Monday, 22 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

ऐतिहासिक भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज ही घोषणा केली. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी लक्सन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. हा करार द्विपक्षीय आर्थिक संबंध लक्षणीयरीत्या दृढ करेल, बाजारपेठेत प्रवेश सुलभ करेल, गुंतवणुकीला चालना देईल आणि दोन्ही देशांमधलं सामरिक सहकार्य मजबूत करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुक्त व्यापार करारामुळे मिळालेल्या मजबूत आणि विश्वासार्ह पायाच्या आधारावर, दोन्ही पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा तसंच पुढील १५ वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याचा विश्वास व्यक्त केला.

****

राष्ट्रीय गणित दिवस आज साजरा होत आहे. भारताचे सर्वात प्रभावशाली आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. विज्ञान, संशोधन आणि दैनंदिन जीवनात गणिताचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी देशभरातल्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत.

****

दिल्ली आणि आसपासच्या परिसरात दाट धुक्यामुळे अनेक विमानसेवा आणि रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृश्यमानता कमी असल्याने सुमारे १० विमानसेवा रद्द करण्यात आल्या. दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांवरही याचा परिणाम झाला असून, १७ रेल्वे तीन तासांपेक्षा अधिक उशिरानं धावत आहेत.

दरम्यान, नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेसही उशीरा धावत असल्यानं आज नांदेड इथून ही गाडी सकाळच्या तीच्या नियोजित वेळेऐवजी दुपारी दीड वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही, असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसही जारी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी ठरले होते. या प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इस्रो येत्या बुधवारी ‘ब्लूबर्ड ब्लॉक-2’ हा दूरसंवाद उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. अमेरिकेच्या ‘AST स्पेस मोबाइल’ या कंपनीचा हा उपग्रह, LVM–3 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे पृथ्वीच्या निम्न कक्षेत, पोहोचणारा सर्वात मोठा व्यापारी उपग्रह असेल. ‘ब्लूबर्ड ब्लॉक-2’ कंपनीचा हा पुढल्या पिढीतला दूरसंवाद उपग्रह, मोबाईल स्मार्टफोन्सना अवकाश-आधारित सेल्युलर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी थेट मिळवून देण्यासाठी विकसित केला आहे. इस्रोनं विकसित केलेला LVM–3 हा तीन टप्प्यांमधला उपग्रह प्रक्षेपक असून, याच्या साहाय्यानं चांद्रयान-२ आणि ३ चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.

****

राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती स्कॉलर्स हा युवा संशोधन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत भारतातल्या महिलांच्या संबंधीत मुद्द्यांवर धोरणाभिमुख संशोधन करण्यासाठी तरुण विद्यार्थी आणि संशोधकांकडून अर्ज मागवले आहेत. महिलांची सुरक्षा आणि सन्मान, लिंग-आधारित हिंसाचार, कायदेशीर हक्क आणि न्यायाची उपलब्धता, आरोग्य आणि पोषण, आर्थिक सक्षमीकरण आणि श्रम सहभाग यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर बहुविद्याशाखीय संशोधनास प्रोत्साहन देणं, हा या फेलोशिपचा उद्देश आहे. निवडलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचा संशोधन अभ्यास करण्यासाठी एक लाख रुपयांचं अनुदान दिलं जाईल. विद्यार्थी या महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात, असं आयोगानं कळवलं आहे.

****

बालविवाहमुक्त अभियानाअंतर्गत लातूर इथल्या मुकुंदराज महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात, बालविवाहाचे दुष्परीणाम, तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. बाल संरक्षणाबाबत अस्तित्वात असलेल्या कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचे असल्याचं मत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी व्यक्त केलं.

****

तैवानच्या शिक्षण मंत्रालयाच्या आमंत्रणावरून मुंबई विद्यापीठाचं एक शिष्टमंडळ तैवानला रवाना झालं आहे. द्विपक्षीय शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट करणं आणि तैवानमधली अग्रगण्य विद्यापीठं आणि उद्योग संस्थांशी दीर्घकालीन भागीदारीच्या संधी निर्माण करणं, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

****

No comments:

Post a Comment