Tuesday, 30 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; उद्या छाननी

·      छत्रपती संभाजीनगरसह १४ महानगरपालिकांमध्ये भाजप शिवसेना युती तुटली

·      २०२५ हे भारतासाठी सुधारणांचं वर्ष ठरलं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      दिव्यांगांच्या विशेष शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती निश्चित

आणि

·      महिला क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका यांच्यातला पाचवा आणि अंतिम टीट्वेंटी सामना आज

****

राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. अनेक ठिकाणी आज युती आणि आघाडीचा निर्णय होऊन, उमेदवार जाहिर झाले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सगळीकडेच मोठी गर्दी पाहायला मिळाली.

उद्या या अर्जांची छाननी होईल, दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल.

**

 

 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरसह एकूण १४ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना युती तुटली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली आणि जालना या महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये तिरंगी किंवा बहुरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.

मुंबईसह कोल्हापूर, इचलकरंजी, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पनवेल इथं शिवसेनाभाजप युती अधिकृतपणे झाली आहे. पुण्यातही दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म वाटप केले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत मैत्रीपूर्ण सहमती घडवून आणली जाईल, असा विश्वास शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला.

**

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याची माहिती, शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. युतीसंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये नऊ बैठका झाल्या, मात्र भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमुळे युती तुटल्याचा आरोप शिरसाठ यांनी केला. तर, भारतीय जनता पक्ष युतीसाठी तयार होता. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या निरापोची वाट पाहिल्याचं भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.

दरम्यान, कालपर्यंत शिवसेनेच्या वतीने ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

**

जागा वाटपावर एकमत न झाल्यानं जालन्यातही भाजप शिवसेना युती अखेर तुटली. भाजपा नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज याबाबत माहिती दिली. भाजप ३५ आणि शिवसेना ३० या सूत्रानुसार जागा वाटपावर एकमत न झाल्यानं युती तुटल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, जागा वाटपाचा सन्मानकारक प्रस्ताव न मिळाल्यानं या महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच बाहेर पडला आहे.

**

लातूर महानगरपालिकेतही भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस युती होऊ शकली नाही. भाजप ७० जागा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती पक्षाचे नेते तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

**

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित होऊन, १३७ जागी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तर ९० जागी शिवसेनेचे उमेदवार असं वाटप करण्यात आलं आहे. रिपब्लिकन पक्षाला जागावाटपातून वगळल्याबद्दल पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा आपला विश्वासघात झाल्याची भावना त्यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे.

****

नाशिक इथं अनेक पक्षाच्या उमेदवारांमध्ये नाराजी दिसून आली. भाजपमधल्या

निष्ठावंताना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना उमेदवारी अर्जांचं वाटप होत असल्याचं कळाल्यानंतर उमेदवारी अर्ज असलेल्या शहराध्यक्षांच्या मोटारीचा पाठलाग करण्यात आला. तसंच एका फार्म हाऊसवर अर्जांचं वाटप होत असल्याचं कळाल्यानंतर इच्छूकांनी धडक दिली. त्याठिकाणी प्रचंड वाद झाल्याची माहिती आमच्या वार्ताहराने दिली.

****

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, प्रमुख अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांचे विचार जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्याशी संवाद साधला. नीती आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत देशाची सध्याची आर्थिक स्थिती आणि भविष्यातले प्राधान्यक्रम, यावर तज्ज्ञांना आपला दृष्टिकोन आणि मूल्यमापन सादर केलं.

****

२०२५ हे भारतासाठी सुधारणांचं वर्ष ठरलं असून, या वर्षात देशाने विविध क्षेत्रात पथदर्शी बदल केले असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केलं. सामाजिक माध्यमावरच्या एका लेखात मोदी यांनी, या सुधारणांमुळे देशाच्या विकास प्रवासाला नवी गती दिली असून, ‘विकसित भारतउभारण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक बळ देणाऱ्या ठरणार आहेत, असं नमूद केलं. कामगार कायदे आणि व्यापार करारांपासून ते लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि बाजार सुधारणांपर्यंत, देशाची विकासकथा विश्वासार्हता, स्थिरता आणि दीर्घकालीन विश्वासावर बांधली जात आहे. या उपक्रमांमुळे २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या देशाच्या प्रयत्नांनाही चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

****

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिआरडीओच्या पिनाक या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चांदीपूर इथं यशस्वी चाचणी झाली. या क्षेपणास्त्राची क्षमता १२० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेद करण्याची आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे.

****

राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीचं प्रजासत्ताक दिन शिबिर आजपासून नवी दिल्लीत सुरु झालं. सर्वधर्म पूजेपासून सुरू होणारं हे शिबीर महिनाभर चालणार आहे. एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी कॅडेट्सचं स्वागत केलं आणि प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये २८ राज्यं आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधले चोवीसशे हून अधिक राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स सहभागी होणार आहेत. सहभागींची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या असल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. युवा देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत या वर्षी २५ मैत्रीपूर्ण देशांमधले कॅडेट्स आणि अधिकारी देखील या उत्सवात सहभागी होणार आहेत.

****

राज्यातल्या दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कार्यशाळांमध्ये नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणं, नूतनीकरण न करणं तसंच पटनिर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक आणि एकसंध कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. यापूर्वी विविध शासन निर्णय, परिपत्रके आणि शाळा संहितेतील तरतुदी विखुरलेल्या स्वरूपात असल्याने समायोजन प्रक्रियेस विलंब होत होता आणि त्यामुळे न्यायालयीन प्रकरणं वाढत होती. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त, दिव्यांग कल्याण यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या अतिरिक्त संवर्ग कक्षामार्फत समायोजन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी समायोजनासाठी कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली आहे. या निर्णयामुळे समायोजन प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन शैक्षणिक सातत्य राखले जाणार असल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केलं.

****

नाताळ सुट्या, नववर्ष आणि शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे चार वाजेपासून भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, वणी इथलं श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं राहणार आहे. आजपासून चार जानेवारीदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं. गेल्या पाच दिवसात वणी इथल्या सप्तशृंगी गडावर सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातही उद्या ३१ डिसेंबरला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात ६७ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून, ८०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  जागोजागी वाहनांची आणि चालकांची तपासणी केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली.

****

राज्यभर  येत्या एक  ते  ३१  जानेवारी  दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा माह साजरा केला जाणार आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना  सडक सुरक्षा जीवन रक्षा  अशी असून, रस्ते सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडित आहे,  हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथं येत्या दोन आणि तीन जानेवारी रोजी संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्याध्यापकांचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, मुख्याध्यापकांची भूमिका, विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि आव्हाने, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण, व्यवसायाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण, सैनिकी शिक्षण यांसारख्या विषयांवर विचारमंथन होणार आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि श्रीलंका यांच्यातला २० षटकांचा पाचवा आणि अंतिम सामना आज तिरूवनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेतले चार सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.

****

No comments:

Post a Comment