Monday, 27 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

·      शिक्षण तसंच रोजगारासाठी उपयुक्त 'महाचतुर एआय चॅटबॉटचं लोकार्पण

·      रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय तुर्तास स्थगित

·      महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी झाल्यास कठोर कारवाईचे निर्देश

आणि

·      मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दिल्लीत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. येत्या पाच वर्षांच्या काळात द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचं या कराराचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत येत्या १५ वर्षात न्यूझीलंड भारतात २० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करेल, तसंच पाच हजार भारतीयांना न्यूझीलंडमध्ये रोजगारासाठी तात्पुरता विसा मिळेल, त्यांना तीन वर्षांसाठी तिथे राहता येईल.

या करारामुळे न्यूझीलंडहून भारतात आयात होणाऱ्या ५४ टक्क्यांहून अधिक वस्तू करमुक्त होतील. याशिवाय सफरचंद, किवी, मध यासारख्या वस्तूंच्या आयातीवर सवलत मिळेल. लोह, तसंच भंगारातल्या ॲल्युमिनियम सारख्या वस्तूंवर आकारला जाणार कर १० वर्षांसाठी माफ केला जाईल. यामुळे दोन्ही देशातला व्यापार दुप्पट होईल, अशी आशा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल

****

महाचतुर एआय चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या या ‘चॅटबॅाट’चं आज मुंबईत लोकार्पण तसंच सामंजस्य करार पार पडले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा हा चॅटबॉट म्हणजे, राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच अभिनव उपक्रम आहे.

****

राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणे सक्तीचे करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत टॅक्सी-रिक्षा चालकांच्या विविध संघटनांसोबत बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठीतून बोलण्याला कुणाचीही हरकत नाही मात्र यासाठी, मुदत वाढवून देण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या निर्णयाला मुदतवाढ देण्याचा निर्णय उद्या घेतला जाईल अशी घोषणा सरनाईक यांनी केली. कुणाचाही रोजगार बुडणार नाही, असं सांगतांना, सरनाईक म्हणाले -

बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावर सरकार आजही ठाम असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. तसंच महाराष्ट्रात काम करायचं असेल तर मराठी यायलाच हवी याचा पुनरूच्चार सरनाईक यांनी केला.

****

आम आदमी पक्षाच्या ७ खासदारांचा भाजपामध्ये प्रवेशाचा अर्ज राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळं राज्यसभेतल्या भाजपाच्या खासदारांची संख्या आता ११३ झाली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी आज सामाजिक माध्यमांवरून ही माहिती दिली. राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजित साहनी, स्वाती मालिवाल आणि राजींदर गुप्ता यांनी शुक्रवारी भाजपा प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता. आम आदमी पक्षाने या पक्षांतरावर आक्षेप घेऊन सदर खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान, राज्यसभेत आम आदमी पक्षाचे तीन खासदार राहिले आहेत

****

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६ साठी नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले यासाठी अर्ज करू शकतात. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. ३१ जुलै २०२६ पर्यंत awards.gov.in या संकेतस्थळावर या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.

****

राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्यास त्याची चौकशी करून कठोर कारवाईचे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. पुण्यातल्या आय.एल.एस. विधी महाविद्यालय प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे निर्देश दिले. सदर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बेकायदेशीर शुल्क वसुलीप्रकरणी शासनानं नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण आणि महाविद्यालयांमधील शुल्क निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकार योग्य उपाययोजना करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

राज्यात अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. विदर्भात अकोला इथं आज सर्वाधिक ४६ पूर्णांक नऊ तर अमरावती इथं ४६ पूर्णांक आठ अंश सेल्सीअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. तर नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, वाशिम, वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात सरासरी ४४ अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक चार, परभणी ४३ पूर्णांक पाच, तर बीड इथं ४२ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली.

हवामान खात्यानं आज आणि उद्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, बुलढाणा आणि चंद्रपूर इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, उष्णतेच्या लाटेचा प्रतिकार करण्याबाबत यंत्रणांनी जनजागृती करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. आरोग्य विभागाने सर्वस्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये शीत कक्ष उभारावेत, तसंच सर्व विभागांनी समन्वयाने संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही गौडा यांनी दिले. पूरग्रस्त तसंच पूरप्रवण गावांमधील रस्ते आणि पुलांची तपासणी, जलशुद्धीकरण तसंच साथरोग प्रतिबंधक औषधं, अत्यावश्यक अन्नधान्य साठा इत्यादीची व्यवस्था करावी, प्रत्येक विभागाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा येत्या १५ मे पर्यंत पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.

****

राज्यातल्या कृषी साहित्य विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज बंद पाळला. खत कंपन्यांचं बियाणं बोगस निघाल्यास कृषी विक्रेत्याला जबाबदार धरलं जातं, हा प्रकार थांबवावा या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला. बीड शहरातील कृषी साहित्य विक्रेत्यांनीही या बंदला प्रतिसाद देत आपली दुकानं बंद ठेवली.

****

धाराशिव तसंच लातूर इथं परवा बुधवारी पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत हा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या वतीनं शिका आणि कमवायोजनेअंतर्गत उमेदवारांना जागतिक दर्जाचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन वर्षांच्या या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विद्यावेतनही दिलं जाणार आहे. उमेदवारांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केंद्रातर्फे करण्यात आलं आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख तथा भाषा संकुल संचालक प्राध्यापक डॉ.पृथ्वीराज तौर यांना फ्रेंडस ऑफ नवासाहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल रायटर्स असोसिएशन ऑफ साऊथ आफ्रिका या शिखर साहित्य संस्थेच्यावतीनं हा पुरस्कार देण्यात येतो.

****

बीड जिल्ह्यात परळी, माजलगाव, धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर पीक विम्यासाठी आंदोलन केलं. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा लवकरात लवकर देण्यात यावा, पीक विम्याचे जुने निकष पूर्ववत करण्यात यावे, कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करण्यात यावा, यासह इतर मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या.

****

मुंबईत आज पहाटे मरिन ड्राईव इथं झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात जखमी झालेला दुचाकीस्वार, त्याच्या मागे बसलेली महिला तसंच पादचारी या तिघांनाही रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

****

No comments:

Post a Comment