Thursday, 16 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 16 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

नारीशक्ती वंदन अधिनियमातल्या महत्त्वाच्या घटनात्मक सुधारणेवर चर्चा करण्यासाठी संसदेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, संसद आणि राज्य विधीमंडळांमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद असलेलं संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६, आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक २०२६ सादर केलं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक २०२६ सादर केलं. हे विधेयक केंद्रशासित प्रदेश सरकार अधिनियम १९६३, दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार अधिनियम १९९१ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना अधिनियम २०१९ मध्ये पुढील सुधारणा करण्यासाठी आहे.

दरम्यान, काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी ही विधेयकं मांडण्यास विरोध केला. या विधेयकांमुळे देशाच्या संघराज्यीय रचनेला धक्का पोहोचेल, असा आरोप त्यांनी केला. गृहमंत्री अमित शाह यांनी या आरोपांचं खंडन केलं. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी ही विधेयकं इतक्या घाईघाईने आणण्याच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तत्पूर्वी, सभागृहाचं कामकाज सुरू होताच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह तीन दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये अबू हासेम खान चौधरी, मोहसिना किडवाई आणि हरी नारायण राजभर यांचा समावेश आहे.

राज्यसभेत आज नवीन सदस्यांना शपथ देऊन कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

****

वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते सुवर्णपदकं प्रदान केली जाणार असून, एकूण आठ विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी राष्ट्रपतींनी वर्धा इथं सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. आदी निवास, बा कुटी, बापुकुटी, बापुंच्या कार्यालयाची पाहणी करुन त्यांनी माहिती जाणून घेतली. राष्ट्रपतींनी यावेळी प्रार्थना सभेत सहभाग घेतला, वृक्षारोपण केलं, तसंच सूत कताई केली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यावेळी उपस्थित होते.

****

गृह मंत्रालयाकडून जनगणना २०२७ चा पहिला टप्पा असलेल्या घरनोंदणी आणि गृहगणना साठी क्षेत्रीय कार्याला आजपासून सुरुवात होत आहे. ही मोहीम अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओडिशा आणि सिक्कीम यांसारख्या अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाईल. पुढील ३० दिवसांमध्ये, प्रशिक्षित गणक माहिती गोळा करण्यासाठी घरोघरी भेटी देतील, जो जनगणना प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

****

राज्य विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगानं घोषित केला आहे. या जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना २३ एप्रिल रोजी जारी होईल, ३० एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येतील. दोन मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर चार मे पर्यंत अर्ज मागे घेता येतील. संजय केणेकर, नीलम गोर्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून त्वरित पिक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. काल मुंबईत एका भेटीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार प्रति हेक्टर सतरा हजार रुपये प्रमाणे  पिक विमा रक्कम देण्याविषयी त्वरित कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी चव्हाण यांनी केली.

****

शासकीय जमिनींवरील एक जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी डिसेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा. जी सी. यांनी केलं आहे. संबंधितांनी आपले अर्ज नागरी भागात संबंधित मुख्याधिकाऱ्यांकडे तर ग्रामीण भागात संबंधित ग्रामसेवकांकडे जमा करायचे आहेत.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत्या २० तारखेपर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर निबंध अपलोड करावेत, असं आवाहन लातूर जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी औताडे पी. जे. यांनी केलं आहे.

****

राज्यात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment