Sunday, 26 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 26 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

आज जगात तणाव-संघर्ष असतांना भगवान गौतम बुद्धांचे विचार अधिकच महत्त्वाचे आणि प्रासंगिक असून शांततेची सुरुवात आपल्या आतूनच सुरू होते आणि स्वतःवर विजय मिळवणं हाच सर्वात मोठा विजय असल्याचा त्यांनी दिलेला जीवन संदेश, भविष्यासाठीही आवश्यक असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या १३३व्या भागात पंतप्रधान आज बोलत होते.

देशात सध्या अतिशय महत्त्वाची मोहीम अर्थात जगातील सर्वात मोठ्या जनगणनेबाबत प्रत्येक भारतीयाला माहित असणं गरजेचं असल्याचं मोदींनी नमूद केलं. यातील सर्व माहिती थेट डिजिटल माध्यमातून नोंदवली जात असून आपण आपली माहिती आपल्या वेळेनुसार यात भरु शकतो त्याद्वारे प्राप्त होणारा ओळख क्रमांक घरोघरी येणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांकडील मोबाईल ॲपवर नोंदवून माहितीची खातरजमा होईल असं ते म्हणाले. हे फक्त सरकारी काम नसून सर्वांचा सहभाग खूप महत्त्वाचा असून पंतप्रधानांनी जनगणना यशस्वी करण्याचं आवाहन केलं. भारतानं विज्ञानाला नेहमीच देशाच्या प्रगतीशी जोडलं असून आपले शास्त्रज्ञ नागरी अणू कार्यक्रम पुढं नेत असल्यानं याद्वारे राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान देत आहेत, असं ते म्हणाले.

तामिळनाडूच्या कल्पक्कमच्या अणू प्रकल्पात पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान असलेल्या संयंत्रणेतील फास्ट ब्रीडर रिॲक्टरनं क्रिटिकॅलिटीचा टप्पा साध्य केला आहे अर्थातच संबंधित कार्यप्रणाली आता ऑपरेशन फेज म्हणजेच कार्यन्वयनाच्या टप्प्यात आली असल्यानं भारताच्या अणू ऊर्जा उत्पादन प्रवासातील हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे असंही मोदी म्हणाले. पवन-शक्ती भारताच्या विकासाची नवीन गाथा लिहित असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, राजस्थान ही राज्ये यात आपला ठसा उमटवत आहेत असं सांगून आपल्याला वीज वाचवत स्वच्छ ऊर्जा –क्लीन एनर्जीचा स्वीकार करायचा आहे, असं ते म्हणाले.

निसर्ग संवर्धन, मानव–वन्यजीव सहयोग, लुप्त होत असलेल्या जैव प्रजातींचं पुनरुज्जीवन या अनुषंगानं बोलतांना ज्यावेळी आपण निसर्गाचा विचार करतो, त्याचा आदर करतो आणि त्याच्या सोबत वाटचाल करतो, तेव्हा शादायक बदल स्पष्टपणे दिसून येतो असंही मोदी म्हणाले. देशातलं चीज जगभरात आपले स्थान निर्माण करत आहे असं त्यांनी नमूद केलं जम्मू काश्मीरचं कलारी चीज तसंच सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील छुरपी आणि महाराष्ट्र- गुजरातमधील टोपली नु पनीर याचा मोदी यांनी उल्लेख केला.

शाळकरी मुलांच्या सुट्ट्यांचा काळ सुरु होत असून त्यांनी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासह काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करुन आपल्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आजच्या मन की बातमध्ये केलं.

****

देशभरात पेट्रोलियम पदार्थ आणि एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती सरकारनं दिली आहेत. घरगुती ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा प्राधान्यानं करण्यात येत आहे, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच, कोणत्याही वितरक केंद्रावर गॅस संपल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यातला बहुतांश भाग तीव्र उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहे. राज्यात सरासरी तापमान ३२ ते ४२ अंश सेल्सियस दरम्यान आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांत उष्णतेची तीव्रता कायम आहे. हवामान विभागानं ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेमुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे. प्रशासनानं नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना चेन्नईमध्ये, आणि लखनौ सुपर जायन्ट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना लखनऊमध्ये होणार आहे. काल पंजाब किंग्जनं दिल्ली कॅपीटल्सवर सहा गडी राखून विजय मिळवताना २६४ धावांचं मोठं लक्ष्य ओलांडलं. टीट्वेंटी क्रिकेटमधे आतापर्यंत साधण्यात आलेलं हे सर्वात मोठं आव्हान आहे. कालच्या अन्य सामन्यात सनराईजर्स हैदराबादनं २२८ धावांचं उद्दीष्ट साध्य करत राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला.

****

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना बियाणं, खतं आणि कीटकनाशकं यांची कोणतीही कमतरता भासू नये, तसंच बनावट बियाणं, खतं आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खरीप पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा गीना यांनी हे निर्देश दिले.

****

No comments:

Post a Comment