Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०५ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीवर
अनेक निर्बंध लादले असले तरी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी
दिली आहे.
पर्शियन आखाताच्या प्रदेशात, चारशेहून अधिक भारतीय खलाशांसह एकंदर
१७ भारतीय जहाजं आहेत. सागरी मालवाहतूक संचालनालय, जहाज मालक कंपन्या आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या
संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
या पार्श्वभूमीवर, पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्रालयानं देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची उपलब्धता सुनिश्चित
करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी पेट्रोल आणि
डिझेलची घाबरून खरेदी करणं, तसंच एलपीजीचं अनावश्यक बुकिंग करणं टाळावं, असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. तसंच, सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशिया
संघर्षाच्या दरम्यान ईराणमध्ये अडकलेल्या एकंदर ३४५ भारतीय मच्छीमारांना काल संध्याकाळी
आर्मेनिया मार्गे सुरक्षितपणे चेन्नईमध्ये आणण्यात आलं.
***
आखाती देशांसोबत भारताचे भक्कम संबंध असल्यानं या कठीण
काळात तिथं राहणाऱ्या भारतीयांचं संरक्षण करण्यास मदत होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी काल केरळमधील तिरुवल्ला इथं एका जाहीर सभेला संबोधित करताना नमूद केलं आहे.
***
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ईराणला होर्मुज
सामुद्रधुनी खुली करण्यासाठी येत्या ४८ तासांचा अंतिम इशारा दिला आहे. या अवधीनंतर
ईराणला गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागेलं, असं ट्रंप यांनी समाजमाध्यमावरील
एका संदेशात म्हटलं आहे. युद्ध समाप्तीसाठी धोरणात्मक चर्चेच्या मुद्याचा पुनरुच्चार
त्यांनी केला आहे. इराणने मात्र संघर्ष समाप्त करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव एकतर्फी
असल्याचं सांगत नकार दिला आहे.
***
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ख्रिस्ती बांधवांना
आज असलेल्या ईस्टर संडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुज्जीवनाचा
हा दिवस आपल्याला करुणा आणि मानवतेची मूल्ये अंगीकारण्याची प्रेरणा देतो असं सांगत
त्यांनी नागरिकांना उज्वल भविष्यासाठी सुसंवाद, शांतता आणि बंधुत्व वाढवण्याचा निर्धार करण्याचं आवाहन
केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टरच्या शुभेच्छा देतांना हा पवित्र दिवस नाविन्य
आणि आशेचा सोहळा साजरा करणारा असल्याचं नमूद केलं आहे.
***
वैश्विक ज्ञानाचं भारतीयीकरण आणि भारतीय ज्ञानाचं वैश्विकरण
करणं, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचं
प्रमुख उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. विश्वेश्वरैया
राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेत विविध संस्थांच्या सहयोगानं आयोजित ‘महाराष्ट्र ज्ञान
सभा-२०२६’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री
बोलत होते. नव्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातून विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण या
संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र ज्ञान सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातील शिक्षण
व्यवस्था आता जगभरातील विद्यापीठांशी स्पर्धा करण्यास सक्षम आहे. तसंच नव्या शिक्षण
धोरणाच्या माध्यमातून मानव संसाधन तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं फडणवीस म्हणाले.
***
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील १३ लाख, ३३ हजार ग्राहकांनी महावितरणकडे आपला
मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. यासाठी नव्यानं
नोंदणीसाठी तसंच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार
कछोट यांनी केलं आहे.
***
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न
महाविद्यालयांतील पदवी परीक्षा परवा सात एप्रिल तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा
येत्या १६ एप्रिलपासून सुरू होत आहेत. यावेळी पदवीच्या परीक्षा ३८, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा
३२ दिवसांत पूर्ण होतील. पदवी परीक्षेसाठी दोन लाख ८१ हजार, तर पदव्युत्तर परीक्षेसाठी ४१ हजार
परीक्षार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर
बी. एन. डोळे यांनी दिली.
***
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथलं उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, उद्या सोमवार ६ एप्रिलपासून स्वतःच्या
मालकीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित होत आहे. त्यामुळं नागरिकांनी वाहन
नोंदणी, वाहन परवाना, कर भरणा तसंच इतर सर्व परिवहन कार्यालयाशी
संबंधित कामकाजासाठी यापुढे लोखंडी सावरगाव इथल्या नवीन कार्यालयात आपली कामं करून
घ्यावीत, असं आवाहन अंबाजोगाईचे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केलं आहे.
***
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नूतन आयुक्त अमोल येडगे
यांनी मावळते आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीकांत यांनी येडगे
यांचं मनपा कार्यालयात स्वागत करत, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
***
आगामी ३६ तासांत मराठवाड्यासह विर्दर्भ तसंच राज्यालगतचा
भाग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामन विभागांनं दिला आहे. या ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी तीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान
विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे पिकांचं
आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.या पावसानं हळद,कांदा, ज्वारी, मका, गहू , आंब्यासह अन्य फळं आणि भाजीपाला याचं ही नुकसान होत आहे. राज्याचे विपणन मंत्री
जयकुमार रावल यांनी शासन शेतकऱ्यांसोबत ठामपणे
उभं असल्याचं आश्वासन दिलं आहे.
****
No comments:
Post a Comment