Thursday, 25 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

नाताळचा सण आज देशभरात साजरा केला जात आहे. या सणासह नववर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभु येशूंचा संदेश समाजात एकता आणि बंधुता वाढवेल  अशा भावना पंतप्रधान मोदींनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात व्यक्त केल्या आहे. नाताळनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून चर्चमध्ये येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले तसंच कॅरोल गायनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीतील अटलजींच्या 'सदैव अटल' या स्मारकाला पुष्पांजली वाहिली.

माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, भाजप राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि अनेक केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदारांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना पुष्पांजली वाहिली.

****

वाजपेयींनी आपलं संपूर्ण आयुष्य सुशासन आणि राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केलं, ते एक प्रभावी वक्ते आणि एक महान कवी म्हणून नेहमीच लक्षात ठेवले जातील. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य आणि नेतृत्व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एक दीपस्तंभ राहील." असे गौरोव्दगार पंतप्रधान मोदींनी सामाजिक माध्यमावरील संदेशात व्यक्त केले तसंच भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

****

देशात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७८ टक्क्यांनी घट झाली असून या रोगाचा प्रसारही ८० टक्क्यांनी कमी झाला असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली इथल्या सार्वजनिक आरोग्यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात काल ते बोलत होते. देशातील ३० हजारांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके प्रमाणपत्र मिळाले आहे. दर दोन हजार लोकांमागे एक आयुष्मान आरोग्य मंदिर स्थापन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा हा पुरावा आहे असे नड्डा म्हणाले.

देशात क्षयरोगाच्या संसर्गातही ३० टक्क्यांनी घट झाली असून जागतिक सरासरीचा विचार करता संसर्ग १२ टक्क्यांपेक्षा अजूनही जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

महापालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीची घोषणा लवकरच होईल, असं मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, पण महायुतीच्या कामगिरीवर याचा फारसा परिणाम होणार नाही, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.

****

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता संपणार आहे. या मुदतीनंतर कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाही, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यात ग्राम, तालुका आणि जिल्हा प्रशासनं सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी  आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

शाश्वततेच्या तत्त्वावर आधारित विकासच अर्थपूर्ण असल्याचं, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. अरावली पर्वतरांगेबाबत उद्भवलेल्या भ्रामक माहितीच्या पार्श्वभूमीवर ते आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. काँग्रेस पक्ष याबाबत नागरिकांची दिशाभूल करत असल्याची टीका यादव यांनी केली.

****

समृद्धी महामार्गावर महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे ते चांदूर रेल्वे इथं गॅन्ट्री उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत येत्या २७ ते २९ डिसेंबर दरम्यान, पाच टप्प्यात हे काम होणार आहे. या काळात कामाच्या टप्प्याजवळील वाहतूक जवळपास एक तासासाठी पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत कळवण्यात आलं आहे.

****

नाताळ सण छत्रपती संभाजीनगर इथं उत्साहात साजरा होत असून शहरातील चर्चमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातही नाताळ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध वस्तू खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांनी बाजारपेठेत गर्दी केली असून बाजारपेठेतील आकर्षक वस्तू लक्ष वेधून घेत आहे. तसचं प्रार्थना स्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार आणि दोन वेळा ऑलिंपिक कांस्यपदक विजेता हार्दिक सिंग याला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान, मेजर ध्यानचंद खेलरत्नसाठी नामांकन देण्यात आले आहे.

ऑलिंपिक पदक विजेता आणि भारतीय हॉकी संघटनेचे उपाध्यक्ष गगन नारंग यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आज नामांकनावर शिक्कामोर्तब केलं.

****

No comments:

Post a Comment