Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 April 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०४ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेने मंजूर केलेल्या जन विश्वास
विधेयकामुळे देशातील कायदेशीर प्रक्रियेत मोठे बदल होऊन व्यापार सुलभता वाढणार आहे, असा विश्वास केंद्रीय संस्कृती मंत्री
गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज व्यक्त केला. या विधेयकामुळे किरकोळ तांत्रिक गुन्ह्यांसाठी
आता कारावासाऐवजी केवळ दंड आकारला जाईल. या निर्णयामुळे न्यायालयीन प्रक्रिया अधिक
वेगवान आणि तर्कसंगत होण्यास मदत होणार आहे, असं शेखावत यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात नमूद
केलं. या महत्त्वपूर्ण पावलामुळे व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि न्यायालयांवरील
कामाचा बोजाही कमी होईल असंही त्यांनी नमूद केलं.
****
'जन विश्वास विधेयक २०२६' हे भारताच्या प्रगत भविष्यासाठी ऐतिहासिक पाऊल असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ७९ कायद्यांमधील १ हजारहून अधिक ब्रिटिशकालीन
जाचक तरतुदी रद्द झाल्यामुळे देशात व्यापारातील सुलभतेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
उत्तर प्रदेशचे दहशतवाद विरोधी पथक-‘एटीएस’ने
दहशतवादी कारवायांची योजना आखणाऱ्या संशयित गटातील चार सदस्यांना अटक केली आहे. हा गट पाकिस्तानस्थित सुत्रधारांशी
संबंधित असल्याचा संशय आहे. या गटाचा मेरठ इथला मुख्य संशयित आरोपी साकिब उर्फ ‘डेव्हिल’
हा असून, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सुत्रधारांच्या
संपर्कात होता. या गटाकडून रेल्वे पायाभूत सुविधांसह महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ल्यांची
योजना आखण्यात आली होती, अशी माहिती समोर आली
आहे.
****
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या
क्षमतावृद्धीसाठी केंद्र शासनाच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत दोन ते आठ एप्रिल या कालावधीत
‘महा-साधना सप्ताह’ राबवण्यात येत असून, या उपक्रमात विभागातील सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. भारत सरकारच्या
‘क्षमता विकास आयोग’ आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष
प्रशिक्षण उपक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘कर्मयोगी
भारत’ पोर्टलवर ‘लॉग इन’ करून किमान चार तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. या उपक्रमाचा
मुख्य उद्देश, शासकीय यंत्रणेला अधिक
कार्यक्षम, तंत्रज्ञानस्नेही आणि परिणामकारक
बनवणं हा आहे. डिजिटल गव्हर्नन्स, वेळ व्यवस्थापन, निर्णयक्षमता वाढवणं, तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित
साधनांचा प्रभावी वापर या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.
****
पुणे रेल्वे विभागाने २०२५-२६ या
आर्थिक वर्षात २ हजार २३८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून प्रवासी आणि तिकीट तपासणी
उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली आहे. पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा
यांनी काल पत्रकार परिषदेत या वर्षभराच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. यंदा पुणे
विभागाच्या प्रवासी महसुलामध्ये १३ टक्क्यांची वाढ होऊन तो १ हजार ६५७ कोटींवर पोहोचला
आहे तर तिकीट तपासणीत ५७ टक्क्यांच्या विक्रमी वाढीसह ३० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला
आहे. दरम्यान, सणांच्या काळात १ हजार
१०९ विशेष गाड्या चालवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण
पाटील यांच्या नाविन्यपूर्ण ‘सहज प्रणाली’ आणि ‘महसूल मित्र’ या उपक्रमांची राज्य सेवा
हक्क आयोगाने विशेष दखल घेतली आहे. ‘एआय’
तंत्रज्ञानावर आधारित ‘बुलढाणा सहज सेवा महसूल’ या आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील
शेतकरी आणि सर्व स्तरातील नागरिकांना ऑनलाइन मोबाईलद्वारे कागदपत्र उपलब्धतेची सुविधा
पुरवण्यात येत आहे. मुंबईत पार पडलेल्या आयोगाच्या ३१ व्या बैठकीत या उपक्रमांचं सादरीकरण
करण्यात आलं. यावेळी आयोगाने या उपक्रमांची प्रशंसा करत, ही सुविधा संपूर्ण महाराष्ट्रात लागू
करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे.
****
थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरु असलेल्या
जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेच्या अंतिम फेरीत
भारताने तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. महिला गटात भारताच्या शीतल देवी आणि
पायल नाग यांचा समावेश असलेल्या संघाने कझाकिस्तानवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं.
पुरुष गटात भारताच्या तोमान कुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांच्या संघाने चिनी तैपेईच्या
संघावर विजय मिळवत दुसरं सुवर्णपदक जिंकलं तर भारताच्या शीतल देवी आणि तोमान कुमार
यांच्या मिश्र संघाने इंडोनेशियाच्या संघावर मात करत तिसरं सुवर्णपदक कमावलं आहे.
****
राज्यात येत्या दोन दिवसांत मध्य
महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी
पाऊस पडेल, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, सोसाट्याचा वारे वाहतील तसंच विजांचा
कडकडाट होईल, अशी शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे. याच काळात कोकणात हवामान कोरडं राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment