Thursday, 1 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 January 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जानेवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

सरत्या वर्षाला निरोप देत, आणि नवी स्वप्न, नव्या संकल्पांसह २०२६ या नवीन वर्षाचं काल सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबई, पुण्यासह सर्वच शहरामंध्ये प्रमुख रस्त्यांवर काल मध्यरात्री तरुणांनी एकत्र जमून नववर्ष स्वागताचा जल्लोष केला. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण असून, राज्यातल्या पर्यटन स्थळांवर, समुद्र किनाऱ्यावर प्रामुख्यानं तरुण पर्यटकांनी गर्दी केली आहे. उपाहारगृहं, क्लब्ज आणि मनोरंजन स्थळंही काल रात्रभर सुरू होती. त्यामुळे सर्वच शहरांमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अनेकजण नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करतात त्यामुळे राज्यातली विविध देवालयं आणि धार्मिक स्थळांवरही गर्दी वाढली आहे. या सर्व ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नूतन वर्ष महाराष्ट्राचं, महाराष्ट्राच्या समृद्धीचं, विकासाचं नवपर्व आणणारं ठरेलअसा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज असून, हे वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरोअशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना, हे वर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला.

****

पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं आज शौर्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे. विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पाच हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ५० पोलिस टॉवर, दहा ड्रोनची याठिकाणी नजर असणार आहे. जिल्हा प्रशासनाने अनुयायांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

****

राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं सर्व महानगरपालिकांमध्ये दाखल झालेल्या एकंदर उमेदवारी अर्जांबाबत माहिती दिली. त्यानुसार राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या एकूण ८९३ प्रभागांमधून दोन हजार ८६९ जागांसाठी ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे.

दरम्यान धुळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येकी दोन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

लातूर महापालिकेच्या १८ प्रभागांसाठी एकूण ७५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर त्यापैकी ६९६ अर्ज वैध ठरले असून, ६३ अर्ज बाद करण्यात आले. छाननीनंतर बहुतांश प्रभागांत मोठ्या प्रमाणात उमेदवार रिंगणात असल्याने यंदाची महापालिका निवडणूक अटीतटीची होणार आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये एका जागेसाठी तब्बल २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या प्रभागात बहुरंगी लढत होणार असून प्रचाराला वेग आला आहे.

जालना महानगरपालिकेच्या १६ प्रभागांमध्ये एकूण एक हजार २६० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, छाननीअंती एक हजार २३४ अर्ज वैध ठरले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रगती मंचाची ५० वी बैठक काल पार पडली. पाच राज्यांमधल्या ४० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे, वीज, जलसंपदा आणि कोळसा यासारख्या क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. सुलभीकरणासाठी सुधारणा, कामगिरी, परिणाम हा मंत्र अनुसरून काम करावं असं त्यांनी सांगितलं.

****

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल ठाणे इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा विचार करून शिवसेनेच्या कोट्यातील किमान पाच जागा मुंबईत रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात यावर यावेळी चर्चा झाली. यावर विचार करून काही जागा सोडण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं.

****

महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा  “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला आहे. नवीन धोरणानुसार परभणी जिल्ह्याचा समावेश “झोन-१” मध्ये झाला असून, परभणीतल्या गुंतवणूकदारांना विशेष प्रोत्साहन सवलती मिळणार आहेत. तसंच परभणी जिल्हा   “डी+ श्रेणी” मध्ये कायम ठेवण्यात आला असून, या झोनमध्ये राज्यातल्या सर्वाधिक औद्योगिक प्रोत्साहन सवलती दिल्या जातात. या निर्णयामुळे नवीन उद्योग, गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पालकंमत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक मागासलेपणाचा विचार करून जिल्ह्याला विशेष झोन दर्जाची मागणी केली होती.

****

जळगांव शहर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कायदा सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश काढून तब्बल ९१ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment