Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०७ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक आरोग्य दिन आज पाळला जात आहे. यानिमित्त
सामाजिक माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तसंच अधिक निरोगी आणि सुदृढ समाज घडवण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. आपण
सर्वजण मिळून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाला
प्राधान्य देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूया, असं आवाहनही
पंतप्रधानांनी केलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयक, २०२६ ला मंजुरी
दिली आहे. याअंतर्गत, अमरावतीला आंध्र प्रदेशची एकमेव
आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेने हे विधेयक मंजूर केलं
होतं.
दिवाळखोरी आणि नादारी संहिता
सुधारणा विधेयक, २०२६ ला देखील राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे.
****
देशात अन्नधान्याचा पुरेसा
साठा असल्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे. देशात डाळींचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा
जास्त झालं आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत फारसे चढ उतार झालेले नाहीत,आणि सरकारचं पुरवठा आणि किमतींवर बारकाईने लक्ष आहे, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनुपम मिश्रा यांनी सांगितलं.
यंदाच्या खरीप हंगामासाठी केंद्र
सरकारनं राज्याचा खताचा कोटा ४८ लाख ८० हजार मेट्रीक टन केला आहे. गेल्यावर्षी हा कोटा
४४ लाख ७० हजार टन होता अशी माहिती राज्याचे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी दिली. एकूण
कोट्यापैकी सुमारे ५२ टक्के खतं राज्यात उपलब्ध आहेत आणि येत्या २ महिन्यात आणखी बफर
साठा निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
****
देशातल्या ३०० कोटी रुपयांपर्यंतच्या
महामार्ग प्रकल्पांसाठी एक वर्ष तर ३०१ ते ५०० कोटी रुपये खर्चाच्या रस्ते बांधकाम
प्रकल्पांसाठी दीड वर्षांचा पायाभूत बांधकाम कालावधी निश्चित केल्याची माहिती, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. त्यापुढच्या म्हणजेच, ५०१ ते दीड हजार कोटी रुपये खर्चाच्या महामार्गांसाठी हा कालावधी २४ महिन्यांचा
असेल. रस्ते बांधणीत येणाऱ्या भौगोलिक अडचणींचं निराकरण करण्यासाठी अतिरिक्त एक वर्षाचा
कालावधी दिला जाईल, असं मंत्रालयाने आपल्या परिपत्रकात
म्हटलं आहे.
****
नागरी उड्डाण मंत्री राम मोहन
नायडू यांच्या उपस्थितीत बी सी ए एस आणि आर आर यू यांच्यात विमान सुरक्षा क्षेत्रात
आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत भारतात
स्वदेशी विमान सुरक्षा उपकरण चाचणी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. बी सी ए एस आणि
आर आर यू यांच्यात चाचणी, प्रमाणन, संशोधन, प्रशिक्षण आणि मानके विकास यासाठी सहकार्याचा औपचारिक
आराखडा तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे भारताच्या विमान सुरक्षा व्यवस्थेला अधिक
बळकटी मिळणार असून, पारदर्शक, स्वतंत्र आणि वैज्ञानिक मूल्यमापन प्रणाली विकसित होण्यास मदत होणार आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम
कॉर्पोरेशन लिमिटेड फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या
उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाऊंडेशनकडून सामाजिक
दायित्वमध्ये विशेष निधी देण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे बालकांच्या कर्करोग
उपचारांमधले आर्थिक अडथळे कमी होणार असून, सर्वसामान्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण उपचार पोहोचणार आहेत. महाराष्ट्रात आरोग्यसेवांचा
दर्जा उंचावत आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी
या करारामुळे मोठी मदत होत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
****
लातूर इथले सामाजिक कार्यकर्ते
संजय राजुळे यांनी खुशीग्राम फाउंडेशनमधील अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून आपल्या मुलीच्या
जन्माचा आनंद साजरा केला. हा उपक्रम वैष्णवी
इंडॉस्कॉपी हॉस्पिटल इथं पार पडला. या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक
होत असून, त्यांच्या या उपक्रमाने समाजासमोर एक आदर्श निर्माण
केला आहे.
****
भंडाऱ्यातल्या तुमसर शहरामध्ये
आयपीएल सामन्यांवर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या टोळीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई
केली आहे. राजस्थान
रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यावर ते सट्टा लावत होते. या प्रकरणात चार जणांविरोधात
गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून एकूण
२६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
सांगली इथं सुरु असलेल्या अखिल
भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग आणि कॅनॉईंग स्पर्धेत काल दुसऱ्या दिवसअखेर स्पर्धेत
अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठानं वर्चस्व प्राप्त केलं. त्याखालोखाल मोहालीचं
चंदीगड विद्यापीठ आणि चंदीगडचं पंजाब विद्यापीठ
यांच्या क्रीडापटूंनीही लक्षवेधी कामगिरी केली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या
महिलांनी के-१ सी-१ आणि के-४ या स्पर्धांमध्ये चौथं स्थान पटकावलं.
****
No comments:
Post a Comment