Monday, 13 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      ज्येष्ठ गायिका पद्मविभुषण आशा भोसले यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

·      पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

·      स्वतंत्र भारताचा पाया रचण्यात नारीशक्तीचं अभूतपूर्व योगदान-पंतप्रधानांचं प्रतिपादन

आणि

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन

****

ज्येष्ठ गायिका पद्मविभुषण आशा भोसले यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, यांनी आशाताईंच्या पार्थिव देहावर शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, लोकप्रतिनिधी यांच्यासह संगीत आणि चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलावंतांनी आशाताईंच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, निवेदक हरीष भिमानी, आमीर खान, विकी कौशल यांच्यासह मंगेशकर आणि भोसले कुटुंबीयांसह अनेकांचा समावेश होता. गायक अनूप जलोटा, शान, सुदेश भोसले यांनी आशाताईंना सांगितिक श्रद्धांजली अर्पण केली.

 

आशाताईंचे चिरंजीव आनंद भोसले यांनी त्यांच्या पार्थिव देहाला अग्नी दिला. पोलिसदलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसंच शोक धून वाजवून मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी आशाताईंच्या इच्छेनुसार एकासुरात जयहिंद म्हणून त्यांना अखेरचा निरोप दिला.

 

त्यापूर्वी आज सकाळपासूनच आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी समाजातल्या सर्वच स्तरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे तसंच महापौर रितु तावडे, खासदार सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, मोहम्मद सिराज, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, हेलन, संगीतकार उत्तमसिंह, गायक रवींद्र साठे, उत्तरा केळकर, अनुराधा पौंडवाल, सुदेश भोसले, जावेद अली, यांच्यासह अनेकांनी आशाताईंचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या तसंच परिसरातल्या इमारतींमधून नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून, या लोकोत्तर गायिकेला अखेरचा निरोप दिला.

****

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलण्यात येतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, आशा भोसले यांनी ही संगीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता.

शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणेमुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा समावेश होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास आज मान्यता देण्यात आली.

शासनाच्या विविध आस्थापनांमधील विविध विभागांमधून स्वतंत्रपणे घेण्यात येणाऱ्या परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांसाठी भरतीच्या पदांची संख्या वाढणार आहे. याशिवाय सेवांतर्गत पदोन्नतीसाठी स्वतंत्र संवर्ग संरचना आणि मृत संवर्गांची पुनर्रचना होणार आहे.

जालना, बीड, हिंगोली, परभणी, धुळे आणि पालघर जिल्ह्यांचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात समावेश करायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. सध्याच्या २७ आकांक्षित तालुक्यांसह नवीन १५० तालुके अशा एकूण १७७ तालुक्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.

मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठ स्थापनेला मंजुरी, सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छिमारांसाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी, राज्यात वैद्यकीय क्षेत्र सशक्तीकरण प्रकल्प राबवण्यासाठी जपानच्या प्रतिनिधींकडून तीन हजार ७०८ कोटीं रूपयांच्या अर्थसहाय्याला मंजुरी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेशी निगडीत अधिनियमात सुधारणा यासारखे निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

****

मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसंच धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन आठ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.

****

स्वातंत्र्य लढ्यापासून ते संविधान सभेच्या सर्व निर्णयांपर्यंत स्वतंत्र भारताचा पाया रचण्यात भारताच्या नारीशक्तीने अभूतपूर्व योगदान दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज नारी शक्ती वंदन संमेलनाला ते संबोधित करत होते. नारी शक्ती वंदन अधिनियमावर चर्चा करुन ते पारीत करण्यासाठी येत्या १६ ते १८ तारखेदरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला होता. भारताच्या विकास यात्रेतल्या या महत्त्वाच्या क्षणांदरम्यान, देश २१व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

संवाद, सहकार्य आणि सहभागाच्या माध्यमातून हे विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आणि प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ज्या प्रकारे हा कायदा मंजूर झाला आणि संसदेची प्रतिष्ठा वाढली, त्याचप्रमाणे या वेळीही या कायद्यातल्या सुधारणा मंजूर होऊन, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून संसदेची प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षणापेक्षाही मतदारसंघांची फेररचना हा अधिक गंभीर मुद्दा असल्याचं काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. फेररचनाविषयक प्रस्ताव अत्यंत धोकादायक आणि संविधानातल्या तरतुदींचं नुकसान करणारा असल्याची टीका त्यांनी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून केली आहे. लोकसभा आणि विधानसभांमधे महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी, नारी शक्ती वंदन अधिनियम, २०२३ मधेच मंजूर झालं. २०२४ च्या निवडणुकांपासूनच या सुधारणा लागू करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती. पण सरकारनं ती फेटाळून लावल्याचं गांधी यांनी सांगितलं.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उद्या साजरी होत आहे. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातले अनेक मार्ग उद्या पूर्ण बंद राहणार असल्याचं वाहतूक विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग तसंच जिल्हा रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभागही उद्या मंगळवारी बंद राहणार आहे.

****

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत परभणी शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. शिवराज शिंदे यांनी लिहिलेल्या, संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या, ‘भीमाचा दरारा’ या गीताचं औपचारिक प्रकाशन आज करण्यात आलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात आज हळद पिकासाठी सुक्ष्म मुलद्रव्याचा वापर प्रात्यक्षिकाच्या अनुषंगानं प्रक्षेत्र दिन साजरा झाला. यासाठी केरळ इथल्या भारतीय मसालावर्गीय पिके संशोधन संस्थेनं विकसित केलेल्या सुक्ष्म मुलद्रव्याच्या वापराच्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. परभणी कृषी विज्ञान केंद्राद्वारे मानवत तालुक्यातील मंगरुळ आणि पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर इथं ही प्रात्यक्षिके घेण्यात आली.

****

No comments:

Post a Comment