Friday, 26 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·   आज वीर बाल दिवस;प्रधानमंत्री बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

·   राष्ट्रउभारणीत खासदार क्रीडा महोत्सवाची भूमिका महत्त्वपूर्ण-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·   महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

·   काढे किंवा अर्क पेयं चहा म्हणून विकू नयेत-एफएसएसएआयची सूचना

·   नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला प्रारंभ

आणि

·   माळेगाव यात्रेत शंकरपटाचा थरार-साडे चार सेकंदात अंतर पार करणारी बैलजोडी प्रथम

****

 वीर बाल दिवस’ आज साजरा केला जात आहे. शिख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंहजी यांचे सुपुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा बाबा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, वीर बाल दिनानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षी १८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या २० मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

****

देशभरातल्या खासदार क्रीडा महोत्सव २०२५ चा काल समारोप झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना दूरस्थ पद्धतीने संबोधित केलं. देशाच्या उभारणीत खासदार क्रीडा महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं. खेळामुळे जय-पराजयाच्या पलीकडे जात तरुणांमध्ये खिलाडूवृत्ती रुजत असल्यामुळे सक्षम आणि शिस्तबद्ध तरूण घडत आहेत, हेच तरूण पुढे राष्ट्र उभारणीत योगदान देणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट-पंतप्रधान मोदी

 

२०३० मध्ये भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जाणार असून, २०३६ ला ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.  दरम्यान, देशभरातल्या खासदार क्रीडा महोत्सवांचा काल समारोप झाला.

****

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला काल २५ वर्षे पूर्ण झाली. २५ डिसेंबर २००० रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत पूर्वी संपर्क नसलेल्या ग्रामीण वस्त्यांशी कशाही परिस्थितीत संपर्क सुनिश्चित करणं हे ध्येय आहे.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या एकशे एकाव्या जयंतीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या सदैव अटल या अटलजींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. लखनौ इथं राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं. हे राष्ट्रीय प्रेरणा स्थळ ९८ हजार चौरस मीटरवर उभारलेलं असून, कमळाच्या आकाराच्या रचनेचं अत्याधुनिक संग्रहालय इथं बांधण्यात आलं आहे. देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या नेत्यांच्या कारकिर्दीला इथे उजाळा देण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रनायक यांचा जीवन प्रवास’ या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन केलं. छत्रपती संभाजीनगर, परभणीसह मराठवाड्यात सर्वत्र वाजपेयींना अभिवादन करण्यात आलं.

****

राज्यातल्या २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातली सत्ताधारी महायुती, आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांमधे स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत. 

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी एआयएमआयएमने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नाशिक महानगरपालिकेसाठी तीन, तर जालन्यासाठी एक उमेदवार पक्षाने दिला आहे. धुळे, नाशिक, जालना आणि नांदेडसह विविध ठिकाणांहून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत.

 

महापालिका निवडणुकांचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक काल मुंबईत झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध नेते या बैठकीला उपस्थित होते.

 

नाशिकमधे दोन माजी महापौरांसह विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक पांडे, आणि यतिन वाघ, मनसेचे दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन भोसले आणि काँग्रेसचे शाहू खैरे यांचा त्यात समावेश आहे. भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यालयात या सर्वांचं स्वागत केलं.

 

लातूर इथं काँग्रेसचे माजी नगरसेवक रविशंकर जाधव आणि पुनीत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी मंत्री तथा लातूर शहर निवडणूक प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

काढे किंवा अर्क आधारित पेयं टी अर्थात चहा म्हणून विकू नयेत, अशी सूचना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण-एफएसएसएआयनं केली आहे. रॉयबॉस टी, हर्बल टी, फ्लॉवर टी अशा नावानं अनेक पदार्थ विकले जातात, मात्र प्राधिकरणाच्या नियमांनुसार कॅमेलिया सिनेन्सिस अर्थात चहा या वनस्पतीपासून तयार झालेल्या पेयांनाच चहा म्हणता येतं. यापैकी कोणतीही पेयं चहापासून तयार होत नाहीत, त्यामुळे ते चहा म्हणून विकणं किंवा विक्रीसाठी ठेवणं हे कायद्याने चुकीचं आणि दिशाभूल करणारं असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे.

****

रेल्वेची भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवास भाड्यात पहिल्या २१५ किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी द्वितीय श्रेणीच्या भाड्यात प्रति किलोमीटरमागे एक पैसा तर एक्स्रप्रेस गाड्यांच्या प्रवासात प्रति किलोमीटरमागे दोन पैसे भाडेवाढ झाली आहे. वातानुकुलित प्रवासासाठी प्रति किलोमीटर दोन पैसे भाडेवाढ झाली आहे. 

या भाडेवाढीपूर्वी प्रवासाचं आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही, उपनगरी रेल्वे भाडं तसंच मासिक पासच्या दरात काहीही बदल केलेला नाही, असं रेल्वेनं जाहीर केलं आहे. 

****

नाताळचा सण काल सर्वत्र उत्साहाने साजरा झाला. ठिकठिकाणच्या चर्चेसवर रोषणाई करण्यात आली असून, नाताळनिमित्त भेटवस्तू घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजच्या प्रतिकृतींनी लक्ष वेधून घेतलं. चर्चमध्ये येशू जन्माच्या देखाव्यांसह कॅरोल गायन तसंच विविध कार्यक्रम साजरे झाले. छत्रपती संभाजीनगर, जालना आदी ठिकाणी नाताळनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

****

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कालपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुलं झालं. सध्या देशांतर्गत असलेली ही सेवा, मार्च महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत विस्तारली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

आज सकाळी आठ वाजता बेंगळुरूहून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली. तर सकाळी पावणे नऊ वाजता या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेने पहिलं विमान आकाशात झेपावलं. सध्या या विमानतळावरून देशभरातल्या नऊ विमानतळांवर विमान प्रवास सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी आठ ते रात्री आठ अशी बारा तासापुरती विमानसेवा सुरू राहील. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून टप्प्याटप्पाने हे विमानतळ कार्यान्वित करण्यात येईल. हे विमानतळ पाच टप्प्यांमध्ये बांधण्यात येणार आहे. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यासाठी १९ हजार ६५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पाचही टप्पे पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरून दर वर्षी ९ कोटी प्रवासी प्रवास करू शकतील

****

कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या पार्थिव देहावर काल  नवागाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सरकारच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करुन सुरुपसिंग नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय आणि सामाजीक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून नाईक यांना आदरांजली अर्पण केली.

****

नांदेड जिल्ह्यात काल एकाच कुटुंबातल्या चौघांनी आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. मुदखेड तालुक्यातल्या जवळा मुरार इथं ही घटना घडली. कुटुंबातले पती–पत्नी राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर त्यांच्या दोन तरुण मुलांनी मुगट शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं आढळलं. बारड आणि मुदखेड पोलीस या संदर्भात चौकशी करत आहेत.

****

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी इथं २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. इम्रान बेलुरे असं या युवकाचं नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करत, गेल्या एक वर्षापासून पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.

****

कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांना योग्य भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काल शेतकरी हक्क मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांनी हातात कापसाची आणि तुरीची झाडं घेऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतलं.

****

नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत काल पारंपरिक शंकरपट म्हणजे बैलगाडी शर्यत उत्साहात पार पडली. या रोमहर्षक स्पर्धेत एकूण ३८ बैलजोड्यांनी सहभाग घेत प्रचंड थरार निर्माण केला. कोंडीबा मोहन कोरडे यांच्या बैलजोडीने अवघ्या साडे चार सेकंदात प्रथम क्रमांक पटकावला. अमोल देविदास राठोड यांच्या बैलजोडीने ४ पूर्णांक ४२ सेकंदात द्वितीय तर अश्विनी आणि कदम यांच्या बैलजोडींनी ४ पूर्णांक ४३ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. या तिन्ही बैलजोड्यांना रोख पारितोषिक तसंच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. सहभागी सर्व बैलजोडी मालकांनाही प्रोत्साहनपर बक्षीसं देण्यात आली.

****

No comments:

Post a Comment