी व्यवस्था, आणि सीमाशुल्क बाबींमध्ये सहकार्य
आणि परस्पर प्रशासकीय सहाय्याबाबतच्या करारांचा यामध्ये समावेश आहे. पंतप्रधान मोदी
यांना काल इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपियानं सन्मानित
करण्यात आलं.
दरम्यान, तीन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात
आज पंतप्रधान ओमान मध्ये दाखल होणार आहे.
****
भारतीय चित्रपट होमबाउंड ला ९८व्या
ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर चित्रपटासाठी नामांकन मिळालं
आहे. नीरज घेवान यांच्या दिगदर्शनात तयार झालेला हा चित्रपट या श्रेणीत नामांकन मिळालेल्या
१५ चित्रपटांपैकी एक आहे. ऑस्कर पुरस्कारांची घोषणा १५ मार्च २०२६ रोजी होणार आहे.
****
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात काल
सात महिलांसह चौतीस नक्षलवाद्यांनी पोलीसांसमोर
आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर एकूण ८४ लाख रुपये बक्षीस होतं. आत्मसमर्पण केलेल्या
सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जाणार आहेत.
****
राज्याच्या प्रगतीला शिखरावर नेणाऱ्या
लोकहिताच्या योजनांना अधिक गती देण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
व्यक्त केली आहे. काल त्यांनी शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा सविस्तर
आढावा घेतला. यावेळी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत
एकूण ७६ मुद्दे सध्या प्रगतीपथावर असून, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी या सर्व विषयांची माहिती
मुख्यमंत्र्यांना सादर केली. नागरिककेंद्रित धोरणे, वेगवान निर्णय प्रक्रिया आणि पारदर्शक प्रशासन यावर भर
देत राज्य विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलली जात असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
****
ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार
असल्यानं भारतीय संस्कृती निरंतर आहे, ज्ञान, दृष्टी प्राप्त करण्यासाठी साहित्य
महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन बिहारचे
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केलं. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक
महोत्सवात पुणे लिट फेस्टचं उद्घाटन काल खान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. साहित्याचा
आस्वाद, सज्जनांचं सानिध्य हा अमृतानुभव असतो
असं आपल्या परंपरेत मानलं जातं, असं सांगत आरिफ मोहम्मद
खान यांनी साहित्य, संस्कृती आणि परंपरा
याबाबतचे विचार मांडले.
****
साताऱ्यात होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा प्रारंभ काल संमेलनाचे स्वागताध्यक्ष छत्रपती
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या संकेतस्थळाद्वारे संमेलनाचं
वेगळेपणही सर्वांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या १ ते ४ जानेवारी
दरम्यान साताऱ्यात हे संमेलन होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात एक कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सचा
लाभ मिळवण्यासाठी आणि मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी एका निर्दोष व्यक्तीचा जाळून
खून केल्या प्रकरणी मुख्य आरोपी गणेश चव्हाण याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी
सुनावली आहे. १३ डिसेंबरला ही घटना घडली होती. मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपीला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग इथून ताब्यात घेण्यात आलं.
****
जालना फर्स्ट सिटीझन फोरमच्या वतीने
आज शहरातल्या हॉटेल सिद्धांत फर्न इथं 'मंथन' या बौद्धिक सत्राचं आयोजन
करण्यात आलं आहे. प्रशासन, उद्योग, तज्ज्ञ आणि नागरिक यांच्यात संरचित
संवाद घडवून आणत जालन्याच्या भविष्यासाठी कृतीप्रधान उपाययोजना ठरवणं हा या उपक्रमाचा
मुख्य उद्देश आहे.
****
नांदेड शहरात कायदा आणि सुव्यवस्था
अबाधित राखण्याच्या दृष्टीने वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांमध्ये
सहभागी असलेल्या एकूण २३ गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रभावी कारवाई केली आहे. या
गुन्हेगारांवर शस्त्र अधिनियम, पोक्सो आदी गंभीर स्वरूपाचे
गुन्हे दाखल आहेत.
****
धुळे तालुक्यातल्या देवभाने इथं बनावट
मद्यनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलं. ऍग्रो
प्रोड्युसर कंपनीच्या जागेत हा कारखाना होता. या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सुमारे ३७
लाख ६० हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून, एका संशयीताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती
निर्माण करण्यासाठी मेरा युवा भारत, हिंदयान फाउंडेशन यांच्या
संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं
उद्घाटन सेलू कृषी बाजार समितीचे सभापती तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ संजय
रोडगे यांच्या हस्ते झालं.
****
No comments:
Post a Comment