Friday, 24 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      बँकांनी विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचं अर्थमंत्र्यांचं आवाहन

·      देशात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा स्थिर असल्याची पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती

·      राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या सात खासदारांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

·      प्रवाशांशी मराठीतून संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्याचा सरकारचा प्रस्ताव

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेला वर्ष २०२२ चा जलभूषण पुरस्कार जाही

****

बँकांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. पुण्यात आज भारतीय स्टेट बँकेच्या महाराष्ट्र परिक्षेत्राच्या स्थानिक मुख्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. देशाच्या विकासात बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, तळागाळातल्या नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी सरकार एसबीआयच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलं.

सार्वजनिक क्षेत्रातल्या इतर बँकांच्या विलिनीकरणाचा कुठलाही मुद्दा सरकारच्या विचाराधीन नाही. यासंदर्भात उच्चस्तरीय बँकिंग समिती अभ्यास करेल, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. डिजिटायझेशन महत्वाचं असून, त्यामुळेच सर्वसमावेशकतेला चालना मिळते, पण त्याचसोबत आपण आपल्या ग्राहकांपासून दूर न जाता व्यवहारातील मानवी भाव जपायला हवा, असं त्या म्हणाल्या. ग्राहक आणि बँक कर्मचारी यांच्यात प्रत्यक्ष संवादाचं, संबंधाचं महत्त्व अधोरेखित करताना भारतीय स्टेट बँकेच्या प्रयत्नांचं अर्थमंत्र्यांनी कौतुक केलं.

****

पश्चिम आशियातल्या संकटामुळे आयातीवर परिणाम झाला असला तरी, एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा देशांतर्गत पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं आहे. त्या आज नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत बोलत होत्या. गॅस पुरवठा खंडित झाल्याचं कोणतेही वृत्त नाही आणि इंधनाच्या दरातही वाढ झालेली नाही, ग्राहकांनी घाबरून खरेदी करणं टाळावं आणि घरपोच एलपीजी वितरणासाठी ऑनलाइन बुकिंगचा वापर करावा, असं त्या म्हणाल्या.

बाईट – सुजाता शर्मा

 

व्यावसायिक एलपीजी पुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत झाला असून, पीएनजी जोडण्यांचा विस्तार सुरू आहे, तर कच्च्या तेलाचा पुरेसा साठा आणि तेल शुद्धीकरणाचं कामकाज अखंड ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करत असल्याचंही शर्मा यांनी सांगितलं.

****

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा, संदिप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह सात खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. या खासदारांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. राज्यसभेतले हरभजनसिंग, स्वाती मालिवाल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रम साहनी हे खासदार देखील आपल्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भातलं पत्र आज सकाळी राज्यसभेच्या सभापतींना दिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यसभेत पक्षाचे एकूण दहा खासदार असून, या सर्वांच्या एकत्र येण्याने दोन तृतीयांश संख्याबळ पूर्ण होत असून, भाजपमध्ये विलीन होणार असल्याचं चढ्ढा यांनी स्पष्ट केलं. गेल्या १५ वर्षांत पक्षासाठी काम केलं, पण आता पक्ष भ्रष्ट आणि तडजोड करणारा झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

****

पंचायत राज दिवस आज साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशभरातल्या लोकप्रतिनिधींचं हार्दिक अभिनंदन केलं आहे. जनसेवेसोबतच राष्ट्रसेवेसाठी असलेलं समर्पण सर्वांना प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव केला. ग्रामीण भारताच्या विकासात आणि लोकशाहीच्या बळकटीकरणात पंचायत राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पंचायत राज दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहे. पंचायत राज ही देशातील सर्वात जुनी व्यवस्था असून तो लोकशाहीचा मुलभूत स्तंभ असल्याचं शहा म्हणाले.

****

कृत्रिम बुद्धिमत्ता – एआय अधिक संवेदनशील आणि समावेशक बनवण्याबाबत चिंतन होणं आवश्यक असल्याचं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज नवोन्मेष केंद्राच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. नाविन्यपूर्ण कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आगामी काळात एआय आणि मशीन लर्निंग विविध क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार असून, त्यासोबत निर्माण होणाऱ्या आव्हानांकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. यावेळी “गव्हर्निंग एआय : कायदा, तंत्रज्ञान आणि समाज” या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटनही करण्यात आलं.

****

राज्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी मराठीतून संवाद साधण्यासाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यात वाहनचालकांसाठी मराठी भाषेचं व्यवहारिक ज्ञान अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित आहे. तसंच सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासलं जाईल. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचं ज्ञान दाखवणं बंधनकारक असेल. परिवहन आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मसुदा नियमांवर नागरिक, संघटना तसंच संबंधित घटकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सूचनांचा शासनाकडून विचार केला जाईल.

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी आणि सातवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ५९ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, प्रशासनानं नियोजनाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी याबाबत माहिती देताना सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलं.

****

नाशिक इथं उद्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी निमित्तानं गोदावरी ते नर्मदा जलयात्रा काढण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. ५०० किलोमीटरचा प्रवास करुन, मध्य प्रदेशातल्या महेश्वर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजना तसंच विकासकामांना गती देण्याची सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाला दिली आहे. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. यावेळी त्यांनी २७ विभागांचा आढावा घेतला. जलजीवन मिशन आणि पेयजल तसंच स्वच्छता विभागाच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असून, अनेक ठिकाणी नळ योजना केवळ कागदावरच असल्याकडे खासदार सोवनणे यांनी लक्ष वेधून, अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

****

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे २०२२ या वर्षासाठीचे जलभूषण पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. या संस्थेने मराठवाड्यातल्या चिते नदीचं पुनरुज्जीवन अभियान राबवलं, या कामामुळे नदी प्रवाहीत होऊन झालेल्या जलक्रांतीमुळे २७ गावं कायमची दुष्काळमुक्त झाली. या कामगिरीमुळे संस्थेचा गौरव करण्यात येणार आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या आनंदवाडीच्या आनंद उपसा जलसिंचन पाणी वापर सहकारी संस्थेला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रथम राज्यस्तरिय पुरस्कार जाहिर झाला आहे. यासाठी संस्थेनं या अभियानांतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नामांकन सादर केलं होतं. त्यानंतर राज्यस्तरीय समितीनं केलेल्या छाननीनंतर संस्थेचे सिंचन अभिलेख, अद्ययावत व्यवस्थापन आणि कामकाजातील पारदर्शकता पाहून या संस्थेची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

****

नांदेड शहरातल्या इस्लामपुरा भागात महापालिकेनं विकास कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं नांदेड वाघाळा महापालिकेला नोटिस पाठवली आहे. आयोगानं प्रसारमाध्यमांवरिल बातम्यांची दखल घेत पालिकेला दोन आठवड्यात विस्तृत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्देत आज रॉयल चँलेंजर्स बंगरुळू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरु इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

हवामान

परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात उद्या २५ तारखेला पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात हवामान कोरडं राहिल, असं विभागाने सांगितलं आहे.

****

No comments:

Post a Comment