Monday, 29 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड करत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन, मन की बात मधून घेतला सरत्या वर्षातल्या कामगिरीचा आढावा

·      महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग, मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र

·      अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ञांच्या आक्षेपांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

·      टी-ट्वेन्टी क्रिकेट मालिकेत श्रीलंकेविरुद्ध भारतीय महिला संघाची ४-० ने आघाडी

आणि

·      तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रौत्सवाला सुरुवात

****

आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड करत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते बोलत होते. या मालिकेचा १२९वा भाग काल प्रसारित झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं, हाच उत्साह ‘वंदे मातरम्’ ला १५० वर्षे पूर्ण झाली तेव्हाही पहायला मिळाला, असं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी सरत्या वर्षातल्या आठवणींना उजाळा दिला. २०२५ या वर्षाने आपल्याला असे अनेक क्षण दिले, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला, देशाच्या सुरक्षेपासून ते खेळांच्या मैदानापर्यंत, विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून ते जगभरातल्या मोठ्या व्यासपीठांपर्यंत, भारताने प्रत्येक ठिकाणी आपला मजबूत ठसा उमटवला, असं ते म्हणाले.

क्रीडा क्षेत्रात देशाला मिळालेलं यश, विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात घेतलेली भरारी, पर्यावरण संरक्षण आणि वन्य-जीवांची सुरक्षा, प्रयागराज इथला कुंभमेळा, अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण, या सगळ्या घटनांमुळे आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की २०२५ ने भारताला मोठा आत्मविश्वास दिला, असं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश आता २०२६ मध्ये नवीन आशा आणि नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

युवकांच्या सामर्थ्यांबद्दल बोलताना त्यांनी, विज्ञान क्षेत्रातली आपली कामगिरी, नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञानाच्या विस्ताराने जगभरातले देश प्रभावित झाल्याचं नमूद केलं.

भारतीय भाषा, संस्कृती, वारसा, पारंपारिक कला याला बळकटी देण्यासाठी भारतीयांनी देशासह जगभरात केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी माहिती दिली. काशी – तामिळ संगमम या उपक्रमाचा त्यांनी उल्लेख केला.

२०२६ हे वर्ष संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरो, अशी आशा व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी, व्यायाम करुन सर्वांनी निरोगी राहण्याचं आवाहन केलं.

****

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत टिळक भवन इथल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रर्मात ते बोलत होते. मनरेगातील महात्मा गांधीं यांचं नाव कायम ठेवण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस वचनबद्ध असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं, तसंच कार्यकर्त्यांना मनरेगा बचावची शपथही दिली.

****

मुंबई महापानगरलिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन पक्षाने आघाडीची घोषणा केली आहे. मुंबईतल्या २२७ जागांपैकी ६२ जागा वंचित आघाडी लढवणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी काल संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीनं छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी चार उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली.

****

सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली असून, दोन्ही पक्ष आता ५१- ५१ जागेवर लढणार आहेत. माजी मंत्री शिवसेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी काल सोलापूर इथं ही माहिती दिली.

****

महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी १९४ चिन्ह उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये विविध चिन्हाचा समावेश असून, यात खाद्यपदार्थांच्या चिन्हांचाही वापरण्यात आला आहेत. निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांना तसंच अ मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हामधून निवड करता येणार आहे. मात्र मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हांवरच उमेदवार उभे करण्याची मुभा राहणार असून, मुक्त चिन्हांची यादी त्यांना लागू राहणार नसल्याचं आयोगानं सांगितलं आहे.

****

 

अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि ए.जी. मसीह यांचा समावेश असलेल्या सुट्टी-कालीन पिठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर मोठ्या प्रमाणात निषेध आणि आक्षेप नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा हस्तक्षेप केला आहे.

****

मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. शिक्षण आणि संस्कृती हे मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली, या संस्थेच्या स्थापनेतही अशाच वैश्विक विचाराचं स्वरुप दिसून येतं असं मुख्यमंत्री म्हणाले. मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आभासी पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

****

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची सुरुवात काल घटस्थापनेने झाली. येत्या बुधवारी सकाळी सात वाजता जलकुंभ यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर शतचंडी होम, पूर्णाहूती, अन्नदान महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणातले लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत.

****

दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या फुलांपासून अगरबत्ती तयार करून निर्माल्याचं पावित्र्य जपणारा पर्यावरणपूरक उपक्रम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने राबवण्यात त आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर देविदास पाठक,

बाईट – देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर(धाराशिव)

****

पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं एक जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काल सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत प्रशासनाची बैठक झाली. या सोहळ्यानिमित्त भीमा कोरेगाव इथं येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसंच हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा अशा सूचना कांबळे यांनी दिल्या.

****

महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा चौथा टी–ट्वेंटी सामना भारताने ३० धावांनी जिंकला. काल तिरुवअनंतपुरम इथं झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत २२१ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला श्रीलंकेचा संघ निर्धारित षटकात १९१ धावाच करु शकला. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत चार – शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

विजयवाडा इथं झालेल्या ८७ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ऋत्विक संजीव एस. यानं पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारत राघव याचा २१-१६, २२-२० असा पराभव केला. पुरुष दुहेरीत ए. हरिहरन आणि रुबन कुमार यांनी, महिला दुहेरीत शिखा गौतम आणि अश्विनी भट के. यांनी, तर मिश्र दुहेरीत सात्विक रेड्डी के. आणि राधिका शर्मा यांनी विजेतेपद पटकावलं.

****

परभणी इथं बालरंगभूमी परिषदेच्यावतीनं आयोजित "यंहा के हम सिकंदर" हा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या महोत्सवाचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात १६ दिव्यांग शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, चित्रकला उत्कृष्टपणे सादर केल्या.

****

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी शासनाची बनावट वेबसाईट तयार करुन फसवणूक करणाऱ्या टोळीचा जालना पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत याप्रकरणातला मुख्य सूत्रधार बिट्टुराज यादव याला बिहारमधून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

****

No comments:

Post a Comment