Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २४ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
आज साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय
पंचायत राज दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी देशातील जनता तसंच पंचायत
राजमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांना
शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण स्तरावरील पंचायत
राज यंत्रणा स्थानिकांना सत्तेत सहभागी करुन घेत विकास साधत असल्याचं उपराष्ट्रपतींनी
म्हटलं आहे. ग्रामीण भागात आत्मनिर्भरता आणि विकासासाठी स्थानिक पंचायतींचं मोलाचं
कार्य असून देशाच्या विकासातही मोठा वाटा असल्याचं उपराष्ट्रपतींनी सामाजिक माध्यामावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
मुंबईतील रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक चालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभागानं विशेष पुढाकार घेतला आहे. मुंबई मराठी साहित्य संघ आणि
कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या सहकार्यानं चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी
विनामूल्य प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी तज्ज्ञ साहित्यिकांमार्फत लवकरच
अभ्यासक्रम तयार केला जाणार असून, कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या
७२ शाखांमधून तर मुंबई मराठी साहित्य संघ ऑनलाईन माध्यमातून हे वर्ग चालवणार आहे. वाहनचालकांमध्ये
मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा
मुख्य उद्देश आहे.
****
राज्यात दुग्धजन्य पदार्थांची
गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ-‘एनडीडीबी’च्या सहकार्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता- ‘एआय’वर आधारित यंत्रणा विकसित करण्याचे
निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल आयोजित ‘एनडीडीबी’
आणि 'महानंद' प्रकल्पाच्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. दुधातील भेसळ रोखण्यासाठी ‘एनडीडीबी’ने खास 'टेस्ट स्ट्रिप' विकसित केली असून, पुढील सहा महिन्यांत ती पूर्णपणे कार्यान्वित होईल. ही स्ट्रिप युरियासारखे घटक ओळखण्यास सक्षम आहे. जास्तीत जास्त गावे
आणि उत्पादकांना सहकारी दूध व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामुळे
शेतकऱ्यांचा नफा वाढण्यासोबतच ग्राहकांना दर्जेदार दूध मिळण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
****
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे स्वराज्य संकल्पक
शहाजीराजे भोसले यांच्या ४३२ व्या जयंतीनिमित्त येत्या २७ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर
इथं स्वराज्य संकल्प महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. भोंडवे पाटील प्रांगणावर सायंकाळी
साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे
संचालक बिभीषण चवरे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी
रुग्णालयात आज देहदान केलेल्या नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ‘स्मृती
सुमन सोहळा’ हा विशेष कृतज्ञता कार्यक्रम पार
पडला. शरीररचनाशास्त्र विभागातर्फे
आयोजित या कार्यक्रमात देहदान करणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा विशेष
सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता
डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. अर्चना कल्याणकर आदी उपस्थित
होते. "देहदान हा शेवट नसून ती एका नव्या कार्याची सुरुवात आहे, त्यातून भावी डॉक्टरांच्या ज्ञानाची पहाट उजाडते." असं न्यायमूर्ती विभा
कंकणवाडी यांनी यावेळी म्हटलं. या सोहळ्याला
देहदानी कुटुंबातील सदस्य आणि वैद्यकीय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
भंडारा जिल्ह्यात वऱ्हाडाचं
वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले. हा अपघात काल रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. मृतांमध्ये
चार महिलांचा समावेश असून नवरदेवाच्या मामा-मामीचाही समावेश आहे. श्वेता पुरुषोत्तम
नगरे, प्रभाकर चाचेरकर, मंत्री प्रभाकर
चाचेरकर, दुर्गा देवराम नगरे, नैना देवराम
नगरे अशी मृतांची नाव आहेत. वऱ्हाडाचं वाहन अनुचाळकडे जाताना सौंदड पुनर्वसन इथं पवनी
मार्गावर विरुद्ध दिशेनं येणारा ट्रक वऱ्हाडाच्या वाहनाला धडकल्यानं ही दुर्घटना घडली.
****
हवामान
राज्यात उन्हाचा कडाका वाढला
असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचिंत वाढ
झाली आहे. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी, तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला तर रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात काल अवकाळी
पावसाने हजेरी लावली.
****
इजिप्तच्या काहिरा इथं सुरु
असलेल्या आईएसएसएस- जूनियर नेमबाजी विश्वकप स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकांसह एकुण
नऊ पदक जिंकत पदक तालिकेत पहिलं स्थान प्राप्त केलं आहे. प्राची गायकवाड़नं काल जूनियर महिला ५० मीटर राइफल
स्पर्थेच्या अंतिम सामन्यात ३५४ पुर्णांक ६ शतांश अंकांसह सुवर्ण पदक जिंकलं. या अगोदर
शिवा नरवालनं मंगळवारी पुरुषांच्या १० मीटर एयर पिस्टल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं
होते.
****
No comments:
Post a Comment