Saturday, 14 March 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 14 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या सिलचर इथं २३ हजार ५५० कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांचं आज उद्घाटन केलं. ईशान्य भारतातील पहिला प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड चार-पदरी शिलाँग-सिलचर द्रुतगती मार्गिकेचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं.

****

नागपूरमध्ये उभारण्यात आलेला भव्य राष्ट्रध्वज स्थानिक जनतेच्या राष्ट्राभिमानाचं प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर इथं ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर, नागपूर महानगरपालिका आणि एका वृत्तपत्र समुहाने साकारलेल्या २०० फूट उंच भारतीय ध्वजाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली, याची सदैव जाण ठेवून हा भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे.

****

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने येत्या १ एप्रिलपासून ‘फास्टॅग’ वार्षिक पासचे दर अडीच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन हजार रुपयांत मिळणारा हा वार्षिक पास आता ३ हजार ७५ रूपयांना मिळणार आहे.

****

पुढील तीन वर्षांत महाराष्ट्र जागतिक माहिती साठवणूक केंद्र अर्थात ‘डेटा सेंटर’ उद्योगात आघाडीचं राज्य म्हणून उदयास येईल, असा विश्वास पणन तथा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम विभागातील भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित सातव्या ‘डेटा सेंटर’ आराखडा परिषदेत काल ते बोलत होते. सध्या भारतातील सुमारे ५० टक्के ‘डेटा सेंटर’ महाराष्ट्रात आहेत, आणि सुमारे ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी ८० सामंजस्य करार करण्यात आले आहे.

****

राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या नावात बदल करण्यात येणार असून हा विभाग आता “दिव्यांग सक्षमीकरण विभाग” या नावाने ओळखला जाणार आहे. तसंच विभागाच्या कामकाजात अधिक परिणामकारकता आणण्यासाठी विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

****

बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केलं आहे. दिव्यांगांना एकाच संकेतस्थळावर सर्व लाभ मिळविण्यासाठी सोयीचे व्हावं यासाठी शासनाने या पोर्टलची निर्मिती केली आहे.

****

केंद्र शासनाचं धोरण आणि राज्याची गरज पाहता राज्याचं स्वतंत्र मोबाइल टॉवर धोरण तयार करण्याबाबत अभ्यास सुरु आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत दिली. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांसोबत यासंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्यात येईल तसंच राज्यातल्या अनधिकृत मोबाईल टॉवर्सचं सर्वेक्षण करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातली वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे होणारं आयटी कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर इथं आयटी पार्क उभारण्याबाबत शासन सकारात्मक असून महसूल विभागाची प्रक्रिया पूर्ण होताच, संबंधित जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून, प्रकल्पाची कार्यवाही जलदगतीनं केली जाईल, अशी ग्वाहीदेखील उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातील चढ्या दरानं खताची विक्री करणाऱ्या पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयानं ही कारवाई केली.

****

शासनाच्या अमृत संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून दोन दिवसीय ‘अमृत पेठ’ मेळाव्याचा आज प्रारंभ झाला. स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना आणि स्थानिक कारागिरांना बाजारपेठ मिळवून देणं हा या मेळाव्याचा उद्देश आहे. स्थानिक उद्योजक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांच्या विविध उत्पादनांची दालनं या मेळाव्यात असतील. शहराच्या बीड बायपास परिसरातील शिवम् मंगल कार्यालयात सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत हा मेळावा सर्वांसाठी खुला राहणार आहे.

****

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद इथं सायंकाळी साडेसात वाजता अंतिम सामना होईल. काल उपांत्य फेरीच्या सामन्यात, भारतानं इटलीचा १-० ने पराभव केला, या विजयासह भारतीय संघानं विश्वचषकातील आपलं स्थान निश्चित केलं आहे.

****

No comments:

Post a Comment