Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10
April 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० एप्रिल २०२६ दुपारी १.००
वा.
****
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत पाच लाख
७२ हजारांहून अधिक कुटुंबांनी स्वगणना सुविधेचा लाभ घेतला आहे. २०२७ ची जनगणना ही डिजिटल
उपक्रमातील वाढत्या जनसहभागाचं द्योतक असल्याचं भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांनी म्हटलं
आहे. जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल रोजी सुरू झाला असून, स्वगणना सुविधा सध्या अकरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये
१५ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये गोवा, कर्नाटक, मिझोराम, ओडिशा, सिक्किम, अंदमान–निकोबार, लक्षद्वीप, नवी दिल्ली महानगरपालिका आणि राष्ट्रीय राजधानीचं दिल्ली छावणी
मंडळ यांचा समावेश आहे. घरांची नोंदणी आणि गृहगणना १६ एप्रिलपासून सुरू होईल आणि १५
मे पर्यंत चालणार आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इस्रोने गगनयानसाठी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या
पूर्ण केली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रात ही चाचणी घेण्यात आली.
यामुळे गगनयान मोहिमेच्या सज्जतेच्या दृष्टीनं एक महत्वपूर्ण पाऊल पुढे गेलं आहे. भविष्यातल्या
मानवी अंतराळ मोहिमेसाठी सुरक्षित, नियंत्रीत लँडिंग क्षमतेची चाचणी याद्वारे केली जाते. या यशाबद्दल
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. गगनयान ही भारताची पहिली समानव अंतराळ
मोहिम २०२७ मध्ये नियोजित आहे.
दरम्यान, अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं मानवी अंतराळ उड्डाणाच्या क्षेत्रात
एक मोठी कामगिरी केली आहे. नासाचं आर्टिमिस्ट टू मिशन वन यान, आता आपल्या ऐतिहासिक प्रवासाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं
आहे. अमेरिकन वेळेनुसार आज रात्री आठ वाजेच्या सुमारास हे यान प्रशांत महासागरात उतरण्याची
शक्यता आहे. एक एप्रिलला प्रक्षेपित करण्यात आलेल्या या यानात चार अंतराळवीर असून, या पथकानं पृथ्वीपासून दोन लाख ४८ हजार ६५५ मैलांचं अंतर
पार करुन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे माजी उपसभापती
हरिवंश यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केलं आहे. हरिवंश यांचा कार्यकाळ
काल संपला. भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या जागी त्यांना नामनिर्देशित
करण्यात आलं आहे.
****
बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यसभा
सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी
त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आठ खासदार फुटून
शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त शिवसेनेनं फेटाळलं आहे. ठाकरे गटाच्या खासदारांसोबत
झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं असल्याचं शिवसेनेचे मुख्य
नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. अशी कोणतीही बैठक झालेली नाही, त्यामुळे माध्यमांनी अशा बातम्या देणं टाळलं पाहिजे असंही
शिंदे यांनी सांगितलं.
****
‘शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी’, या संकल्पनेनुसार आज ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ साजरा केला जात
आहे. होमिओपॅथी या उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनेमान यांच्या जयंती दिनी हा दिवस
साजरा केला जातो. केंद्र सरकार आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून होमिओपॅथी अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने
प्रयत्न करत आहे.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये नशा मुक्त भारत अभियान अधिक प्रभावी
करण्यासाठी सरकारने २० वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हा मेंटर्स म्हणून नियुक्ती केली आहे.
विविध नागरी सेवांमधून निवडलेले हे अधिकारी त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जनजागृती
मोहिमा, अंमलबजावणी उपाययोजना आणि व्यसनमुक्ती
उपक्रमांवर देखरेख ठेवणार आहेत. तसंच, स्थानिक प्रशासन आणि सामाजिक गटांसोबत समन्वय साधून पोहोच आणि
पुनर्वसन प्रयत्न अधिक मजबूत करण्यात येणार आहेत. केंद्रशासित प्रदेशात अंमली पदार्थविरोधी
मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणं आणि नशा मुक्त समाजाच्या दिशेने पाऊल उचलणं
हा या निर्णयाचा उद्देश आहे.
****
महसूल गुप्तचर संचालनालयानं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय
विमानतळ इथं ‘ऑपरेशन धहाबू ब्लिट्झ’ अंतर्गत नैरोबीहून आलेल्या प्रवाशांकडून सोन्याची
तस्करी उघडकीस आणली. विभागानं सुमारे ३८ कोटी रुपयांचं साडे २९ किलो सोनं जप्त केलं
असून २४ जणांना अटक केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज
आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय अखिल भारतीय आंतर
विद्यापीठ सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या १५ तारखेला या स्पर्धेचा
शुभारंभ होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह १६ राज्यांमधल्या ६९ विद्यापीठातले सायकलपटू
सहभागी होणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान
रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात सामना होणार आहे. गुवाहाटी इथल्या ACA मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात
होईल.
****
No comments:
Post a Comment