Tuesday, 23 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान - डॉ जयंत नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने गौरव

·      विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र सरकारकडून एक लाख ५१ हजार कोटी रुपयांची तरतूद

·      राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला प्रारंभ

·      संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका न्यायालयात आरोपींविरुद्धचे आरोप निश्चित

आणि

·      भारत - श्रीलंका महिला क्रिकेट संघात आज दुसरा टी ट्वेंटी सामना

****

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींनी शास्त्रज्ञांना हे पुरस्कार देऊन सन्मानित केलं. विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा शांतिस्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम या चार श्रेणीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिवंगत शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांना यावेळी मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान युवा पुरस्कार विजेत्यांमध्ये पुण्याचे प्राध्यापक सुहृद मोरे यांचाही समावेश आहे.

 

दरम्यान, भारतीय गुप्तवार्ता विभाग - आय बीच्या ३८ व्या शताब्दी स्मृती कार्यक्रमालाही राष्ट्रपतींनी आज संबोधित केलं. देशातल्या नागरिकांची सुरक्षा, राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करण्यात भारतीय गुप्तवार्ता विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

****

विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र सरकारने एक लाख ५१ हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज एका व्हिडिओ संदेशातून ही माहिती दिली. पूर्वीच्या मनरेगा योजनेच्या नावाखाली नवीन योजनेबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचं चौहान यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान

****

देशात यावर्षी ५ कोटी ८० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं १९ डिसेंबरपर्यंतचा पेरणी अहवाल प्रसिद्ध केला आहे. ३०१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर गव्हाची तर, १२६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

****

माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चरणसिंह यांना आदरांजली अर्पण केली. चरणसिंह यांनी शेतीच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी जीवन समर्पित केल्याचं, पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नरसिंहराव यांना आदरांजली वाहिली आहे.

****

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली. छत्रपती संभाजीनगर इथं पहिल्याच दिवशी एक हजार आठशे अर्ज, जालना इथं ८०४ तर नांदेड इथं ६६३ अर्जांची विक्री झाली. मात्र आज पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.

 

३० डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील आणि ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. दोन जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. तीन जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. आवश्यकतेनुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची समीकरणं अद्याप जाहीर झालेली नाहीत.

मुंबईत काँग्रेसनं सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचं ठरवलं असून, याबाबत अधिकृत घोषणा उद्या होणार असल्याचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आम आदमी पक्षाने मुंबई महापालिकेसाठी ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

****

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैद्य यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेचे जे माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असून, भाजपकडून आमिषं तसंच आश्वासनं मिळत असल्यामुळे हे पक्षांतर होत असल्याचा आरोप, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

****

नागरिकांना संवेदनशील आणि गतिशीलतेने सेवा दिल्यास सुशासन निर्माण होईल असा विश्वास छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला आहे. सुशासन सप्ताहा निमित्त जिल्हास्तरीय प्रसार कार्यशाळेत ते आज बोलत होते. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत सुशासन ही संकल्पना अस्तित्वात येणार नाही असं त्यांनी यावेळी नमूद केलं. निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने सुशासन कशा पद्धतीने करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं.

****

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप आज निश्चित केले. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट - उज्ज्वल निकम

या प्रकरणी ८ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत प्रत्यक्ष साक्षीदारांची उलटतपासणी आणि पुराव्यांचे काम सुरू होणार असल्याने या खटल्याला आता वेग मिळेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्य परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षेसाठी सातत्याने राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे. या कालावधीत राज्यात एकूण ३३ हजार दोन अपघात झाले, त्यामध्ये १४ हजार ६६ जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षी याच कालावधीत ३२ हजार ७८४ अपघातांत १४ हजार १८५ जणांचा मृत्यू झाला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२ टक्के, पुण्यात १५ टक्के, नागपूर २१ टक्के, धुळे १४ तर पालघरमध्ये अपघाती मृत्यूदरात २० टक्के घट झाल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्ष तसंच उमेदवारांना विविध परवानग्या देण्यासाठी महापालिकेनं स्मार्ट सिटी कार्यालयात एक खिडकी कक्ष सुरू केला आहे. पक्ष तसंच उमेदवारांनी प्रचार फेऱ्या, बैठका, आदी आयोजनाच्या ४८ तास आधी परवानगीसाठी अर्ज करावेत, तसंच सक्षम प्राधिकाऱ्याने या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी, कोणताही अर्ज २४ तासांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त लोहा पंचायत समितीतर्फे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत लोहा तालुक्यातल्या रामतीर्थ इथले मल्ल, भैय्या पाटील विजयी झाले. त्यांनी परभणी जिल्ह्यातले राम तेलंग यांना नमवत हे विजेतेपद पटकावलं. भैया पाटील यांना पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आलं. पाटील यांनी यापूर्वी परभणी, लातूर, कोल्हापूर तसंच कुरुंदवाडी आदी ठिकाणच्या कुस्ती स्पर्धांमध्ये यश मिळवलेलं आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि श्रीलंका संघातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज होणार आहे. विशाखापट्टणम् इथं सायंकाळी सात वाजता सामन्याला प्रारंभ होईल. मालिकेत विशाखापट्टणम् इथेच झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेला पराभूत करत, पाच सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

सीमाशुल्क विभागाने मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४८ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. १८ ते २२ डिसेंबर दरम्यान केलेल्या कारवाईत सीमाशुल्क विभागाच्या पथकाने बँकॉकहून आलेल्या आठ प्रवाशांकडून ४८ किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले. मस्कतहून आलेल्या एका प्रवाशाकडून १६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसंच या कारवाईदरम्यान ३५ लाख रुपयांपेक्षा पेक्षा जास्त किमतीचे २८३ ग्रॅम वजनाचे हिऱ्यांचे दागिने आणि २४ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साडे सहा किलो पॉलिश केलेले मौल्यवान रत्न देखील जप्त करण्यात आले आहेत. २२ डिसेंबरला फुजैराहला जाणाऱ्या प्रवाशांकडून ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचं परदेशी चलन देखील जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात आज अहिल्यानगर इथं सर्वात कमी सात पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पुण्यात आठ पूर्णांक सहा, नाशिक इथं आठ पूर्णांक आठ, तर जळगाव इथं साडे नऊ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं साडे दहा, परभणी इथं १० पूर्णांक सहा, धाराशिव इथं १० पूर्णांक सात तर नांदेड इथं १० पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment