Tuesday, 14 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 14 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ एप्रिल २०२ सकाळी.०० वाजता

****

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३६व्या जयंतीनिमित्त आज देशभरात अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे.

नवी दिल्लीत संसद भवन परिसरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'प्रेरणा स्थळ' इथं बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.

समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांप्रती बाबासाहेबांची अखंड बांधिलकी त्यांच्या जीवनकार्यांतून स्पष्ट होते. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि महान योगदानामुळे देश अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि समतोल समाजाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. राष्ट्रनिर्मितीत बाबासाहेबांच्या महान योगदानामुळे अनेक पिढ्यांना न्याय्य आणि प्रगत समाज घडवण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

**

राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे.

मुंबईत चैत्यभुमी इथं राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. मंत्री छगन भुजबळ, आशिष शेलार, संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू तावडे, माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. मुंबईसह राज्याच्या विविध भागातून अनुयायी चैत्यभुमीवर दाखल होत आहेत. याठिकाणी बाबासाहेबांना शासकीत मानवंदना देऊन, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

****

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज असलेलं जग विक्रमहे एलपीजी मालवाहू जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारताकडे मार्गस्थ झालं आहे. सुमारे २० हजार ४०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन हे जहाज आज कांडला बंदर इथं पोहोचणार आहे. जहाजावरील सर्व २४ खलाशी सुरक्षित आहेत. जग विक्रमच्या आगमनामुळे देशांतर्गत बाजारपेठेत एलपीजीचा पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तराखंडमधल्या डेहरादून इथं दिल्लीडेहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉरचं उद्घाटन होणार आहे. यावेळी या कॉरिडॉरच्या उन्नत भागावरील वन्यजीव मार्गिकेचा आढावाही पंतप्रधान घेणार आहेत. २१३ किलोमीटर लांबीच्या या सहा पदरी कॉरिडॉरसाठी १२ कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. या कॉरिडॉरमुळे दिल्ली आणि डेहरादून दरम्यानच्या प्रवासासाठी वेळ अडीच तासांपर्यंत कमी होईल.

****

देशात उन्हाळी पिकांच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून, ६४ लाख हेक्टरपेक्षा अधिक लागवड क्षेत्राची नोंद झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत उन्हाळी पिकांच्या लागवड क्षेत्रात ७७ हजार हेक्टरची महत्वपूर्ण वाढ दिसून आली. ३० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भात पिकाची, तर ११ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कडधान्याची लागवड करण्यात आली आहे. तसंच श्री अन्न म्हणजेच भरड धान्याच्या लागवडीखाली १३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र, तर तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्र आठ लाख हेक्टरपेक्षा अधिक नोंदवण्यात आल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

गरीबांना घरे देण्याच्या योजनेत म्हाडाला घरे न देता फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधल्या १९३ विकासक आणि त्यांच्या भागीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी गठीत केली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली हे पथक चौकशी करणार असून यात भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक सदस्य सचिव असतील.

****

भोंदू बाबा अशोक खरातच्या नाशिकमधल्या बंगल्यात सक्तवसुली संचालनालय तसंच आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. तसंच सिन्नर इथल्या फॉर्म हाऊस आणि ट्रस्टच्या कार्यालयातही धडक दिली. दिवसभर चाललेल्या या छाप्यात खरातच्या मालमत्तांसंदर्भातील दस्तावेज तसंच त्याच्या मुख्य आर्थिक स्त्रोतांची काटेकोर तपासणी करण्यात आली.

****

जालना जिल्ह्यातल्या प्राचीन हस्तलिखितांचं डिजीटायझेशन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, उपजिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या 'ज्ञानभारतम्' या योजनेअंतर्गत जिल्ह्यातली मंदिरं, मठ, खाजगी ट्रस्ट आणि वैयक्तिक संग्राहकांकडील जुनी हस्तलिखितं संकलित केली जाणार आहेत.

****

लातूर पाटबंधारे विभागाच्या वतीने उद्यापासून ते ३० एप्रिल या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६आयोजित करण्यात आला आहे. जलसंपत्तीचं योग्य नियोजन, सिंचन व्यवस्थापनाबाबत जनजागृती, शेतकरी आणि लाभधारकांचा सहभाग वाढवणं आणि पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

****

 

No comments:

Post a Comment