Tuesday, 30 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भांडूप इथल्या बस दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या कुटुंबियांना गमावले आहे त्यांच्याविषयी सहानुभुती व्यक्त करुन जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशातून केली आहे. रात्री झालेल्या बेस्ट बस अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर ९ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना स्वतंत्र लढणार आहेत. शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. युतीसंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये 9 बैठका झाल्या, मात्र भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमुळं युती तुटल्याचा आरोप शिरसाठ यांनी केला. तर, भारतीय जनता पक्ष युतीसाठी तयार होता. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या निरापोची वाट पाहिल्याचं भाजपनेते तथा मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. शिवसेनेमुळंच युती तुटल्याचं प्रत्युत्तर सावे यांनी दिलं.

****

पुण्यातही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवेसेनेत जागावाटपावर संमती झाली नाही. त्यामुळं शिवसेना पुण्यात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मिरा-भाईंदर महापालिकेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवेसनेच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत.तसंच दोन्ही पक्षांतील नाराज उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

****

भारतीय नौदलाची ऐतिहासिक नौका आयएनए कौडिन्य काल गुजरातमधील पोरबंदर इथून मस्कत आणि ओमानच्या दौऱ्यासाठी रवाना झाली. भारतातच निर्मिती करण्यात आलेली ही नौका प्राचीन भारतीय सागरी परंपरेनुसार तयार करण्यात आली असून, भारताच्या समृद्ध सागरी वारशाला पुन्हा उजाळा देणं हा या प्रवासाचा मुख्य उद्देश आहे. या ऐतिहासिक मोहिमेत नौदलाचे चार अधिकारी आणि १३ कर्मचारी सहभागी आहेत. या प्रवासामुळे भारत आणि ओमानमधील ऐतिहासिक सागरी संबंध,सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मैत्री अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या उपक्रमाचं कौतुक करत संपूर्ण पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

****

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बीएनपीच्या अध्यक्षा खालिदा झिया यांचं आज सकाळी ढाका येथील रुग्णालयात निधन झालं, त्या ८० वर्षांच्या होत्या. दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या खालिदा झिया या अनेक दशकांपासून बांगलादेशच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होत्या आणि त्यांनी बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी, बीएनपीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं.

****

आजची शेती श्रमाधारित न राहता तंत्राधारित झाल्यास वेगाने विकास करणे शक्य असल्याचं मत कृषी आयुक्त  सुरज मांढरे यांनी व्यक्त केलं. अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या राज्यस्तरीय ॲग्रोटेक २०२५ या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, पुष्पप्रदर्शन आणि चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर गावापातळीवरच प्रक्रिया केल्यास त्यांच्या उत्पन्न वाढीसोबतच शाश्वत शेती विकासाचे ध्येय साध्य होऊ शकते असं मांढरे यावेळी म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाचा काल समारोप झाला.

****

नाताळ सुट्या, नववर्ष आणि शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर   मंदिर पहाटे चार वाजेपासून भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, वणी इथलं श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं राहणार आहे. आजपासून ४ जानेवारीदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं. दरम्यान गेल्या पाच दिवसात वणी येथील सप्तशृंगी गडावर सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आज सलग दुसऱ्या दिवशी शेअरबाजारात घसरण पाहायला मिळाली. बीएसई निर्देशांक ९४ पूर्णांक ५५ अंकांनी घसरून ८४ हजार ६०० पूर्णांक ९९ वर सुरु झाला. तर, निफ्टी निर्देशांक एक पूर्णांक २० अंकांनी घसरून २५ हजार ९४० पूर्णांक ९० अंकांवर सुरु झाला.

****

भारत आणि श्रीलंके दरम्यान महिला टी-ट्वेन्टी क्रिकेट मालिकेतला आज पाचवा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. तिरुअनंतपूरम इथं सायंकाळी सात वाजता सामना सुरु होणार आहे. भारतीय महिला संघानं पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.  

**** 

No comments:

Post a Comment