Sunday, 19 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      कॉंग्रेस आणि सहकारी पक्षांच्या नकारात्मक राजकारणामुळे नारी शक्ती वंदन विधेयक संमत होऊ शकलं नाही – पंतप्रधानांचा आरोप

·      ग्राम सडक योजना- तीन ला मार्च २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      जागतिक वारसा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रम

·      लातूर इथं नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन

आणि

·      मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात पुढचे दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

****

कॉंग्रेस आणि सहकारी पक्षांच्या नकारात्मक राजकारणामुळे नारी शक्ती वंदन विधेयक संमत होऊ शकलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काल राष्ट्राला संबोधित करतांना त्यांनी, महिलांची माफी मागितली. यावेळी पंतप्रधानांनी अनेक दाखले देत, कॉंग्रेस पक्ष कायमच सुधारणांना विरोध करत आल्याचं सांगितलं. कॉंग्रेसच्या याच नकारात्मक भूमिकेमुळे स्वातंत्र्यानंतर आजवर आपला देश अपेक्षित विकास साध्य करू शकला नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

महिला आरक्षणाला विरोध करणारे पक्ष महिलांचा संसद आणि विधानसभांमधला सहभाग वाढण्यापासून रोखू शकणार नाहीत, असा ठाम विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. 'नारी शक्ती वंदन सुधारणा' ही काळाची गरज असून, सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांचं संतुलित सक्षमीकरण व्हावं, यासाठीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता, असं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

इतर विरोधी पक्षांनी सुद्धा महिलांना आरक्षण देण्याची तसंच आपापल्या राज्यातून अधिकाधिक लोकप्रतिनिधींना संसदीय मंडळात येण्याची संधी नाकारली, देशहितापेक्षा पक्ष हिताच्या स्वार्थी राजकारणामुळे महिलांचा हक्क डावलला गेला, अशी टीका त्यांनी केली.

या विधेयकाला यावेळी दोन तृतीयांश बहुमत मिळालं नसलं तरी, महिला आरक्षणाच्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर करू, आणि देशाच्या भविष्यासाठी हे विधेयक मंजूर करू, असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

पंतप्रधान ग्राम सडक योजना- तीन ला मार्च २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

बाईट – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्के वाढवून ६० टक्के करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एक जानेवारी २०२६ पासून ही दरवाढ लागू होणार आहे. साडे ५० लाख कर्मचारी आणि ६८ लाखांहून अधिक निवृत्तीवेतन धारकांना याचा लाभ होईल. यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला सुमारे सहा हजार ७९१ कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

१२ हजार ९८० कोटी रुपयांचा 'भारत सागरी विमा पूल स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतीय जहाजांना आणि सागरी व्यापाराला अखंडित विमा संरक्षण उपलब्ध करून देणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

****

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं असून, विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. २८ जानेवारीला या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. या अधिवेशनात लोकसभेच्या एकूण ४१ बैठका झाल्या, यात ९३ टक्के कामकाज झालं असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. अधिवेशनात बारा विधेयकं सभागृहात सादर झाली, यातली ९ विधेयकं मंजूर झाली. राज्यसभेचं कामकाज १५७ तास चालल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

एटीएस अर्थात ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन प्रणाली बंद असल्यामुळे रखडलेल्या वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रियेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे राज्यातल्या टेम्पो, स्कूलबस, रिक्षा यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पत्र लिहून विनंती केली होती.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गृह विभागासोबतच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रकरणांचा आढावा घेतला, आणि सखोल तपास करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील गैरप्रकार, भोंदूबाबा अशोक खरात, अमरावतीमधील अल्पवयीन आणि महिलांचे लैंगिक शोषण तसंच मुंबईतील गोरेगाव इथल्या एका संगीत कार्यक्रमातील अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झालेले मृत्यू या प्रकरणांच्या तपासाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

****

जागतिक वारसा दिवस काल विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. ‘संघर्ष आणि आपत्तीच्या काळात ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी आपत्कालीन प्रतिसाद’ अशी या दिनाची संकल्पना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा देत, आपला गौरवशाली इतिहास, संस्कृती, कलेचा अमूल्य वारसा जपूया आणि विकसित महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन केलं.

**

जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात काल विविध कार्यक्रम पार पडले. इंटॅकच्या वतीने सकाळी सातारा परिसरात कडेपठार खंडोबा मंदिर इथं हेरिटेज वॉक घेण्यात आला. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी या यादवकालीन मंदिर, परिसर आणि तलावाबद्दल माहिती दिली.

राज्य पुरातत्व विभागातर्फे सोनेरी महाल परिसरात सकाळी मराठा मिलिटरी लँडस्केप्स – छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांवर आधारित विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं.

शहरातलं शासकीय संग्रहालय आणि पुरातत्व विभागाच्या वतीने शिवगान हा कार्यक्रम दिल्ली गेट परिसरात घेण्यात आला.

****

साडेतीन मुहुर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा केला जात आहे. यानिमित्त सोनं, गृह, वाहन यासारख्या वस्तू खरेदीचा प्रघात असून, छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातल्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली.

भगवान परशुराम तसंच महात्मा बसवेश्वर यांची जयंतीही आज साजरी होत आहे. यानिमित्त धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध ठिकाणी मिरवणुकीचं  आयोजन करण्यात आलं आहे.

****

लातूर इथं नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी १०० खाटांच्या प्रारंभिक रुग्णालयाऐवजी भविष्यात ५०० खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही, कामाची गुणवत्ता राखत ते निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, या रुग्णालयामुळे लातूरकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असं पालकमंत्री यावेळी म्हणाले.

****

दरम्यान, पालकमंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी काल मॉन्सूनसंबंधी आढावा बैठक घेतली. आगामी मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावं, असे निर्देश त्यांनी दिले.

****

जल जीवन मिशन अंतर्गत सर्व जलतारे, शोषखड्डे आणि पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची कामं मान्सूनपूर्व पूर्ण करून हर घर जल योजनेचं उद्दिष्ट वेळेत साध्य करण्याचे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिले. या योजनेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

****

नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनात धाराशिव इथल्या भाजप महिला मोर्चाच्या वतीने एक लाख माता-भगिनींच्या सह्यांचं निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहे. नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी महिलांच्या हक्कांवर गदा आणली आहे, असा आरोप भाजप महिला मोर्चा अध्यक्षा प्रीती कदम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केला. या अन्यायाविरोधात आता जिल्ह्यात जनआंदोलन उभारलं जाणार असल्याचं त्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

****

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या परभणी जिल्ह्यातल्या नऊ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांच्या दालनात काल झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

नांदेडमध्ये देखील नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.

****

हवामान

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामं हवामानानुसार नियोजित करावीत, काढणी केलेली पिकं सुरक्षित  ठिकाणी साठवावीत, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

****

No comments:

Post a Comment