Wednesday, 22 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ एप्रिल २०२ सकाळी.०० वाजता

****

जम्मू आणि काश्मीर मधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांच्या स्मृती देशाच्या सामूहिक स्मरणात कायम राहतील, असं सांगत त्यांच्या कुटुंबासोबत देश एकजुटीने उभा असल्याचं म्हटलं. तर, पंतप्रधान मोदी यांनीही देश दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, असा निर्धार व्यक्त करत पीडितांना कधीही विसरणार नसल्याचं सांगितले. शोकाकुल कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाम इथं दहशतवाद्यांनी 26 निरपराध लोकांची हत्या केली होती, यामध्ये प्रामुख्यानं पर्यटकांचा समावेश होता. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या वर्षी 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नियंत्रण रेषेच्या पलीकडं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधल्या दहशतवाद्यांच्या नऊ छावण्यांवर अचूक मारा केला. या कारवाईत शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले.

****

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्य शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे आज विविध  उपक्रमांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. वसुंधरा रक्षक अभियानाचा आणि प्लास्टीक बाटल्यांच्या संकलनासाठीच्या अभियानाचा प्रारंभ आज होणार आहे. तसंच राज्य पर्यावरण कृती कक्षाच्या संकेतस्थळाचं आणि बोधचिन्हाचं अनावरणही केलं जाणार आहे.

****

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई इथं ‘परिवर्तनवादी घटनावाद’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेला न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांची प्रमुख उपस्थिती होती. सार्वजनिक कायदा, धोरण आणि न्यायशास्त्र संशोधन केंद्राच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत आधुनिक काळातील घटनात्मक तत्त्वांच्या व्यावहारिक उपयोगावर चर्चा झाली. उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती मसीह यांनी घटनावाद हा सत्तेवर मर्यादा घालणारा मूलभूत सिद्धांत असल्याचे सांगत नागरिकांच्या हक्कांसोबत कर्तव्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तर प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती मिथल यांनी ‘धर्म’ आणि आधुनिक संविधान यांतील साम्य स्पष्ट करत संविधान हे ‘धर्मा’चे आधुनिक रूप असल्याचे नमूद केले.

****

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

होणार आहे. दरम्यान, काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामती इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची प्रचारसभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, उदय सामंत आणि रामदास आठवले यांच्यासह महायुतीतील अन्य नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे देखील प्रचारसभेला उपस्थित होत्या. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण मुंबईबाहेर जाऊ शकत नसून नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री पंकजा मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि अन्य नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राहुरीमध्ये 374 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि अन्य साहित्य त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच थेट उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

****

सनदी लेखापाल संस्था,आयसीएआयच्या डब्ल्यूआयआरसी अंतर्गत अकोला शाखेच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. उद्घाटन सत्राला आयसीएआयचे केंद्रीय परिषद सदस्य आणि एआय समितीचे उपाध्यक्ष सीए उमेश शर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी लहान शहरांतील सनदी लेखापालांनाही एआय-आधारित भविष्यासाठी सक्षम करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचं सांगितलं.

****

राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता आणि उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागानं राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष दक्षता घ्यावी, असं आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ किरण पाटील यांनी केलं आहे. उष्णलहरींच्या काळात पशुधनाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

दरम्यान, मराठवाड्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यात इतर ठिकाणी येत्या पंचवीस तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. ही शक्यता पाहता, शेतक-यांनी काढणी केलेल्या पिकांची योग्य पद्धतीनं साठवणूक करावी, असा सल्ला प्रशासनानं दिला आहे.

****

No comments:

Post a Comment