Friday, 24 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत स्वातंत्र्यानंतर प्रथमच विक्रमी मतदान

·      राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ५० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद

·      पेट्रोल आणि डिझेल दर वाढीबाबतचे वृत्त दिशाभूल करणारे, पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण

·      मराठवाड्यात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू

आणि

·      लातूर, नांदेड, बीड, परभणीमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

****

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी काल विक्रमी मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये पहिल्या टप्प्यातल्या १५२ जागांसाठी सुमारे ९१ पूर्णांक सात आठ टक्के, तर तामिळनाडुमध्ये सर्व २३४ जागांसाठी ८४ पूर्णांक सहा नऊ टक्के मतदान झालं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं मतदान नोंदवल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं.

**

पुणे जिल्ह्यातल्या बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं. बारामती मध्ये ५७ पूर्णांक ४८, तर राहुरीत ५५ पूर्णांक ३१ टक्के मतदानाची नोंद झाली.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याच्या प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी स्पष्ट केलं आहे. इंधन दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढलेले असतानाही, सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्रा – महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉरमेशन, आणि बी आय एस ए जी-एन भास्काराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लीकेशन अँड जिओ-इन्फॉमेटिक्स, यांच्यात काल सामंजस्य करार झाला. भू-स्थानिक माहितीचं व्यवस्थापन आणि विश्लेषण करण्यासाठी विविध स्रोतांमधून आणि विविध स्वरूपांतील माहिती संकलित करून तिचं सखोल विश्लेषण केलं जाणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

****

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर विरोधकांनी केलेला जल्लोष  लज्जास्पद असल्याची टीका, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केली आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी अनेक दशकांपासून महिलांना त्यांच्या हक्कांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं, असा आरोप करत त्यांनी, या विधेयकासाठीचा सरकारचा लढा सुरुच राहील, असं सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – सी आर पाटील

****

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांपैकी एक जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची इच्छा आहे, असं पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे अनुभवी नेते असून त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला आणि सभागृहाला होईल, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला काँग्रेसनं आधीच पाठिंबा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

मराठवाड्यात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला.

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या तेलगाव फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकींवरील प्रत्येकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

जालना-देऊळगावराजा मार्गावरील गोंदेगाव फाटा इथं भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या दुसर्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. शत्रूगन फुलझाडे आणि यशवंत मिसाळ अशी मृतांची नावं असून, ते देऊळगावराजा इथले रहीवाशी होते.

नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात हडसनीजवळ परवा रात्री उशीरा दोन दुचाकी आणि चारचाकीत झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दुचाकीवरील मुलासह त्याच्या आई आणि आत्याचा समावेश आहे.

****

परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या सद्रक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्याने दाखल होणाऱ्या ३१ वाहनांचं लोकार्पण काल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल, असं त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, बोर्डीकर यांनी काल सेलू आणि जिंतूर तालुक्यातल्या विकास कामांचा आढावा घेतला. लोकहिताच्या कामांना विलंब होऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

****

बीड इथं नवीन पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल निवेदन दिलं. येत्या आठवड्यात या विषयावर मंत्रालयस्तरावर बैठक घेण्याचे निर्देश सामंत यांनी संबंधितांना दिले आहेत.

****

हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बळीराम पाटील कोटकर यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. कोटकर यांनी सुरुवातीला पोलीस पाटील म्हणून आणि नंतर सरपंच म्हणून काम केलं होतं. कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात कारकीर्द केली होती.

****

भागवताचार्य शेष नारायण महाराज गोंदीकर यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. शेष महाराज 'दादा' नावाने परिचित होते. संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि वेदांतातील अभ्यासामुळे त्यांना १९४८ मध्ये कलकत्ता विद्यापीठाने 'वेदांततीर्थ' ही पदवी बहाल केली होती. त्यांनी सुखताल, चारीधाम, नैनिताल, कुंभमेळा आदी ठिकाणी देशभर सुमारे २२०० भागवत सप्ताह करून धर्मप्रसाराचं कार्य केलं.

****

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या गुण सुधारणेसाठीच्या परीक्षेला १५ मे पासून सुरूवात होणार आहे. विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा विषयात कामगिरी सुधारायची असेल तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहेत. १५ एप्रिलला इयत्ता दहावीच्या नियमित परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

****

जालना महानगरपालिकेकडून काल जुन्या जालन्यातल्या घाटी रोड आणि नूतन वसाहत परिसरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण अठरा मांस विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारे अनधिकृत शेड हटवण्यात आले. संबंधित विक्रेत्यांना अतिक्रमण स्वत:हून काढण्यासाठी चोवीस तासांची मुदत देण्यात आली आहे.

****

नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी नांदेड इथं काल आयटीआय चौकात भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त मोठ्या संखेने उपस्थित होते.

****

महाराष्ट्र दिनानिमित्त येत्या एक मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त कार्यालयातल्या देवगिरी मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याचं नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि  पायाभूत सुविधा आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

****

जालना महानगरपालिकेतल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या सभागृहता काल कायदा आणि सुरक्षाविषयक एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं. पोक्सो कायदा, महिला सुरक्षा, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि सायबर गुन्हे या विषयांवर तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

जागतिक पुस्तक दिन काल साजरा करण्यात आला. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय विभागीय ग्रंथालय तसंच मॉडर्न संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते झालं.

****

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या ४३२ व्या जयंतीनिमित्त येत्या २७ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर इथं स्वराज्य संकल्प महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. भोंडवे पाटील प्रांगणावर होणारा हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

****

हवामान 

मराठवाड्यात लातूर, नांदेड, बीड, परभणीमध्ये पुढचे दोन दिवस विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर जिल्ह्यात हीच स्थिती असेल. मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणात पुढचे दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे.

****

No comments:

Post a Comment