Tuesday, 7 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्रात एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा पुरवठा विभागाचा निर्वाळा

·      बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल, बारामतीत काँग्रेसकडून उमेदवार

·      बीड जिल्ह्यात रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याप्रकरणी चार वैद्यकीय व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

·      दिशा अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल लातूर जिल्ह्यातल्या चार शाळांची राज्यस्तरावर निवड

आणि

·      जागतिक आरोग्यदिनानिमित्त आरोग्य विभागाकडून आज विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन

****

राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा निर्वाळा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिला आहे. काल मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या २५ लाख ३६ हजारांवर पोहोचली असून, एका महिन्यात ७३ हजार नवीन जोडण्या देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या ठिकाणी पीएनजी नेटवर्क पोहोचलेलं आहे त्याठिकाणी ग्राहकांनी फक्त नोंदणी करणं आवश्यक आहे, ज्या भागांमध्ये पीएनजी शक्य नाही त्या ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

**

राज्याचे पुरवठा नियंत्रक चंद्रकांत डांगे यांनी इंधन पुरवठा सुनिश्चितीबद्दल माहिती दिली. स्थलांतरित कामगारांसाठी पाच किलो छोट्या गॅस सिलिंडरची वाढीव मागणी तसंच ऑटो रिक्षांसाठी एलपीजीची वाढीव मागणी केंद्र सरकारकडे नोंदवल्याचं डांगे यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट - चंद्रकांत डांगे

****

एअर इंडियाने इस्रायलला जाणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या आहेत. तेल अविवला जाणारी विमान उड्डाणं येत्या ३१ मे पर्यंत स्थगित केल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही इस्रायली कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्यांनी तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानसेवा स्थगित केल्या आहेत. इस्रायलमध्ये वास्तव्याला असणारे ४० हजार भारतीय यामुळे तिथे अडकले आहेत.

****

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना काल शपथ दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रातून सभागृहावर पुन्हा निवड झाली आहे. नवनिर्वाचित खासदार माया इवनाते, रामराव वडकुते, आणि ज्योती वाघमारे या राज्यातून निवडलेल्या सदस्यांनीही काल शपथ घेतली.

****

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. या जागेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करु नयेत, अशी विनंती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली. काँग्रेसने बारामतीतून प्रदेश सचिव आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल केल्यास, काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं काल स्पष्ट केलं.

**

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. त्यानंतर तनपुरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेसाठी आतापर्यंत चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

****

महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार प्रत्येक महिलेनं आपल्या हक्कांचा वापर करावा, असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे. दिल्ली इथं महिला-केंद्रित मुद्दे आणि सक्षमीकरण उपक्रमांवरील आकाशवाणीच्या कार्यशाळेत त्या काल बोलत होत्या.

****

बीड जिल्ह्यातल्या रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याप्रकरणी चार वैद्यकीय व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयुष्यमान भारत मिशनअंतर्गत उपचार घेतलेल्या रुग्णांकडून एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ७३ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी निकाली काढलेल्या ६९ तक्रारींमध्ये जिल्ह्यातल्या चार रुग्णालय चालक डॉक्टरांवर रुग्णांकडून औषध आणि इंजेक्शन साठी अतिरिक्त पैसे वसूल केल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. अशाप्रकारच्या घटना आढळून आल्यास, फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्याचे आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेली कामं समन्वय आणि गतिशीलतेने पूर्ण करण्याचे निर्देश, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं काल रोजगार हमी विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते,

बाईट - रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

****

दिशा अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लातूर जिल्ह्यातल्या चार शाळांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीचं प्रमाणपत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते संबंधित मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आलं. संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, जीवन विकास प्रतिष्ठान मतिमंद विद्यालय, पांडुरंग निवासी मतिमंद विद्यालय आणि चाकूर तालुक्यातील नळेगाव इथल्या संत गाडगेबाबा निवासी मतिमंद विद्यालयाचा समावेश आहे.

****

जागतिक आरोग्य दिवस आज पाळला जात आहे. राज्याचे निवृत्त आरोग्य सेवा सह संचालक डॉ एकनाथ माले यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत नागरिकांना आरोग्य राखण्याचा सल्ला दिला,

बाईट – डॉ. एकनाथ माले

 

डॉ. माले यांची ही मुलाखत उद्या बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजता प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या सदरात आपल्याला ऐकता येईल.

**

परभणी जिल्ह्यात जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर इथं गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. दोन मुलींना यावेळी लस देण्यात आली. यापैकी एका मुलीने आकाशवाणीशी बोलतांना, १४ ते १५ वयोगटातल्या मुलींनी लस घेण्याचं आवाहन केलं,

बाईट – नांदेड एचपीव्ही

****

हिंगोली जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये कामावर असताना तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या अकरा कर्मचाऱ्यांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षानं दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत एक हजार ८८० रुपयांचा दंड वसूल केला.

****

नांदेड इथं काल सकाळी श्रीनगर भागातील मुख्य रस्त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे शहराध्यक्ष सोनू कल्याणकर याची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली. गेल्या तीन दिवसात हत्येची ही पाचवी घटना आहे.

****

भारतीय जनता पक्षाचा ४७ वा स्थापना दिवस काल छत्रपती संभाजीनगर इथं उत्साहात साजरा करण्यात आला.

धाराशिव इथं यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

****

No comments:

Post a Comment