Tuesday, 28 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

सिक्कीम हे राज्य पूर्वेकडचा स्वर्ग असून, पर्यटकांनी इथे येऊन इथली ऑर्किड फुलं पहावीत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सिक्किमच्या पन्नासाव्या स्थापना दिन समारंभाच्या समारोप कार्यक्रमात ते जनतेला संबोधित करत होते. या भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते या राज्यातल्या चार हजार कोटी रुपयांच्या अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि शिलान्यास करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी ईशान्य विभागासाठी सहा क्रिकेट अकादमींची घोषणा केली. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी या विकास प्रकल्पांची सुरुवात केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले तसंच विकसित भारत संकल्पनेत योगदान देण्यासाठी सिक्कीम राज्य वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली.

**

दरम्यान, पंतप्रधान आजपासून उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसी इथं महिला संमेलनाला ते उपस्थित राहतील, यावेळी सहा हजार ३५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल. काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन पंतप्रधान दर्शन आणि पूजा करतील. बनारस–पुणे आणि अयोध्या–मुंबई या दोन नव्या अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

****

येत्या काळात देशाच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, या पार्श्वभूमीवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सज्जता अधिक दृढ करावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधांमध्ये उष्माघात व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवणं, पूर्व सूचना प्रणाली सक्षम करणं आणि उष्माघाताच्या घटनांची नोंद संबंधित पोर्टलवर करणं आवश्यक असल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. अति उष्णतेचा आरोग्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी तसंच उष्णतेशी संबंधित आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी तातडीचं नियोजन आणि समन्वित कृती अत्यंत महत्त्वाची असल्यावर सचिवांनी भर दिला आहे.

****

पुणे विभागात मुंबई–सोलापूर वंदे भारत रेल्वेचा एक डबा काल रुळावरून घसरल्यानंतर आजची मुंबई–नांदेड वंदे भारत रेल्वे रद्द करण्यात आली आहे. रेल्वे डबे उपलब्ध नसल्यानं ही गाडी रद्द केल्याचं रेल्वेनं कळवलं आहे.

**

दरम्यान, मुंबई –अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या डब्यांची  संख्या सोळावरून वीसपर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. डबे वाढवण्‍याचा हा बदल आजपासून अंमलात येत आहे. या गाडीच्या वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर कार' आणि एका 'एक्झिक्युटिव्ह क्लास कोच' डब्याचा समावेश आहे.

****

जनगणना २०२७ प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना पार पडणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी आणि गृहनिर्माण जनगणना हा १६ मे ते १५ जून २०२६ दरम्यान राबवण्यात येणार आहे. त्याआधी स्वयं-गणना टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. नागरिकांसाठी विशेष मोबाईल अॅप “Census 2027-HLO” तसंच स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील ‘त्रिमूर्ती प्रांगण’ परिसरात जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जनगणना संदर्भातल्या बॅनर्सचं प्रदर्शन आणि माहितीपर साहित्याद्वारे नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात येणार आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये जनगणनेबाबत जागरूकता निर्माण करणं आणि त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणं हा आहे.

****

धाराशिव तसंच लातूर इथं उद्या बुधवारी पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत हा मेळावा घेण्यात येत आहे. धाराशिव इथल्या मेळाव्यात टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या वतीनं "शिका आणि कमवा" योजनेअंतर्गत उमेदवारांना जागतिक दर्जाचं निवासी तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. चंदिगढ इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

यंदाची स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती चषक स्पर्धा येत्या जुलै महिन्यामध्ये बीड इथे होणार आहे.

****

No comments:

Post a Comment