Wednesday, 31 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      सोलापूर नाशिक या सहा पदरी मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

·      उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ ला राज्य सरकारची मान्यता

·      वरीष्ठ पोलिस अधिकारी सदानंद दाते यांची पोलिस महासंचालक पदी नियुक्ती

·      परीक्षा पे चर्चा’साठी तीन कोटी सहा लाखाहून अधिक जणांची नोंदणी

आणि

·      सरत्या वर्षाला निरोप तसंच नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र उत्साह

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सोलापूर नाशिक या सहा पदरी मार्गिकेला मंजुरी दिली. ३७४ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी १९ हजार १४२ कोटी रुपये खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. अनेक शहरांना जोडणाऱ्या या मार्गामुळे प्रवासाचा वेळ १७ तासांनी कमी होणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनीकुमार वैष्णव

****

राज्य सरकारनं उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ ला मान्यता दिली आहे. पाच वर्षांसाठी हे धोरण लागू राहणार असून या कालावधीत ५० लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं एक लाख १८ हजार २७५ कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश उद्योग सचिवांनी आज जारी केला. राज्य मंत्रिमंडळानं ११ डिसेंबरला याला मंजुरी दिली होती.

****

अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर आठ आर जमीन विनामूल्य दिली जाणार आहे. आज झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळानं याला मान्यता दिली. पर्यटन महामंडळाची ही जमीन वापराविना पडून होती. त्यामुळे संस्थानाने या जमिनीची मागणी केली होती.

****

राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्जांची आज छाननी झाली. दोन जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल.

 

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला भोसले तसंच ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

****

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल केले आहेत. रोख खर्चावर मर्यादा ठेवत बँक व्यवहार आणि खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मनपा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चाची कमाल मर्यादा मनपाच्या वर्गवारीनुसार निश्चित केली आहे. त्यानुसार अ वर्ग मनपासाठी १५ लाख रुपये, ब वर्गासाठी १३ लाख रुपये, क वर्गासाठी ११ लाख रुपये तर ड वर्ग मनपासाठी ९ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

****

कनिष्ठ न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश देणाऱ्या आयुक्तांच्या पत्रांना आज मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी ही पत्रं जारी केली होती. मात्र, उच्च न्यायालय तसंच सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून सूट देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय न्यायाधीश समितीने २००८ मध्येच दिले होते.

****

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक २०२४ मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रावर, करुणा शर्मा यांनी आक्षेप घेत, परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. परळी न्यायालयाने आज, सदर प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं सांगत ते फेटाळून लावले.

****

वरीष्ठ पोलिस अधिकारी सदानंद दाते यांची राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या तीन जानेवारीला सेवानिवृत्त होत असल्याने, त्यांच्या जागी दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचे दोन वर्ष ते या पदावर कार्यरत असतील.

****

नव्व्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून सातारा इथं सुरू होत आहे. उद्या दुपारी ध्वजारोहण, कवी कट्टा, गझल कट्टा आणि प्रकाशन कट्टा आदी कार्यक्रम होणार असून, तर नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी सातारा शहरातून ग्रंथ दिंडी निघेल. सायंकाळी ७ वाजता मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार केला जाणार आहे. परवा सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाने ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून आतापर्यंत तीन कोटी सहा लाख पंचावन्न हजाराहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. देशभरातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यात सहभाग घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं तसंच परीक्षांच्या अनुषंगाने त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणं, हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा पुढच्या वर्षी ११ मार्चपासून तर बारावीची परीक्षा १० एप्रिलपासून सुरू होईल. यापूर्वी या दोन्ही परीक्षा तीन मार्च रोजी सुरू होणार होत्या.

****

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र, विशेषतः तरुणाईमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलून गेली आहेत. नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नववर्ष स्वागतासाठी उपाहार गृहं, क्लब्ज आणि मनोरंजन स्थळं रात्रभर चालू ठेवायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. विविध देवालयं आणि धार्मिक स्थळांवरही सुविधा आणि सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीच्या सर्व बसस्थानकांवर दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे बसस्थानकं अधिक स्वच्छ, आरोग्यदायी ठरणार असून प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे.

****

क्षयरोग मुक्त भारत अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये अतिजोखीम गटात नोंदणी झालेल्या चार लाख व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ८८२ क्षयरुग्ण उपचार घेत आहेत, त्यापैकी ३६५ रुग्णांना पोषण आहार किट पुरवण्यात आले आहेत.

****

श्री क्षेत्र तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात आज शाकंभरी नवरात्रोत्सवात जलयात्रा काढण्यात आली. पापनाश तीर्थ कुंडातून पवित्र जलाने भरलेले कलश डोक्यावर घेत, पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिलांनी या जलयात्रेत भक्तिभावाने सहभाग नोंदवला. संबळाच्या कडकडाटात, ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिगीतांच्या निनादात आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषात ही मिरवणूक निघाली. या कलशातलं पाणी देवीच्या गाभाऱ्यात विधिवत अर्पण करण्यात आलं. जलयात्रेतील रथावर विराजमान असलेल्या शाकंभरी देवींच्या प्रतिमेची विविध प्रकारचा भाज्या आणि फळांचा वापर करून सजावट करण्यात आली होती.

****

मुंबईच्या काम्या कार्तिकेयन या १७ वर्षीय विद्यार्थिनीने दक्षिण ध्रुवावर स्कीईंग करणारी सर्वात तरुण भारतीय होण्याचा विक्रम केला आहे. जागतिक पातळीवर ती दुसरी सर्वात कमी वयाची तरुणी आहे. उणे ३० डिग्री सेल्सियस तापमानात तिने दक्षिण ध्रुवावर सुमारे ११५ किलोमीटर स्कीईंग केलं. मुंबईतल्या नौदलाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या काम्याचे वडील नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

****

केंद्र सरकारच्या क्रीडा आणि युवा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत आणि हिंदयान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी इथं जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १५ ते १७ वयोगटातील मुलांमुलींसाठी धावणे, गोळाफेक, खो खो, बड्डी अशा स्पर्धा घेण्यात आल्या.

****

दक्षिण मध्य रेल्वेने आपल्या वेळापत्रकात उद्या एक जानेवारीपासून बदल केले आहेत. प्रवाशांनी आपल्या रेल्वेच्या वेळेविषयी माहिती घेवून प्रवास करावा,सं आवाहन रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

देशाच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढला आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्ली विमानतळावरची १४८ उड्डाणं आज रद्द करण्यात आली. उत्तर भारतातली बहुतांश राज्यं थंडीने गारठली असून महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे.

 

राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल नागपुरात साडे आठ अंश, जळगाव इथं नऊ पूर्णांक तीन, तर अहिल्यानगर इथं सुमारे साडे नऊ अंश तापमानाची नोंद झाली.

मराठवाड्यात परभणी इथं ११ पूर्णांक तीन, बीड इथं ११ पूर्णांक चार तर छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment