Monday, 29 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते जमशेदपूर इथं संथाली भाषेच्या ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूरच्या १५ व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. पंडित रघुनाथ मुर्मू यांनी सुरू केलेल्या 'ओल चिकी' चळवळीला १०० वर्ष झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती उद्या मुर्मू गुमला इथं आंतरराज्यीय जनसांस्कृतिक समारंभाला भेट देतील.

****

विकसित भारत - रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण: व्ही बी जी-राम-जी कायद्यामुळे, गेल्या सात वर्षांच्या सरासरी वाटपाच्या तुलनेत अनेक राज्यांना १७ हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा होण्याची शक्यता स्टेट बँक ऑफ इंडियानं वर्तवली आहे. एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी लिहिलेल्या या अहवालात या कायद्यानुसार स्पर्धात्मक प्रकल्पांची ओळख, उत्पादक मालमत्ता निर्मिती, वाढीव उत्पन्न निर्मिती आणि कार्यक्षम देखरेख यंत्रणा यांच्याशी संबंधित आव्हानांवर लक्ष केंद्रित केले जाईल असे नमूद केलं. हा कायदा पूर्वीच्या १०० दिवसांऐवजी प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १२५ दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देतो.

****

केंद्रीत प्रयत्न, नावीन्य आणि स्वदेशीकरणामुळे भारतीय रेल्वेचं जागतिक दर्जात रूपांतर होत असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. सध्या देशभरात १६४ वंदे भारत रेल्वे सुरू असल्याचं सांगत वातानुकूलित श्रेणीतील पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे सुरू करण्यासाठी सज्ज असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ४२ प्रकल्पांचे लोकार्पण, १३ प्रकल्पांचे उद्घाटन आणि २१ प्रकल्पांची पायाभरणी केली असल्याचं मंत्रालयांनं नमूद केलं.

****

उत्तर भारताच्या अनेक भागांत पसरलेल्या दाट धुक्यामुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली असून, आज सकाळी 'अत्यंत गंभीर' श्रेणीत याची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत दिल्लीचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक ४०३ इतका नोंदवला गेला असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलं आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या १८ गाड्या तीन तासांपेक्षा जास्त उशिराने धावत आहेत. तर, ६४ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं प्रवाशांना याबद्दलच्या सुचनांबाबत सतर्क राहून प्रवासाचं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

****

आज सकाळच्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे शून्य पूर्णांक तीन टक्क्यांनी खाली आले. सेन्सेक्समध्ये २६३ अंकांची घसरण होऊन तो ८४ हजार ७७८ अंकांवर तर निफ्टी ७० अंकांनी घसरून २५ हजार ९७३ अंकांवर पोहोचला. दरम्यान, सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आजही वाढ झालेली दिसून आली. चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम एक लाख 41 हजार 210 रुपयांवर तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम एक लाख 29 हजार 440 वर पोहोचली. चांदीच्या किंमतीतही आज वाढ नोंदवली गेली. चांदीची किंमत प्रति किलो दोन लाख 50 हजार 900 रुपयांवर पोहोचली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पार पडलं. महापालिका निवडणुकीसाठी शहरात एकूण आठ हजार मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ राजनगर–मुकुंदनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक काल पार पडली. यावेळी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. यावेळी चव्हाण यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला तसंच प्रभागातील विविध समस्यांवर चर्चा केली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

****

१७व्या ज्युनियर रोल बॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून जम्मू इथं सुरूवात होत आहे. देशभरातून ६०० खेळाडू आणि प्रशिक्षक या स्पर्धेत सहभागी होत आहेत. रोल बॉल या खेळाला प्रोत्साहन देणे हे या स्पर्धेचं उद्दीष्ट असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

***

भारतीय महिला फलंदाज स्मृती मानधना ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात तिनं या विक्रमाची नोंद केली. मानधना हिनं २८१ सामन्यांमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या असून हा टप्पा गाठणारी ही चौथी महिला क्रिकेटपटू आहे.

****

No comments:

Post a Comment