Sunday, 5 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      भारत इराणसह इतर चाळीस देशांमधून कच्च्या तेलाची आयात करत असून खरेदीच्या रकमा अदा करण्यात समस्या नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांचं स्पष्टीकरण

·      गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

·      महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

आणि

·      संभाजीनगर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेत आता रेशन दुकानांमधून गहू, तांदळासोबत मकादेखील देणार

****

इराणसह इतर चाळीस देशांमधून कच्च्या तेलांची भारत आयात करत आहे. खरेदीसाठीची रक्कम अदा करण्यात कसलीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. अशी समस्या निर्माण झाल्यानं भारताच्या वाडीनार इथं येणारं इराणी कच्च्या तेलाचं एक जहाज चीनकडे वळवण्यात आल्याचं वृत्त समाजमाध्यमावर प्रसिद्ध झालं होतं. हे वृत्त खोडसाळपणाचं आणि पूर्णतः चुकीचं असल्याचं पुरी यांनी स्पष्ट केलं.

****

दरम्यान, इराण अमेरिकेतील युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणला होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अंतिम इशारा दिला आहे. त्यानंतर त्यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागेल, असं ट्रंप यांनी समाजमाध्यमावर एका संदेशात म्हटलं आहे. मात्र संघर्ष समाप्त करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव एकतर्फी असल्याचं सांगत इराणनं त्याला नकार दिला आहे.

****

मूडीज या पतमानांकन संस्थेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दराचा अंदाज ६ पूर्णांक ८ दशांश टक्क्यावरुन ६ टक्क्यापर्यंत खाली आणला आहे. पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे आर्थिक वृद्धीची गती मंदावेल आणि महागाईत वाढ होईल, असा अंदाज मूडीजनं वर्तवला आहे.

****

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील बाधित भागांची आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मंत्री महाजन यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये दिली. अखिल भारतीय संत संमेलनाच्या कार्य समितीच्या बैठकीनंतर आज माध्यमांशी ते बोलत होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर पंचनामा केला जातो आणि त्यानंतर भरपाई दिली जाते. हीच पारंपारीक पध्दत राबवण्यात येत असल्याची माहीती त्यांनी दिली.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात, बनावट खात्यांव्दारे झालेल्या उलाढालीची सक्त वसुली संचनालयाच्या वतीनं तपासणी करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

****

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीची आणि गारपिटीची दखल घेतली असून, अधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. चौहान यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, या संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

****

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज बिनविरोध निवड झाली. बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदासाठी निवडणूक अपेक्षित होती. मात्र, अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली. खो-खो संघटनेत अनेक वर्षांनी हा सन्मान एका महिलेला मिळाला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर येथे सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थीना आता रेशन दुकानांमधून गहू आणि तांदळासोबत मकादेखील वितरित केला जाणार आहे. अंत्योदयच्या कार्डधारकांना पुढील तीन महिने प्रति कार्ड १० किलो याप्रमाणे मका दिला जाणार आहे. जिल्ह्यात रेशनचे एकूण ५ लाख ३८ हजार लाभार्थी आहेत. तर स्वस्त धान्य दुकानांची संख्या ही १ हजार ८०२ इतकी आहे. या स्वस्त धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थीना दर महिन्याला धान्याचा मोफत पुरवठा होत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये दामिनी पथकाने आज दोन चिमुकल्यांच्या अपहरणाचा डाव उधळून लावला. दामिनी पथक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालत असताना नियंत्रण कक्षातून त्यांना सिडको बसस्थानकावर दोन चिमुकले रडत असल्याचे फोनवरून सांगण्यात आले. दामिनी पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले असता तिथे रिक्षाचालकांकडून दोन लहान मुले २ ते ३ तासांपासून एकटेच फिरत असल्याची माहिती मिळाली. यातील एक मुलगा अंदाजे २ वर्षांचा तर दुसरा ८ वर्षांचा होता. दामिनी पथकाने मुलांना ताब्यात घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. एक मुलगा चितेगावचा तर दुसरा वाळूजचा होता. मुलांच्या नातेवाकांचा शोध घेण्यात येऊन त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजारपेठेत एक महिना आधीच आणला आहे. त्यामुळे गहू, ज्वारीची आवक येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढली असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची १ हजार ५७ क्विंटल आवक झाली. गव्हाला सरासरी प्रतिक्रिष्टल २ हजार १५६ भाव मिळाला आहे. ज्वारीच्या भावात वाढ झाली आहे. बाजारपेठेत २०६ किंवटल ज्वारी आली. ज्वारीला ४ हजार ३०० भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या पिकामध्ये सोयाबीनचाही समावेश आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी परिसरात विमान इंधन चोरी प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत तब्बल ८८ लाख ५८ हजार ७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. ५ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी गुप्त माहितीच्या आधारे गव्हाणवाडी येथील हॉटेल महाराजाच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरमधून ड्रममध्ये विमान इंधन काढताना तीन आरोपी रंगेहात पकडले गेले.

****

आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे वीज क्षेत्रात क्रांती घडतेय. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील २ लाख ३२ हजार २९९ घरगुती ग्राहकांना आतापर्यंत जवळपास अडीच कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी स्मार्ट मीटर आवश्यक आहे. ते बसवण्यासाठी ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.

****

जगभरात आज ईस्टरचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. व्हेटिकन सिटीमध्ये पोप लिओ चौदावे यांनी काल बेसिलिका मध्ये ईस्टर प्रार्थना केल्यानंतर जगभरात ईस्टर सणाला सुरुवात झाली. पोप यांनी जागतिक पातळीवरच्या अशांततेच्या वातावरणात शांततेसाठी आणि बंधुत्वासाठी प्रार्थना केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस सत्य, त्याग आणि प्रेमाचा संदेश देणारा आहे असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या विविध चर्चेसमधे आज विशेष प्रार्थना आणि प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या अपंगांसाठीच्या जागतिक धनुर्विद्या मालिकेमध्ये भारताची अठरा वर्षीय तिरंदाज पायल नाग हिनं, ‘कंपाउंड महिलागटाचं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय नसतानाही अचाट जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक जिंकणारी ती जगातील पहिलीच पॅरा तिरंदाज ठरली आहे. तर, स्वाती चौधरी आणि आदिल मोहम्मद नझीर अन्सारी या महिलांच्या जोडीनं डब्ल्यु वन मिक्स्ड टीमप्रकारात चमकदार कामगिरी करत रौप्य पदक आपल्या नावावर केलं. या स्पर्धेत भारतानं सात सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कास्य पदकांसह १६ पदकं जिंकली आहेत.

****

आयपीएलच्या लढतींमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात थोड्याच वेळात सामना होणार आहे. बेंगळुरू इथं एम. चिन्नास्वामी मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

****

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो स्पर्धेत नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई संघ पात्रता फेरीत दाखल झाले. पात्रता फेरीत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांचा सामना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्यात रंगला. यात छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ संघ ६ गुणांच्या फरकानं विजयी झाला.

****

No comments:

Post a Comment