Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 December
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ राष्ट्रपतींच्या
हस्ते प्रदान; छत्रपती संभाजीनगर इथल्या अर्णव महर्षी याचा गौरव
·
केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून, येणाऱ्या काळात
सुधारणा आणखी वेगानं होतील, पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप – शिवसेना युती अंतिम टप्प्यात –
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
आणि
·
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान तिसरा टी-ट्वेंटी सामना आज
****
वीर बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय
बाल पुरस्कार’ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर
बालकांप्रति समाज सदैव कृतज्ञ राहील, असं नमूद केलं. पुरस्कारप्राप्त
बालकांचं कौतुक करतांना राष्ट्रपती म्हणाल्या -
बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यावर्षी १८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात विविध
क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या २० बालकांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या अर्णव महर्षी या मुलाचा समावेश आहे. अर्णवने
वैयक्तिक अनुभवातून अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी विकसित केलेल्या उपकरणासाठी
त्याला गौरवण्यात आलं. अर्णवने आपला अनुभव या शब्दांत व्यक्त केला -
बाईट – अर्णव महर्षी
****
शीख धर्माचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे सुपुत्र साहेबजादे
बाबा जोरावर सिंग आणि साहेबजादे बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याचं स्मरण म्हणून
आज वीर बाल दिवस पाळला जातो. यानिमित्त दिल्ली इथं मुख्य कार्यक्रम पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना त्यांनी, संपूर्ण देश आज
साहेबजादा बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्य आणि
त्यागाचं स्मरण करत असल्याचं नमूद केलं. मुघलांच्या अत्याचारासमोर अढळ निश्चयाने
उभे ठाकलेल्या साहेबजाद्यांनी आपल्या वयापेक्षा कितीतरी अधिक पटीने शौर्य दाखवल्याचं
पंतप्रधान म्हणाले.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्र प्रथम ही विचारधारा आपल्या जीवनाचा मार्गदर्शक
म्हणून स्वीकारण्याचं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी
यावेळी केलं. देशातली लहान मुलं ही विकसित देशात परिवर्तन घडवणारे महत्त्वाचे घटक
आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळण्याची गरज असून ती
मिळाली तर ही मुलं अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवू शकतात, असं अन्नपूर्णा देवी
म्हणाल्या.
वीर बाल दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबजादा जोरावर सिंग
आणि बाबा फतेह सिंग यांना आदरांजली वाहिली. मुंबईत शीव कोळीवाडा इथल्या
गुरुद्वारात आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. मुंबईत राज्यपालांचं
निवासस्थान महाराष्ट्र लोकभवन इथं ही साहेबजाद्यांना अभिवादन करण्यात आलं.
****
केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी
वचनबद्ध असून, येणाऱ्या काळात सुधारणा आणखी वेगानं होतील, असं पंतप्रधान मोदी
यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, सरत्या वर्षात आपल्या
सरकारने केलेल्या सुधारणांमुळे प्रशासनातला बदल ठळकपणे दिसून आल्याचं सांगितलं. या
सुधारणा गुंतागुंत सोडवून त्याचा इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी केल्या गेल्या
होत्या, कररचनेचं सुलभीकरण, विवादांचं जलदगतीने निराकरण, आधुनिक कामगार संहिता
यांमुळे संघर्ष कमी झाला, सरकारचा भर विश्वास, अनुमान आणि दीर्घकालीन प्रगती यावर
असल्याचंही मोदी आपल्या संदेशात म्हणाले.
****
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांची
बैठक आज नवी दिल्लीत सुरु झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र
मोदी उद्या आणि परवा संबोधित करतील. राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत
संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याची भागीदारी मजबूत करण्यासाठी ही परिषद
महत्त्वाची मानली जात आहे. यावर्षी या परिषदेचा मुख्य विषय विकसित भारतासाठी मानवी
भांडवल; असा असून यात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी
सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या
विषयांतर्गत प्रामुख्यानं शालेय पूर्व शिक्षण, शालेय शिक्षण, कौशल्य विकास, उच्च शिक्षण तसंच
क्रीडा आणि अतिरिक्त उपक्रम या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.
****
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज
त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक
प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आणि आर्थिक सुधारणा घडवून लाखोंना गरीबीतून बाहेर
काढलं असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. लोकसभेतले विरोधी
पक्ष नेते राहुल गांधी, आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांना आदरांजली
वाहिली.
****
२०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या
दृष्टीनं विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत विकासकामं राबवण्यात येतील, असं केंद्रीय
कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं आहे. दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला
दिलेल्या मुलाखतीत ते बोलत
होते. जी राम जी योजनेत सव्वाशे दिवस काम पुरवण्याची तरतूद आहे, तसंच कामासाठी अर्ज
केल्यापासून १५ दिवसात काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याचीही सोय
असल्याचं चौहान यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अंतिम
टप्प्यात आली असून, उद्यापर्यंत सर्व निर्णय होतील, असं महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम
प्रतिनिधींशी
बोलत होते. मराठवाड्यात जालना, परभणी, लातूर आणि नांदेड
महापालिकेसाठी देखील बैठका घेऊन अडचणी दूर करण्यात येणार असल्याचंही बावनकुळे
म्हणाले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत समन्वय साधण्यासाठी शिवसेना तसंच भाजप नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली
आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार स्थापन या समितीत भाजप तसंच
शिवसेनेच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएम
पक्षाने आणखी ४ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. दरम्यान, पक्षाने मुंबई महानगर
महापालिकेसाठी ७, अहिल्यानगर महापालिकेसाठी ४, लातूर महापालिकेसाठी १, परभणी महापालिकेसाठी
एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
****
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज एकूण ५९९
नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. तर १६ प्रभागांमधून एकूण १३ अर्ज प्राप्त झाले
आहेत. आतापर्यंत एकूण १४ अर्ज दाखल झाले आहेत.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी
शिवसेनेत प्रवेश केला. आज ठाणे इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत
हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
****
धुळे महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून निवडणुक
लढवण्याचा प्रस्ताव आला तर भाजप सोबत युती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची
तयारी असल्याची माहीती माजी मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. ते आज धुळे इथं
बोलत होते. अनेक वर्षानंतर निवडणुका होत असल्याने प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या
मोठी असल्याने पुरेशा जागा देणं अवघड असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान तिसरा
टी-ट्वेंटी सामना आज तिरूवनंतपुरम इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता
सामन्याला सुरूवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ दोन – शून्यने
आघाडीवर आहे.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या निटूर परिसरात आज
दुपारी साडेबारा वाजेच्या आसपास भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का
जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाली होती. या घटनेनंतर जिल्हा
प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी
यांच्याकडे तपासणीसाठी पाठवली, मात्र तपासणीनंतर निटूर परिसरात
भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचं, प्रशानाने स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे या भागात भूकंप झाल्याच्या अफवांना कुणीही बळी पडू नये, असं अवाहन करण्यात
आलं आहे.
****
महावितरणच्या वतीने सौर कृषिपंपाबाबतच्या अडचणी
सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये एक
जानेवारी २०२६ रोजी तक्रार निवारण मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment