Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 08
April 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ एप्रिल २०२६ दुपारी १.००
वा.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केला नसून, तो पाच पूर्णांक २५ टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत
बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली.
विकसित होत असलेल्या स्थूल-आर्थिक आणि वित्तीय घडामोडी तसंच भविष्यातील दृष्टिकोनाचं
सविस्तर मूल्यांकन केल्यानंतर, समितीने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, एसटीएफ दर पाच टक्के, तर एमएसएफ दर आणि बँक दर साडे पाच टक्क्यांवर कायम असल्याचं
मल्होत्रा यांनी सांगितलं.
२०२६-२७ या वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाची वाढ सहा
पूर्णांक नऊ टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. मागील आर्थिक वर्षात ही वाढ सात
पूर्णांक सहा टक्के होती. नजीकच्या काळात अन्नधान्याच्या किमतींबाबतची स्थिती समाधानकारक
राहील, असंही त्यांनी सांगितलं. भारतीय
अर्थव्यवस्था सध्याच्या भू–राजकीय परिस्थितीत इतर अनेक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मजबूत
स्थितीत असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं तारण-मुक्त कर्ज देऊन छोटे
व्यापारी, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म तसंच लघु
उद्योगांना सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेला आज ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी
समाजमाध्यमावर हा संदेश जारी केला. मुद्रा योजनेमुळे गेल्या दशकात कोट्यवधी सामान्य
नागरिकांनी नव्या आत्मविश्वासाने आणि सक्षमतेने उद्योग क्षेत्रात पाऊल टाकलं असून, या उपक्रमामुळे पतपुरवठ्यातील प्रवेश अडथळे दूर होऊन उद्योजकता
खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी झाली असल्याचं त्या म्हणाल्या. २०४७ पर्यंत विकसित भारत
बनण्याच्या प्रवासात सक्रिय सहभागी होण्यासाठी पीएम मुद्रा योजना उद्योजकांना सक्षम
करत राहील, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत ४० लाख कोटी रुपयांपेक्षा
जास्त किमतीची सुमारे ५८ कोटी कर्जे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी दोन-तृतीयांश कर्ज
महिला उद्योजकांना मंजूर करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या उपक्रमामुळे सुमारे १२ कोटी तरुणांना फायदा झाला असून, आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दृष्टीकोनाला हातभार लागला
असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
****
नाशिक शहरात येत्या २८ एप्रिल पर्यंत वृक्षतोड करण्याची
मनाई करण्यात आली आहे. नाशिककर पर्यावरण प्रेमी मनिष बाविस्कर यांनी या संदर्भात पुणे
इथल्या राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीनंतर हरित
लवादाने हे आदेश दिले. नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड
सुरू असून, त्याला पर्यावरण प्रेमींनी विरोध
केला आहे. यातील अनेक पर्यावरण प्रेमींना आंदोलनाच्या वेळी ताब्यात घेण्यात आलं, तर काहींना त्यांच्या घरातच स्थानबद्ध करून वृक्षतोड करण्यात
आली. त्यामुळे ही दडपशाही असल्याचा आरोप या वृक्ष प्रेमींनी केला. तर दुसरीकडे गंगापूरकडे
जाणाऱ्या रस्त्यामध्ये झाडं असल्यामुळे अपघातात
होऊन ३९ जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे ही झाडं तोडणं आवश्यक असल्याचा दावा नाशिकच्या महापौर
हिमगौरी आडके यांनी केला आहे.
****
लातूर जिल्ह्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दर थेट चार ते सहा रुपये प्रति
किलोपर्यंत खाली आले आहेत. यंदाच्या हंगामातला हा सर्वात नीचांकी दर असल्याचं व्यापारी
आणि शेतकऱ्यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातल्या एकुर्का इथले
४७ वर्षीय शेतकरी दत्तात्रय जायभाये यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर
आलं असून, याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यासह सहा
जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावर
कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या २५ एप्रिल पर्यंत वाढवण्यात
आली आहे. महिला शेतकरी केवळ शेतीपुरत्या मर्यादीत न राहता शेतीशी संबंधीत व्यवसाय, यंत्रसामग्री व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्रातही पुढे याव्यात
हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे महिला गटांना उत्पन्नाचं नवं साधन मिळेल तसंच
गावातल्या शेतकऱ्यांना वेळेवर यंत्रे उपलब्ध होतील, असं परभणी इथले प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी सांगितलं.
****
लातूर इथं उद्या पंडित दीनदयाल उपाध्याय ‘जागेवरच निवड
संधी’ अंतर्गत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच मॉडेल करिअर
सेंटर यांच्या वतीनं आयोजित हा मेळावा उद्या सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास कार्यालयात
होणार आहे.
****
No comments:
Post a Comment