Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 22 April 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
अर्थव्यवस्थेच्या आकाराचा विचार करता महाराष्ट्राची स्पर्धा
आता जागतिक स्तरावर, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
नारी शक्ती विधेयकाला विरोध म्हणजे विरोधी पक्षांचे राजकीय
हिताला महत्त्व, केंद्रीय मंत्री विरेंद्र कुमार यांची टीका
·
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान
·
देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार
कायदा करणार, महसूलमंत्र्यांची माहिती
आणि
·
धाराशिवमध्ये वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू, पुढील दोन
दिवस मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा
****
महाराष्ट्राची
अर्थव्यवस्था आता जागतिक स्तरावर स्पर्धा करत असून, लवकरच यूएई आणि
सिंगापूरलाही मागे टाकण्याची क्षमता राज्यात आहे, असा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागरी सेवा दिनानिमित्त काल मुंबईत
आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र आता जगातली तिसावी मोठी अर्थव्यवस्था
असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासनाने प्रत्येक विभागाकडे ‘स्टार्टअप’ म्हणून पाहून
नाविन्यपूर्ण कल्पना आणि कार्यक्षमतेवर भर द्यावा, असं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“विकसित महाराष्ट्र”
या संकल्पनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा कार्यक्रम
हाती घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पारदर्शक, वेगवान आणि लोककेंद्रित प्रशासनाद्वारे नागरिकांना सुलभ आणि परिणामकारक सेवा
देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेची पारितोषिकं
प्रदान करण्यात आली.
महापालिका
गटात कूल रूफ संकल्पनेसाठी अमरावती, व्हॉट्स ॲपप आणि चॅटबॉटद्वारे सेवांसाठी
छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्पोरेशन तर ई- गर्व्हनन्साठी मीरा भाईंदर महापालिकेला
अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक
मिळालं.
उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
प्रत्येक
राजकीय पक्षानं, देशहिताचा विचार करून नारी शक्ति वंदन विधेयकाला समर्थन करायला
पाहिजे होतं, मात्र विरोधी पक्ष देशहिताला नाही तर पक्षीय राजकारणाला
महत्व देत असल्यानं हे विधेयक पारित होऊ शकलं नाही, अशी टीका
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केली. ते काल छत्रपती संभाजीनगर
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या विधेयकाला विरोध केल्यामुळे विरोधी पक्षांना येत्या
काळात मोठं राजकीय नुकसान होणार असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
बाईट – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार
तत्पूर्वी
वीरेंद्र कुमार यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या आधार वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी
त्यांनी इथल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. या नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी
आवश्यक त्या सुविधा सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी व्यवस्थापनाला दिल्या.
****
महिला आरक्षण
आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप
सुरू आहेत. महिला आरक्षणासाठीच्या घटनादुरूस्ती विधेयकाला विरोध करून विरोधी पक्षांनी
महिलांना समान संधी नाकारली असून, देशातल्या महिला त्यांना कधीही माफ करणार
नाहीत, असं पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या
काल ठाणे इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
महिलांना
संसद आणि विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण तातडीने लागू करावं अशी मागणी काँग्रेस खासदार
वर्षा गायकवाड यांनी केली. सरकार महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी न करता याचा वापर
केवळ ढालीसारखा करत आहे, अशी टीकाही गायकवाड यांनी केली.
**
दरम्यान, महिला आरक्षण
विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध केल्याच्या निषेधार्थ काल मुंबईत भाजपतर्फे जन आक्रोश
महिला संमेलन घेण्यात आलं. हे विधेयक पडले म्हणजे महिला आरक्षण थांबलं असं होणार नाही,
जोवर संसदेत ३३ टक्के खासदार आणि राज्याच्या विधानसभेत ३३ टक्के आमदार
महिला असतील, त्याचदिवशी ही लढाई संपवू, अशा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
****
बारामती
आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. बारामतीमध्ये राष्ट्रवादी
काँग्रेसच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ सांगता सभा
पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनिल तटकरे, प्रफुल्ल
पटेल, छगन भुजबळ, उदय सामंत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
राहुरीमध्येही
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या समर्थनार्थ सभा घेतली.
दोन्ही मतदारसंघांमध्ये उद्या २३ तारखेला मतदान होणार आहे.
दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे
आपण मुंबईबाहेर जाऊ शकत नसून, नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावता
येणार नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या निवेदनात
म्हटलं आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना आपल्या पक्षाने दिलेला पाठिंबा ही अजित
पवार यांना श्रद्धांजली असल्याचं शरद पवार म्हणाले.
****
शेतीच्या
आपापसातल्या वाटणीसाठी आता तहसीलदाराची मंजुरी आवश्यक नसल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना
आता थेट मुद्रांक निबंधकाकडे जाऊन केवळ ५०० रुपयांत वाटणीपत्र नोंदवता येणार असून, या निर्णयाची
अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, देवस्थान
इनाम जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या येणाऱ्या
अधिवेशनात कायदा करणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. याबवतची तयारी सुरू
झाली असून, नागरिकांना आपल्या हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी
कायद्याचा मसुदा लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल, असं
त्यांनी सांगितलं.
****
देशात सध्या
सुरु असलेल्या जनगणनेमध्ये यावेळी 'डिजिटल पद्धत' आणि
'स्व-गणना' ही सुविधा पहिल्यांदाच दिली
जात आहे. राज्यात येत्या एक मे पासून स्वगणनेला सुरुवात होणार आहे. परभणी जिल्ह्यातल्या
तरुण, शिक्षित नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची
माहिती स्व-गणनेद्वारे भरावी, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी
तथा प्रधान जनगणना अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. यासंदर्भात काल झालेल्या
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले,
बाईट – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
****
लातूरच्या
शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप नेते माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील
यांच्या पार्थिव देहावर काल लातूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं काल सकाळी
निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते.
वैद्यकीय
सेवा आणि शिक्षण क्षेत्रातील नि:स्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा भावनेसह
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पाटील यांच्या
निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
****
जुनी पेन्शन
योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी
कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध
शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा शासनाने दिला आहे. तसंच सामान्य
प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करून कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीने संप मागे घेण्याचं
आवाहन केलं आहे. बीड आणि जालना जिल्ह्यात या संपाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात काल अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर गारपीट
झाली. जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
पुढील काही
दिवस हवामान प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणं टाळावं
आणि हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील
यांनी केलं.
**
दरम्यान, मराठवाड्यात
आज आणि उद्या अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यात इतर ठिकाणी येत्या
पंचवीस तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानं
वर्तवली आहे. ही शक्यता पाहता, शेतक-यांनी काढणी केलेल्या पिकांची
योग्य पद्धतीनं साठवणूक करावी, असा सल्ला प्रशासनानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment