Sunday, 19 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

आखाती देशातील सध्याच्या युध्दजन्य परिस्थीतीत, अशियाच्या मध्यपूर्व भागातील जलमार्ग – होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नुकत्याच दोन भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशाच्या परराष्ट्र सचिवांनी दिल्ली इथं इराणच्या राजदूतांसोबत चर्चा करुन या संदर्भातली भारताची आपली गंभीर चिंताही व्यक्त केली आहे. या जलमार्गावरुन याआधीही भारतीय जहाजांच्या सुखरुप वाहतुकीबाबत सोय होती, तशी ती पूर्ववत करण्याबाबत निवेदन परराष्ट्र सचिवांनी यावेळी केलं.

****

नाशिकमधल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कार्यालयातील कथित धर्मांतर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि प्रत्येक संभाव्य पैलूंचा तपास करून आरोपींना न्यायालयासमोर उभं केलं जाईल याची खात्री करण्यास सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे निर्देश दिले. या बैठकीला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. टीसीएसमधील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरण यावेळच्या चर्चेतला मुख्य मुद्दा होता. यामध्ये सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलं असून त्यांनी कौतुकास्पद काम केलं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आता या प्रकरणाचा तपासही तितकाच भक्कम असायला हवा, असंही त्यांनी नमूद केलं. या आढावा बैठकीदरम्यान, फडणवीस यांनी गोरेगाव अंमली पदार्थ प्रकरणी तीव्र कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे. गेल्या अकरा एप्रिल रोजी गोरेगावच्या नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये एका मैफिलीदरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळं दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय तृतीया आणि भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या  देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय तृतीया हा सण आपल्याला सत्कर्म, दान आणि सेवाभावाच्या मार्गावर पुढं जाण्यास प्रेरणा देतो. हा सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो  असं  मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर,भगवान परशुरामांकडून आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणा मिळते असं मोदी त्यांनी नमूद केलं आहे.

****

पवित्र चार धाम तिर्थ यात्रेला आज प्रारंभ होत आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या गंगोत्री आणि यमुनोत्री मंदीरांचे द्वार दर्शनासाठी आज खुले होत आहेत. दरम्यान, महात्मा बसवेश्र्वर जयंतीनिमित्त आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाशवाणी चौकात अभिवादनपर कार्यक्रम झाला.

****

अमरावतीच्या परतवाडा इथं अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली. तपासाचा अहवाल दर ५ दिवसांनी सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात टुनकी इथं शेतीतला अभिनव प्रयोग प्रशंसा मिळवत आहे. इथले प्रयोगशील शेतकरी सुभाष शालिग्राम चांदुरकर यांनी विदर्भातल्या कडक उन्हात सफरचंदाची बाग यशस्वीपणे फुलवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. एरवी थंड हवेच्या ठिकाणी येणारं हे फळ त्यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या शेतात पिकवून वाहवा मिळवली आहे. या प्रयोगाची लागवड करताना त्यांनी कश्मीरचा आणि येथील उष्ण हवामानाचा असा दोन्हींचा अभ्यास करून बाग लागवड आणि व्यवस्थापन साधल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणर आहेत.

पहिला सामना दुपारी साडेतीनला कोलकाता नाईट रायडर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकाता इथं होईल. तर, दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता नविन चंदीगढ इथं पंजाब किंग्ज आणि लखनऊ सपर जायंटस यांच्यात होणार आहे. काल झालेल्या सामन्यात सनरायर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला. तर, दिल्ली कॅपिटलनं रॉयल चॅलेजर्स बंगरुळूवर मात केली. सध्याच्या गुणतालिकेनुसार ,पंजाब किंग्ज संघ अव्वल स्थानावर असून त्यासह रॉयल चॅलेंजर बंगरुळु, राजस्थान रॉयल्स,सनरायजर हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आगेकुच करण्यात सध्या चुरस आहे.

****

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातल्या हातखंबा गावात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास एक ट्रक विहिरीत कोसळला. लोखंडी सळ्या असलेल्या या ट्रकनं विहिरीत कोसळण्यापुर्वी तीन ते चार वाहनांना धडक दिल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शींनी दिली आहे.

****

No comments:

Post a Comment