Wednesday, 24 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचं ठरवलं असून, याबाबत अधिकृत घोषणा आज करण्यात आली. दोन्ही पक्षांचे नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातल्या इतर महापालिकांमध्ये युतीसंदर्भात लवकरच शिक्कामोर्तब होईल, असंही त्यांनी सांगितलं. तर मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इसरोने LVM-3 उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्याने ‘ब्लूबर्ड ब्लॉक-2’ या दूरसंवाद उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करत, ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी हे प्रक्षेपण करण्यात आलं. अमेरिकेच्या ‘AST स्पेस मोबाइल’ या कंपनीचा हा उपग्रह सहा हजार १०० किलो वजनाचा असून, तो थेट स्मार्ट फोनपर्यंत हाय-स्पीड 4G आणि 5G कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बनवण्यात आला आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दुर्गम भागात इंटरनेट सुविधा अधिक सुलभ होणार आहे. या उपग्रहामुळे टॉवर आणि फायबरशिवाय थेट मोबाईल कनेक्टिव्हीटी उपलब्ध होणार असून, इंटरनेटच्या विश्वात नवी क्रांती घडणार आहे.

जागतिक समुदायासाठी हे एक महत्वाचं योगदान असल्याचं इसरोचे अध्यक्ष डॉ. व्ही नरायणन् यांनी म्हटलं आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, अंतराळ विभागातलं प्रक्षेपण वाहन पथक तसंच AST SpaceMobile च्या उपग्रह प्रकल्प पथकाचं अभिनंदन केलं. श्रीहरिकोटा इथून झालेलं हे एकशे चारावं प्रक्षेपण असून, एलव्हीएम थ्री प्रक्षेपण वाहनाची ही नववी सलग यशस्वी मोहीम आहे, ज्यामुळे या वाहनाची १०० टक्के विश्वसनीयता अधोरेखित झाली असल्याचंही नारायणन यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी प्रक्षेपणाचं कौतुक करत, हा भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. LVM3 च्या हेवी-लिफ्ट यशामुळे गगनयान मोहिम, व्यावसायिक प्रक्षेपणे आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत झाली असून, भविष्याच्या पिढ्यांसाठी आत्मनिर्भरता वाढवण्यास मदत होईल, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही या यशस्वी प्रक्षेपणासाठी इसरो चं अभिनंदन केलं आहे.

****

ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात आहे. वर्ष १९८६ मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. या ऐतिहासिक घटनेनिमित्त हा दिवस ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो.

****

पूर्व आणि उत्तर भारतातल्या बहुतांश भागांमध्ये पडलेल्या थंडीमुळे आणि दाट धुक्यामुळे दिल्लीत हवाई तसंच रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. या प्रतिकूल हवामानामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. विमान कंपन्यांनी प्रवाशांना उड्डाणापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्याचा आणि अतिरिक्त वेळ घेऊन विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर भारतात दाट धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्याही त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा मोठ्या प्रमाणावर उशिरा धावत आहेत. अमृतसरहून येणारी सचखंड एक्सप्रेसही उशिराने धावत असल्यामुळे नांदेडहून ही गाडी पाच ते सहा तास उशिराने सुटत आहे.

****

नंदुरबार इथले काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. नाईक हे १९९५ साली पहिल्यांदा काँग्रेसकडून नंदुरबारचे आमदार झाले. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभारही सांभाळला होता. 

****

नांदेड इथल्या प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत उद्या २५ तारखेला पारंपरिक शंकरपट अर्थात बैलगाडा शर्यत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने बैलजोड्या सहभागी होणार असून, या शंकरपट स्पर्धेचं उद्घाटन खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या हस्ते होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२९वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार २६ तारखेपर्यंत १८००-११-७८०० या नि:शुल्क क्रमांकावर, नमो ॲप, किंवा Mygov या ओपन फोरमवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****s

No comments:

Post a Comment