Tuesday, 27 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.01.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 January 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जानेवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; विविध क्षेत्रासाठी नव्या संधी उघडणारा हा करार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात

·      मुंबई – नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये पीएम सेतू योजना राबवण्याचा निर्णय

·      राष्ट्रीयकृत आणि सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप; ग्राहकसेवेवर परिणाम

आणि

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पावणे दोन लाख विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र गीताचं सामूहिक गायन, एशिया तसंच इंडिया बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

****

भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार आज करण्यात आला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष एँतिनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देयर लेन यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. युरोपियन युनियनच्या सर्व २७ देशांसोबत झालेला हा ऐतिहासिक करार भारतीय शेतकरी, लघुउद्योग, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रासाठी नव्या संधी उघडणारा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

व्यापार, सुरक्षा, संरक्षण भागीदारी, आपत्ती व्यवस्थापन, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रात हे करार झाले, यामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातले संबंध अधिक दृढ झाले असून, हे करार सामायिक समृद्धीसाठीचा आराखडा आहेत, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी, आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. भाजप, काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, तसंच समाजवादी पक्षाचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते.

२०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, दुसऱ्या टप्प्याचं कामकाज ९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत होईल.

****

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका आठ ला आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या मार्गिकेबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

भूसंपादनासह विविध मंजुरीची कामं पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी, तसंच प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्यात यावा, अशा सूचना दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ६६ पूर्णांक १५ किलोमीटर लांबीच्या नाशिक शहर परिक्रमा मार्गासाठी एकूण तीन हजार नऊशे चौपन्न कोटी रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये पीएम सेतू योजना राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या जिल्ह्यांमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. पुढच्या टप्प्यात इतर संस्थांचा समावेश केला जाणार असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित सूक्ष्म, लघु आणि मध्यम कंत्राटदार- उद्योजकांची प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्मची निर्मिती, धुळ्यातल्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचं पुनरूज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडे शिफारस, वेगवेगळ्या कारणांसाठी दिल्या जाणाऱ्या शासकीय जमिनीच्या भाडे पट्ट्याचा कालावधी वाढवून देणं, केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातल्या शत्रू संपत्तीच्या खरेदी–विक्रीसाठी मुद्रांक शुल्क माफ करणं इत्यादी निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतले.

****

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यात मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

****

बँकाचा कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करावा या प्रमुख मागणीसाठी आज सर्व राष्ट्रीयकृत आणि सार्वजनिक बँकांचे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर आहेत. बँक कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी करत आहेत. मात्र, वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं नाईलाजानं आपण संपावर जात आहोत, असं आंदोलक कर्मचारी संघटनांनी म्हटलं आहे. काही बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या शाखांसमोर मागणीच्या समर्थनासाठी निदर्शनंही केली. या मागणीवर विचार झाला नाही तर बेमुदत संपावर जाण्याची तयारी असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. गेले तीन दिवस सुट्ट्यांमुळे बँकांचं कामकाज बंद होतं, त्यामुळे ग्राहकसेवांवर त्याचा काहीसा प्रभाव दिसून येत आहे.

धाराशिव इथं बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शनं केली. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे नेते गोरखनाथ लवटे यांनी मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. नंदुरबार मध्ये स्टेट बॅक कर्मचारी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. धुळे इथंही या संपाचा परिणाम दिसून आला. पारंपारिक बँकींग व्यवहार ठप्प झाले असून, शहरातल्या स्टेट बँक शाखेसमोर बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तब्बल १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी एकाच सुरात महाराष्ट्र गीताचं समूहगान केलं असून, या उपक्रमाची एशिया बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. दशसूत्री उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या मनामनात राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी, हा उदात्त उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. या सोहळ्याला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत उपस्थित होते. या जागतिक विक्रमाची नोंद केल्याचं प्रमाणपत्र यावेळी मान्यवरांना सुपुर्द करण्यात आलं.

****

धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या केमवाडी ग्रामस्थांनी सावरगाव ते गळवाडी या मुख्य रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने, संतप्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. येत्या पाच तारखेपर्यंत जर ठोस निर्णय झाला नाही, तर गावातले सुमारे दोन हजार २०० मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत, असं या निवेदनात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचा सन्मान करण्यात आला. दीर्घकाळापासून पत्रकार भवनासाठी जागेची मागणी प्रलंबित होती. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सुविधांसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं.

****

नांदेड इथल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे बनावट व्हाउचर वापरून जवळपास एक कोटी साडे नऊ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँक निरीक्षक सतीश गर्जे यांनी तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी बँकेचे संचालक बालाजी शिंदे यांच्यासह इतर ४१ बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झिम्बाब्वेसोबत सुरु असलेल्या साखळी सामन्यात भारताने ३५३ धावांचं लक्ष्य दिलं आहे. झिम्बाब्वेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून विहान मल्होत्राने नाबाद १०९ धावा केल्या. झिम्बाब्वेची फलंदाजी सुरु झाली असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या चार षटकांदोन बाद १७ धावा झाल्या होत्या.

****

No comments:

Post a Comment