Tuesday, 23 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून

·      नगरपालिका निवडणुकीत भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नगरसेवकांशी साधला संवाद

·      देशाच्या विकासात आणि प्रगतीत आयआयटीचं मोठं योगदान-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार

·      राजस्थानातल्या अरावली पर्वत रांगेत सुमारे ९० टक्के क्षेत्रात उत्खनन शक्य नाही, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची स्पष्टोक्ती

आणि

·      सदनिका घोटाळा प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

****

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून, अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर काल छत्रपती संभाजीनगर आणि लातूरसह बहुतांश ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं पत्रकार परिषदा तसंच बैठका घेऊन, निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.

****

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांच्या वापरावर आळा घालण्यासाठी मुंबईतल्या आयकर विभागाने चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. निवडणूक काळात प्रचारासाठी बेहिशेबी रोकड, मौल्यवान वस्तु किंवा इतर प्रलोभनांबाबत नागरिकांनी जागरुक राहावं आणि ७७ ३८ ११ ३७ ५८ या क्रमांकावर त्याविषयीची माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून, भाजप हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष असल्याचं सिद्ध झालं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी काल मुख्यमंत्र्यांनी नागपुरात आपल्या शासकीय निवासस्थानी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी, २०१७ च्या तुलनेत राज्यात भाजप नगरसेवकांची संख्या या निवडणुकीत दुपटीनं वाढल्याची माहिती दिली. ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यातल्या विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं दोन दिवसांचं  शिबीर पुण्यात यशदा इथं घेण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल पुण्याजवळ फुरसुंगी उरुळी देवाची इथल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. नगरपरिषद, नगरपालिकेत काम कसं करायचं, पाठपुरावा कसा करायचा, कामाचा दर्जा कसा राखायचा, याबाबत या शिबिरात मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या नवनिर्वाचित सर्व नगराध्यक्षांचं अभिनंदन करत, पवार यांनी, या निकालाने सर्वांची जबाबदारी वाढल्याचं नमूद केलं. ते म्हणाले…

बाईट – उपमुख्यमंत्री अजित पवार

****

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष, आणि एक हजार सहा नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली. अत्यंत विपरित परिस्थितीतलं मिळालेलं हे यश, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं असल्याचं, सपकाळ यांनी म्हटलं आहे.

****

देशभरातल्या आयआयटी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं देशाच्या विकासात आणि प्रगतीत मोठं योगदान असून, भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी ज्ञान हे शक्तिशाली माध्यम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल मुंबईत आयआयटी पवई इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कोणत्याही देशाचं भविष्य त्याच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

****

पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानग्या दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी २०२३ सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. पोलिसांना प्राथमिक माहिती अहवाल-एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्याबाबत कायद्यात तरतूद नसल्यामुळे, ही याचिका फेटाळत असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

****

राजस्थानातल्या अरावली पर्वत रांगेत सुमारे ९० टक्के क्षेत्रात उत्खनन शक्य नसल्याचं, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यादव यांनी, अजमेर आणि उदयपूर सारखी अनेक शहरं या पर्वतरांगेत वसलेली असून, गेल्या कित्येक शतकांपासून इथं नागरी वसाहती असल्याकडे लक्ष वेधलं. तरीही अरावली परिसरात शहरीकरणाचा कोणताही विचार नसल्याचं यादव यांनी स्पष्ट केलं.

****

सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी तुर्तास कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही, असं सांगत, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी दोषी ठरलेले कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवत, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती. कोकाटे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातला बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाने ‘हायटेक’ यंत्रणेचा वापर करण्याची सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलग इथं बिबट्याच्या हल्ल्यात दगावलेल्या सिद्धेश कडलग याच्या कुटुंबीयांची काल सांत्वनपर भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. बिबट्यांची घनता जास्त असलेल्या भागात ‘थर्मल ड्रोन’, ‘नाईट व्हिजन कॅमेरे’ आणि ५०० हून अधिक ‘ट्रॅप कॅमेरे’ बसवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

****

धाराशिव  जिल्ह्यातली आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित असलेल्या ५०० खाटांच्या अत्याधुनिक नवीन जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीस गती मिळाली आहे. आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी काल या रुग्णालयाच्या नियोजित जागेची पाहणी केली. रुग्णालयाच्या प्रस्तावित इमारतीचा आराखडा, विविध विभागांची रचना तसंच वॉर्डनिहाय नियोजनाचा त्यांनी सखोल आढावा घेतला.

****

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने काम करण्याचं आवाहन अपारंपारिक ऊर्जा संचालक सुमन चंद्रा यांनी केलं आहे. त्या काल बीड इथं आकांक्षित वडवणी तालुक्याच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. वडवणी तालुक्याची प्रगती चांगली असून, आगामी काळात यापेक्षा अधिक गतीनं काम करून महिलांचं जीवनमान उंचवावं, जेणेकरून इथल्या बालविवाहाचं प्रमाण कमी होऊ शकेल असं चंद्रा यांनी म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक नीलम रोहन यांची, हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काल याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. या पदावर कार्यरत असलेले श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररीत्या जारी करण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत आयोजित लावणी महोत्सवाचं काल आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. माळेगाव यात्रेचं जिल्हा प्रशासनाने अत्यंत सुयोग्य नियोजन केल्याबद्दल चिखलीकर यांनी समाधान व्यक्त केलं. लावणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मानधनात वाढ करण्यात आली असून भविष्यात आणखी मोठं सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यात काल सर्वात कमी सात पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. पुणे, मालेगाव, नाशिक इथं सरासरी आठ, तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, बीड आणि नांदेड इथं सरासरी दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment