Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
संसद क्रीडा महोत्सव देशाला हजारो प्रतिभावान खेळाडू देत
असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
गुजरातमधील जुनागढ इथं समारोप कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी
“संसद क्रीडा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आणि देशातील तरुणांना
दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं.
संसद क्रीडा महोत्सवाची व्याप्ती आणि त्याचा प्रभाव लक्षणीयरीत्या
वाढला असून हा क्रीडा महोत्सव युवकांचा विकास आणि राष्ट्र उभारणीच्या मंत्रासह एक मजबूत
आधारस्तंभ बनत असल्याचं ते म्हणाले. विजय-पराभावाच्या पलीकडे क्रीडापटूंची खिलाडूवृत्ती
आणि निष्पक्ष खेळाची भावना सक्षम आणि शिस्तबद्ध तरुणांच्या विकासाला हातभार लावत असल्याचं
ते म्हणाले. हेच सक्षम आणि शिस्तबद्ध तरुण राष्ट्राचे भविष्य घडवतात, असंही पंतप्रधांनींनी म्हटलं आहे.
****
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न
अटल बिहारी वाजपेयी यांनी नवभारताचा पाया रचला असून ते एक दृष्टे नेते होते असे गौरव
उद्गगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील वसंत
स्मृती, इथं आयोजित चित्रप्रदर्शनाचं उद्घघाटन
फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी महान कार्य केलंच, पण त्यांनी परराष्ट्र मंत्री असताना भारताच्या परराष्ट्र
धोरणालाही नवी दिशा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशाचा दळणवळण विकास, ग्रामसडक योजनांद्वारे रस्त्यांचं जाळं, दुरसंचार क्रांती आणि दबावात न येता भारताला अणूसक्षम
करण्याचं धाडसाचं काम अटलजींनी केल्याचं ते म्हणाले, जगाचा विचार भारताशिवाय होत नाही, हा संदेश अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कृतीतून दिला.
पत्रकार, कवी, साहित्यिक, राजकारणी, अर्थशास्त्री म्हणून अटलजींनी देशाच्या विकासाला नवा आयाम दिल्याचंही
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
****
नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात माजी
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे
जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं तसंच त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या
कार्याची माहिती दिली.
****
कर्नाटकमध्ये आज एका भीषण रस्ता अपघातात नऊ जणांचा आगीत
होरपळून मृत्यू झाला. चित्रदुर्ग जिल्ह्यात एका ट्रकशी धडक झाल्यानंतर खासगी शयनयान
बसला आग लागली. मृतात ट्रक चालकासह नऊ जणांचा समावेश आहे. ही बस बंगळुरूहून शिवमोग्गाकडे
जात असताना राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय
मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना ५० हजार रुपये दिले जातील. असं पंतप्रधानांनी सामाजिक
माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या
मार्गदर्शक सुचनेनुसार, राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीनं जिल्हा अग्रणी बँकेमार्फत
'हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा
निपटारा' करण्यासाठी राज्यभर विशेष शिबिरांचं
आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगानं बीड जिल्ह्यात येत्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता
विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर
तालुक्यातील नरवेलसह विविध परिसरात अवैध वाळू उपसा वाहतूक प्रकरणी महसूल आणि पोलिस
विभागाच्या पथकानं संयुक्त कारवाई करुन रेतीचे आठ टिप्पर ताब्यात घेतले. ही कारवाई
काल रात्री दहा वाजेदरम्यान कोटेश्वर–जमनापुरी घाट, मौजा नरवेल इथं करण्यात आली.
या कारवाईत सुमारे १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी
संबंधित वाहनचालक आणि मालकांविरोधात महसूल तथा खनिज कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची
प्रक्रिया सुरू आहे.
****
पालघर इथं ई-मार्केट या व्यासपीठाद्वारे
ग्रामीण उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला बचत गटांची क्षमता बांधणी कार्यशाळेचं
आयोजन करण्यात आलं होतं. या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये महिलांनी तयार केलेल्या विविध
ग्रामीण उत्पादनांचे प्रकार, त्यासाठी लागणारे योग्य पॅकेजिंग साहित्य, आकर्षक आणि
नियमबद्ध आवेष्ठण तयार करण्याच्या पद्धतीबद्दल माहिती देण्यात आली. उत्पादनाची माहिती
ई-मार्केट प्लॅटफॉर्मवरील नोंदणी, अन्न प्रक्रिया आणि घरगुती उत्पादनांसाठी आवश्यक असलेले
विविध शासकीय परवाने आणि नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं.
****
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती भारतीय बॅटमिंटनपटू पी.व्ही.
सिंधूची २०२६-२९ या कालावधीसाठी बॅडमिंटन जागतिक महासंघ अॅ्थलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी
निवड करण्यात आली आहे. या भूमिकेत, सिंधू जागतिक बॅडमिंटनच्या धोरणांमध्ये आणि प्रशासनात बॅडमिंटनपटूंचा
आवाज भक्कम करण्यासाठी काम करेल.
****
No comments:
Post a Comment