▼

Monday, 16 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर-फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्यासोबत विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग

·      देशभरातला नक्षलवाद मार्चअखेरीस संपुष्टात येणार-केंद्रीय गृहमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      सीबीएसईच्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षांना उद्यापासून प्रारंभ

आणि

·      धाराशिव जिल्ह्यात संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येत असून दोन्ही नेत्यांची उद्या मुंबईत लोकभवन इथं भेट होणार आहे. उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा ते यावेळी घेतील. त्यानंतर ते भारत फ्रान्स नवेन्मेष वर्ष २०२६ या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील. दोन्ही देशातले मोठे व्यावसायिक, उद्योगपती, संशोधक, आणि नवोन्मेषकर्मी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. मॅक्राँ यांची ही चौथी भारत भेट असून मुंबईला ते प्रथमच भेट देणार आहेत. नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेचं आमंत्रण मोदी यांनी मॅक्राँ यांना दिलं आहे.

****

देशभरातला नक्षलवाद मार्चअखेरीस संपुष्टात येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. आज नवी दिल्ली इथं दिल्ली पोलीस दलाच्या ७९ व्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमात ते बोलत होते. ११ राज्यांमधला नक्षलवादी दहशतवाद हा नेहमीच देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक मोठं आव्हान राहिला होता, मात्र लवकरच तो पूर्णपणे संपुष्टात येईल, असं शहा यांनी नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

****

इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती देशसेवा आहे, असं प्रतिपादन फलोत्पादन, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या ‘संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६’ या अभियानाच्या मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय समारोप समारंभात ते आज बोलत होते. १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हे अभियान राबवण्यात आले. ‘तेल आणि वायू वाचवा, हरित ऊर्जेचा स्वीकार करा’ हे या अभियानाचे घोषवाक्य होते. या अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि गृहिणींना इंधन बचतीचं तंत्र शिकवण्यात आले.

****

देशातल्या पहिल्या हवामान परिषदेला उद्यापासून मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलात जिओ वर्ल्डमध्ये सुरुवात होणार आहे. तीन दिवस होणाऱ्या या परिषदेसाठी देशाचे दोन अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या दोन्ही अंतराळवीरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था, सामाजिक क्षेत्रातले नेते, उद्योग क्षेत्रातले शाश्वतता तज्ञ एकत्रित येणार असून भारत आणि ग्लोबल साऊथसाठी हवामानविषयक उपायांवर चर्चा करणार आहेत.

****

राज्य अल्पसंख्यांक विकास विभागाने ७५ शाळांच्या अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्याच्या प्रमाणपत्र वाटपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यात शासकीय दुखवटा असतानाच्या काळात ही प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्यानं या प्रक्रियेवर आक्षेप घेतला जात आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी तसंच दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.

****

दहशतवादी अबु सालेम याने दाखल केलेला मुदतपूर्व सुटकेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळला. भारत आणि पोर्तुगाल सरकारमध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार कारावासाच्या २५ वर्षांनंतर सुटका मिळावी यासाठी त्याने अर्ज केला होता. मात्र त्याच्या कारावासाला २५ वर्ष झाली नसल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करत, सदरील अर्ज फेटाळून लावला.

****

प्रार्थनास्थळांवर महिलांबाबत भेदभाव होत असल्यासंदर्भात दाखल याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांच्या संविधान पीठासमोर येत्या ७ एप्रिल पासून सुरु होणार आहे. केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधातल्या पुनर्विचार याचिकेचाही यात समावेश आहे. ही सुनावणी २२ एप्रिलपर्यंत चालेल. यासंदर्भात सर्व याचिकाकर्त्यांनी १४ मार्चपर्यंत आपापलं म्हणणं सादर करावं, असं न्यायालयानं सांगितलं आहे.

****

बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटीई अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरूवात होत आहे. ही प्रक्रिया राबवण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याची माहिती प्राथमिक विभागाचे शालेय शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. ही प्रवेश प्रक्रिया १० मार्चपर्यंत चालणार असून अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहनही विभागातर्फे करण्यात आलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षांना उद्यापासून प्रारंभ होत आहे. सकाळी साडे दहा ते दुपारी दीड या वेळेत निर्धारित परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेदरम्यान नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील अंबुलगा माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अनियमिततेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज या केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी विविध गंभीर त्रुटी आढळून आल्या. या अनियमिततेसंदर्भात संबंधित केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, हे केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही कर्डिले यांनी दिले.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातल्या विविध परीक्षा केंद्रावरील सात विद्यार्थ्यांवर कॉपी केल्या प्रकरणी नियमांनुसार कारवाई करण्यात आली असून संबंधित केंद्रसंचालक आणि बैठे पथकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात झाली. जिल्ह्यातल्या सर्व विभाग कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्त्यांनी या टप्प्यात काम करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभाग प्रमुखांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उमेद बचत गटातील महिलांच्या स्टॉलची पाहणी केली.

बाईट - कीर्ती किरण पुजार

****

छत्रपती संभाजीनगर इथले गरूड अ‍ॅडस् चे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी देण्यात येणारा गोविंद सन्मान पुरस्कार यंदा ज्येष्ठ पशुवैज्ञानिक डॉ. दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांना जाहीर झाला आहे. २८ मार्च रोजी होणाऱ्या ‘गोविंद देशपांडे स्मृति सोहळ्यात’ हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

सोलापूर इथं आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेजण दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेक्रेटरी पदी विधीज्ञ अभय टाकसाळ तर सहसचिव पदी सय्यद अनिस यांची निवड झाली आहे. आज झालेल्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. भाकपच्या शतकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याचाही निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्याच्या लोहा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत दिगंबर शिंदे या कर्मचाऱ्याला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडलं. तक्रारदाराची ४६ दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी शिंदे यानी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आढावा घेतला. गरजू लाभार्थ्याला वेळेत तसंच गुणवत्तापूर्ण धान्य उपलब्ध करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून कोणतीही तक्रार आल्यास तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश ढवळे यांनी दिले.

****

क्रिकेट

आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी दिल्ली इथं झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमिरातचा पाच गडी राखून पराभव केला. कोलकाता इथं इंग्लंड आणि इटली यांच्यात दुसरा सामना सध्या सुरू आहे. तर तिसरा सामना श्रीलंकेत पल्लेकेले इथं ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

****

No comments:

Post a Comment