Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१९ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप
होत आहे. कामकाजात आजही अनेक महत्त्वाची विधेयकं विषयपत्रिकेत समाविष्ट आहेत. या अधिवेशनादरम्यान
वंदे मातरम्, निवडणूक सुधारणा, रोजगार, विमा क्षेत्रातील सुधारणा तसंच ऊर्जा
सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लोकसभा आणि राज्यसभेत सखोल चर्चा झाली. हिवाळी
अधिवेशनात एकूण पाच महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. यामध्ये विकसित भारत रोजगार
हमी उपजीविका विधेयक, शांती विधेयक, विमा सुधारणा विधेयक तसंच निरसन आणि
सुधारणा विधेयकांचा समावेश आहे.
****
कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघात प्रतिबंध आणि
नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम’ हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, याअंतर्गत देशभरातल्या सर्व जिल्हा
रुग्णालयांमध्ये कर्करोगावर उपचार दिले जातील, असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह
यांनी काल राज्यसभेत सांगितलं. येत्या तीन वर्षांत जिल्हा रुग्णालयांमध्ये ३७२ डे केअर
कॅन्सर सेंटर स्थापन करण्याची सरकारची योजना असून, त्यापैकी २०० सेंटर्स २०२५-२६ या आर्थिक वर्षात स्थापन
केली जातील, असं ते म्हणाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी काल लोकसभेत सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५ सादर केलं. भारतीय शेअर बाजाराशी
संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं, हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे.
****
खेलो इंडिया योजनेअंतर्गत एप्रिल
२०२४ पर्यंत देशभरातल्या खेलो इंडिया केंद्रांमध्ये २८ हजारापेक्षा जास्त खेळाडूंना
प्रशिक्षण देण्यात आल्याचं, क्रीडा आणि युवा व्यवहार
मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल राज्यसभेत सांगितलं. देशभरात ९९१ खेलो इंडिया केंद्र
कार्यरत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत
दुसऱ्या जागतिक पारंपारिक औषध शिखर परिषदेच्या समारोप समारंभात सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान या सभेला संबोधित करतील आणि आयुष क्षेत्रासाठी एक प्रमुख डिजिटल पोर्टल, माय आयुष इंटिग्रेटेड सर्व्हिसेस
पोर्टलसह अनेक महत्त्वाच्या आयुष उपक्रमांचा शुभारंभ करतील. आयुष उत्पादने आणि सेवांच्या
गुणवत्तेसाठी जागतिक बेंचमार्क म्हणून कल्पना केलेल्या आयुष मार्कचं अनावरण देखील पंतप्रधानांच्या
हस्ते यावेळी होणार आहे.
****
सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत
राज्यातल्या सिकलसेल आजाराचं प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांतल्या प्रत्येक नागरिकाची
सिकलसेल तपासणी होणं आवश्यक असल्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये, याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश
त्यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात १५ जानेवारी ते ३१ जानेवारी
२०२६ दरम्यान “सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा” राबवण्यात येणार असून, यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल
बोलत होते.
****
नाशिक इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात
साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत
स्थगिती दिली आहे. नाशिक इथं राहणाऱ्या एका नागरिकाने या संदर्भात दाखल केलेल्या जनहित
याचिकेवर काल उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. तपोवनातली ही झाडं ३० ते ४० वर्षं
जुनी असून नाशिकला प्राणवायूचा पुरवठा करतात. त्यामुळे साधुग्रामच्या निर्मितीसाठी
अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या चिकेत करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने सर्व प्रतिवादींना
नोटीस बजावली असून येत्या १४ जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.
****
उद्योजक, गुंतवणूकदार आणि नवउद्योजकांसाठी
‘मैत्री’ या एक खिडकी प्रणालीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे उद्योग
स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे परवाने, मंजुरी, ना-हरकती, सवलती तसंच तक्रार निवारणाच्या सुविधा
वेगवान, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने एकाच
ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यातल्या उद्योजकांनी या प्रणालाची
लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण
यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यात सध्या ६० हजार ४९९ सूक्ष्म, ३२९ लघु आणि २६ मध्यम असे एकूण ६०
हजार ८०४ उद्योग नोंदणीकृत आहेत.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठात ‘बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे संरक्षण आणि
शाश्वत वनस्पती आरोग्य’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा काल समारोप
झाला. कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी यावेळी विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरा, दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि शेतकरी-केंद्रित विस्तार
कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केलं. या परिसंवादामध्ये एकूण १३० शास्त्रज्ञ आणि
१९० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
****
चीनमध्ये सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ
वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि
चिराग शेट्टी या जोडीने उपांन्त्य फेरीत प्रवेश केला
****
No comments:
Post a Comment