Thursday, 18 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      व्ही बी जी राम जी विधेयक लोकसभेत मंजूर-महात्मा गांधीजींच्या आदर्शांना मूर्त रूप देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन

·      जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन-शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

·      सदनिका घोटाळ्यात शिक्षा झालेले माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

आणि

·      लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यात वेळ अमावस्या सणानिमित्त शेतकरी वर्गात उत्साह

****

विकसित भारत जी राम जी योजनेतून महात्मा गांधीजींच्या आदर्शांना मूर्त रूप देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. आज लोकसभेत या विधेयकावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात प्रचंड गदारोळ केला, या गदारोळातच चौहान यांनी या चर्चेला उत्तर दिलं. विकसित भारतासाठी विकसित गाव ही संकल्पना या विधेयकाचं उद्दीष्ट असल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले….

बाईट – केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान

पूर्वी या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकार देत असे, मात्र आता मोठ्या राज्यात ६० टक्के निधी केंद्राचा आणि उर्वरित ४० टक्के वाटा हा राज्यांचा असेल. ईशान्येकडच्या तसंच हिमालयातल्या राज्यांमध्ये केंद्राचा वाटा ९० टक्क्यांपर्यंत वाढेल, असं चौहान यांनी सांगितलं.

 

चौहान यांचं भाषण सुरू असतांना, विरोधकांनी या विधेयकाच्या प्रती फाडून सदनात भिरकावल्या. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आवाहन करूनही सदस्यांनी गदरोळ सुरू ठेवला. या गदारोळातच अध्यक्षांनी विधेयक मतदानासाठी पुकारलं, सदनानं ते मंजूर केलं. त्यानंतर अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चौहान यांनी विरोधकांनी सदनात केलेल्या गदारोळावर नाराजी व्यक्त करत, विरोधकांनी सदनाच्या मर्यादा पायदळी तुडवल्याची टीका केली. लोकशाहीत विरोध पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांची भूमिका महत्त्वाची असते, पण सध्याचा विरोधी पक्ष, हे महत्त्व आपल्या कृतीतून कमी करत असल्याचं निरीक्षणही चौहान यांनी नोंदवलं.

काँग्रेसच्या महासचिव खासदार प्रियंका गांधी यांनी या विधेयकाला विरोधाची भूमिका कायम असल्याचं सांगितलं. संसद परिसरात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी या विरोधामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या…

बाईट – खासदार प्रियंका गांधी

या विधेयकाच्या विरोधात विरोधी पक्ष सदस्यांनी आज सकाळी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. मनरेगाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते मकरद्वारापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढला.

****

अणु ऊर्जा विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा सुरू आहे.  नामनिर्देशित सदस्य सुधा मूर्ती, काँग्रेसचे जयराम रमेश, भाजपचे अजित गोपछडे, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत, आपली मतं मांडली.

****

जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांचं आज नोएडा इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते १०० वर्षांचे होते. गुजरातमधला स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्यासह देशभरात २०० हून अधिक भव्य पुतळ्यांची उभारणी करुन, सुतार यांनी भारताच्या शिल्पकलेला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. शिल्पकलेतील योगदानाबद्दल सुतार यांना १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारनेही नुकताच सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुतार यांना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सुतार यांच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुतार यांच्या निधनाने 'शिल्पकलेचा कोहिनूर' काळाच्या पडद्याआड गेला या शब्दांत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,  शिल्पकलेचा भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेला या शब्दांत आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

सुतार यांच्या पार्थिव देहावर शासकीत इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून सुतार यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी सुतार यांचं अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केलं.

****

काँग्रेस नेत्या आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. सोलापूर जिल्ह्यातले विधान सभेचे माजी आमदार दिलीप माने यांनीही आज भाजपात प्रवेश केला.

****

सदनिका घोटाळ्यात शिक्षा झालेले माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे सादर केला आहे. हा राजीनामा स्वीकारत असल्याचं पवार यांनी सामाजिक माध्यमावरून सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी कालच कोकाटे यांच्याकडची क्रीडा तसंच औकाफ ही खाती काढून उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सोपवली आहेत.

****

अल्पसंख्यांक दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांच्या हक्कांची प्रभावी अभिव्यक्ती व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनुसार दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजाचे हक्क, त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आलं. नागपूर तसंच भंडारा इथंही यानिमित्ताने विशेष कार्यक्रम घेण्यात आले.

****

शेतकऱ्यांचा उत्सव असलेला वेळ अमावस्येचा सण उद्या साजरा होणार आहे. मराठवाड्यात लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांसह बीड तसंच सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात येळवस नावानं प्रसिद्ध असलेल्या सणासाठी, स्नेही आणि आप्तजन आपापल्या शेतावर एकत्र येऊन उत्साहात हा सण साजरा करतात. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे लातूरचे प्रतिनिधी… 

बाईट – शशीकांत पाटील

****

नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. आज दुपारी देवस्वारी आणि पालखी पूजन करण्यात आलं. २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत कृषी प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच कृषी आणि पशुसंवर्धन विषयक स्‍पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांसाठी जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने प्‍लॅस्टिकमुक्‍त स्‍वच्‍छ यात्रेचा संकल्‍प राबवला जात असून, सुरक्षेसाठी चोख व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

****

परभणी जिल्ह्यात महिला आणि बाल विकास विभाग आणि बाल संरक्षण कक्षाने  गेल्या अडीच महिन्यात १५ बालविवाह रोखले. गेल्या ऑक्टोबरपासून १२ डिसेंबरपर्यंत बालविवाहाचे एकोणीस प्रकरणं हाताळल्याचं विभागाच्या अधिकारी मोनिका रंधवे यांनी सांगितलं.

****

अमली पदार्थयुक्त गोळ्यांची विक्री केल्या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं नांदेड जिल्ह्यातल्या १३ औषध दुकानांचे परवाने रद्द केले असून, ३२ दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत.  डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अमली पदार्थांचा अंश असलेल्या गोळ्यांची विक्री केल्याबद्दल ४८ दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर दिलेलं उत्तर असमाधानकारक आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली

****

राज्यात येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात टप्प्याटप्प्याने एक ते तीन अंशापर्यंत घट होईल, त्यापुढच्या दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

 

दरम्यान, राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल अहिल्यानगर इथं साडे आठ, नाशिक इथं नऊ पूर्णांक आठ तर पुण्यात सुमारे साडे दहा अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं दहा अंश, परभणी इथं दहा पूर्णांक आठ तर छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment