Thursday, 2 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      बदलत्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर फक्त कार्यकुशलच नव्हे तर नागरिक-केंद्रित प्रशासनाची आवश्यकता असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोरासायनिक उत्पादनांवरचं सीमाशुल्क तात्पुरतं रद्द

·      बुद्धी आणि सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा

आणि

·      रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर इथं कासव महोत्सवाला प्रारंभ

****

देशाच्या वेगानं बदलत्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर फक्त कार्यकुशलच नव्हे तर नागरिक-केंद्रित प्रशासनाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कर्मयोगी साधना सप्ताह २०२६ या कार्यक्रमात एका चित्रफितीच्या माध्यमातून संबोधित करतांना पंतप्रधानांनी, क्षमता निर्माण आयोग आणि मिशन कर्मयोगी हे प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षांशी सुसंगत, आधुनिक, समर्पित आणि प्रतिसादक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं, नमूद केलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिक 'देवो भव' या मूलमंत्राचा अंगीकार करुन सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विकसित भारत केवळ पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानावरच नव्हे, तर कौशल्यपूर्ण आणि समर्पित मानवी संसाधनावर उभारला जाईल, शासनाचा मुख्य भर जीवन सुलभता आणि नागरिकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यावर असावा, असंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं.

****

वृत्त वाहिन्यांचे टीआरपी रेटिंग चार आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. युद्ध किंवा संकटाच्या काळात अनावश्यक, खळबळजनक आणि तर्कहीन वृत्तांकनामुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. ही बाब लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचं, मुरुगन यांनी सांगितलं.

****

ग्राहकांना विजेचा प्रीपेड मीटर बसवणं अनिवार्य नसल्याचं ऊर्जामंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. प्रीपेड मीटरच्या सक्तीचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं. मात्र, विजेचं बिल वारंवार थकवणाऱ्यांना प्री-पेड मीटरपद्धत स्वीकारावी लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव संमत झाला तसंच २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात, संसदेत वित्त विधेयक २०२६ आणि विनियोग विधेयक २०२६ याला मंजुरी मिळाली. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पश्चिम आशियामधल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारची भूमिका मांडली.

****

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआयने यावर्षी मार्च महिन्यात २२ अब्ज ६४ कोटी व्यवहारांचा टप्पा गाठला आहे. सामाजिक माध्यमावरील एका संदेशात ही माहिती देताना, वित्तीय सेवा विभागाच्या वतीने, डिजिटल पेमेंट वापरल्याबद्दल नागरिकांचे आभार मानण्यात आले. तसंच युपीआयचा वापर असाच पुढे सुरू ठेवण्याचं आवाहनही संबंधित विभागाकडून करण्यात आलं.

****

पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने पेट्रोरासायनिक उत्पादनांवरचं सीमाशुल्क तात्पुरतं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत येत्या ३० जूनपर्यंत लागू राहील. प्लास्टिक, वेष्टनं, औषधं, रसायनं, वस्त्रं, वाहनांचे सुटे भाग, खतं आणि इतर औद्योगिक उत्पादनांमधे वापरली जाणारी रसायनं, अशा विविध उत्पादनांचा यात समावेश आहे. सध्याच्या भूराजकीय संघर्षाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर झाला असून त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये या हेतूनं सध्या ही सवलत दिल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं.

****

पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही उद्योगाला राज्य शासन अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहरत झालेल्या बैठकीत रावल बोलत होते. स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसंच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचं, रावल यांनी सांगितलं.

****

भारत सरकार, क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सर्व शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यक्षम करणं, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणं आणि तंत्रज्ञानाची सवय दैनंदिन कामकाजात करुन सक्षम करणं हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

****

हनुमान जन्मोत्सव आज सर्वत्र उत्साहाने साजरा झाला. बुद्धी आणि सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या हनुमंताच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा दिसून आल्या. सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिरात हनुमान जन्म सोहळ्यासह अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथं देशातली सर्वात उंच असलेल्या हनुमान मूर्ती परिसरात भाविकांनी आज मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली. आज मूर्तीला महाजलाभिषेक घालण्यात आला, यासोबत विधीवत पूजेनंतर रिमोट कंट्रोलद्वारे या मूर्तीला भव्य पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, तसंच विदर्भात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नुकसानाच्या तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले असून, अहवालानंतर नुकसानभरपाईबाबत निर्णय घेतला जाईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या बाबत अधिक माहिती देतांना बावनकुळे म्हणाले -

बाईट - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

****

कासवाच्या पिलांचा अंड्यातून बाहेर पडून समुद्रापर्यंतचा छोट्याशा अंतराचा प्रवास, अत्यंत रोमांचक असतो. कोकणात आयोजित होणाऱ्या कासव महोत्सवातून हा रोमांच सहज अनुभवता येतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरच्या किनाऱ्यावर कालपासून कासव महोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण एप्रिल महिनाभर हा महोत्सव सुरू राहणार आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -

बाईट – अनिकेत कोणकर, पीटीसी रत्नागिरी

****

जागतिक ऑटिझम अर्थात स्वमग्नता दिनानिमित्त आज लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. स्वमग्नता या विषयावर समाजात व्यापक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा तसंच एमएच-सीईटी ही परीक्षा एकाच दिवशी आली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.

****

नाशिक जिल्हा न्यायालयाने भोंदू बाबा अशोक खरात याला आज आणखी एका गुन्ह्यासाठी आठ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या आधीही खरात याला न्यायालयाने ३ वेळा पोलिस कोठडी दिली आहे. खरातला आज सुरक्षेच्या कारणास्तव दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर केलं होतं.

****

No comments:

Post a Comment