Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 December
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक
चर्चा सुरू – मुख्यमंत्र्यांची माहिती
·
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक
लढवेल – विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती
·
अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार
मुख्यमंत्र्यांना प्रदान
·
‘व्हीबी जी राम जी’ हा कायदा आणून केंद्र सरकारने गरीबांच्या
पोटावर पाय दिला – काँग्रेसची टीका
आणि
·
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ग्राहक समाधान सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर
विमानतळ प्रथम
****
राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत जागा
वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असून, लवकरच हा तिढा सुटेल, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अमरावती इथं वार्ताहरांशी बोलत होते.
महायुतीतील जागावाटपाबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले-
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
राजकीय घडामोडी घडत आहेत.
भाजपा आणि शिवसेनेत सध्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहे.
चांगल्या पद्धतीने जागा वाटप होऊन महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपाची
युती होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईचं जागा
वाटप जवळपास अंतिम झालं असून, मुंबईतल्या जागा वाटपाचा आढावा
मुख्यमंत्री घेत असल्याचं ते म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर काँग्रेस
स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. ते
आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शक्य तिथे वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी
करण्याचा प्रयत्न सुरू असून, समविचारी पक्षांसोबत आघाडी
करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप ध्रुवीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार
यांनी, राज्यात चुकीचं
राजकारण होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले,
बाईट – विजय वडेट्टीवार
****
सोलापूर महापालिकेसाठी काँग्रेसनं आज १० प्रभागातल्या २०
उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने ४८
उमेदवारांची नावं जाहीर केली.
आम आदमी पक्षानं पहिल्यांदाच नवी मुंबई आणि भिवंडी
महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही महापालिकेत अधिकाधिक जागा
लढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
****
अकोला महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस
यांच्यात जागावाटपाबाबत पहिली बैठक आज पार पडली. जागावाटपाचं सूत्र सुमारे ९९
टक्के निश्चित झालं आहे, मात्र १ ते २ जागांवर अद्याप तिढा कायम असून तो लवकरच
होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत सोडवण्यात येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
आयुक्त तथा प्रशासक आणि निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी आज निवडणूकपूर्व
तयारीचा सखोल आढावा घेतला. निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा
उमेदवाराला शहरातलं एकच मैदान, सभागृह किंवा सभास्थळ सलग आठ ते
दहा दिवस आरक्षित ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं त्यांनी यावेळी
स्पष्ट केलं. निवडणूक नियोजन, प्रचार व्यवस्थापन, मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि
आचारसंहिता अंमलबजावणी या सर्व बाबींचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणूक
प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली
जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असं आवाहनही श्रीकांत यांनी
यावेळी केलं.
****
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत
आतापर्यंत ६३९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली असून, १७ उमेदवारी अर्ज
दाखल झाले आहेत.
****
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या
जयंतीनिमित्त अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा भाऊसाहेब देशमुख स्मृती
पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज प्रदान करण्यात आला. अमरावती इथं
झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते हा
पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महाराष्ट्र सरकार भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या
मार्गावरच सातत्याने चालत असून, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाला
झपाट्याने वाव मिळत आहे. यासाठी सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन कृषी हा उपक्रम
सुरू केला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी डॉ. पंजाबराव
देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या
कार्यक्रमाचा १२९ वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवर, एआयआर न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर
केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, डीडी न्यूज तसंच प्रधानमंत्री
कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरून हा
कार्यक्रम थेट प्रक्षेपित होणार आहे. कार्यक्रमानंतर त्याचं प्रादेशिक भाषांमधून
भाषांतर प्रक्षेपित होईल.
****
मनरेगा कायद्या ऐवजी ‘व्हीबी जी राम जी’ हा कायदा आणून
केंद्र सरकारने गरीबांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका करत काँग्रेस अध्यक्ष
मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘जी राम जी’ विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. नवी
दिल्ली इथं आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात ‘जी राम जी’ कायद्यासह इतर
मुद्द्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केलं.
कार्यकारिणीच्या बैठकीत बांग्लादेशात हिंदू अल्पसंख्यकांवरच्या हल्ल्यांचा निषेध
करण्यात आला. तसंच मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेबद्दल चर्चा झाली. या बैठकीला
काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल
गांधी उपस्थित होते.
****
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने आतापर्यंत ३१ अधिकार
क्षेत्रांमध्ये ४५ कोटी रुपये यशस्वीरित्या वसूल केले आहेत. गेल्या आठ महिन्यांत
या उपक्रमांतर्गत ६७ हजारांहून अधिक तक्रारींचं निराकरण करण्यात आल्याचं, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक
वितरण मंत्रालयाने सांगितलं. या हेल्पलाइनमुळे ग्राहकांना खटले टाळण्यास मदत झाली
आहे. ग्राहक १९१५ या टोल-फ्री क्रमांकावर फोन करून १७ भाषांमध्ये तक्रारी नोंदवू
शकतात, असंही मंत्रालयानं कळवलं आहे.
****
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या
माहूर इथं रेणुकादेवीचं दर्शन घेण्यासाठी नाताळच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी
वाढली आहे. २० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं. दररोज
रात्री साडे आठ वाजता मंदिर बंद होतं, मात्र गेल्या दोन दिवसांपासून
रात्रीच्या साडे नऊवाजेपर्यंत दर्शन सुरू असल्यानं आणि भाविकांची गर्दी लक्षात
घेऊन मंदिर समितीनं रांगेतील शेवटच्या भाविकाला दर्शन होईपर्यंत मंदिर खुलं
ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
****
भारतीय विमानतळ प्राधिकरण – एएआय अंतर्गत देशातल्या ६२
विमानतळांमध्ये ग्राहक समाधान सर्वेक्षण घेण्यात आलं. यामध्ये दुसऱ्या फेरीत छत्रपती संभाजीनगर
विमानतळाने पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षीच्या या सर्वेक्षणात
विमानतळाचा चार पूर्णांक ८७ गुणांसह १३ वा क्रमांक होता, त्यानंतर यावर्षी
विमानतळ प्रशासनाने हे यश मिळवलं आहे.
****
शीख धर्माचे दहावे गुरू श्री गुरू गोविंदसिंग यांच्या
जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात धावणी मोहल्ला गुरुद्वारामध्ये अखंड पाठ
समाप्ती झाली. विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. यानिमित्त
धावणी मोहल्यातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
****
राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर ते गोवा
शक्तिपीठ महामार्ग पूर्वीच्या रेखांकानुसारच तयार करावा, अशी मागणी पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातल्या
शेतकऱ्यांनी केली आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ या भागातल्या
शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली आहे.
दरम्यान, सरकारने जो महामार्ग बदलण्याचा
निर्णय घेतला तो योग्यच आहे, सरकारच्या या नव्या निर्णयामुळे
दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं, भाजपचे किसान
मोर्चाचे सरचिटणीस माऊली हळणवर यांनी म्हटलं आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री
फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गात सोलापूरपासून बदल करण्याचं जाहीर केलं होतं.
त्यानंतर आता मोहोळ, पंढरपूर, सांगोला, आटपाडी भागातल्या
शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध नसून जमिनी द्यायला तयार असल्याचं म्हटलं
आहे.
****
No comments:
Post a Comment