Thursday, 30 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्य सरकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढणार

·      देशभरात घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत, पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती

·      पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दोन्ही टप्प्यांत एकूण ९२ टक्के मतदान

·      विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी

आणि

·      वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ

****

राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ काल जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत, राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत माहिती देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाअंतर्गत राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असून, दीड लाखांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यभरात सहा एआय उत्कृष्टता केंद्रांची स्थापन होणार असून, पाच एआय इनोव्हेशन शहरांची स्थापना करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या इतर निर्णयांबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

बाईट- मंत्रिमंडळ

 

‘‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्याचा निर्णयावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

राज्यातल्या दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ, परीक्षा मंडळ, संस्थेला भरावे लागणाऱ्या विविध शुल्कांसह ग्रंथालय, नियतकालिकांसाठी, वैद्यकीय तपासणीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.

स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बारा आणि चोवीस वर्षांच्या नियमित सेवेनंतरची दोन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करायलाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यात तीनशे कोटी वृक्ष लागवडीकरता महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असून हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातल्या हरित उर्जेचा वापर वाढवण्यासाठी १२ हजार ३०३ कोटी रुपयांच्या मॅजेस्टिक योजनेलाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.’’

****

पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचं, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. काल नवी दिल्ली इथं आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. देशभरात व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा ७० टक्क्यांपर्यंत पूर्ववत झाला असून, ऑनलाइन एलपीजी बुकिंग आणि डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडवर आधारित, घरगुती एलपीजीचा पुरवठाही आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पाच किलोच्या सिलिंडरचा पुरवठा जवळपास दुप्पट झाला असून, सुमारे ७३ हजार सिलिंडर काल विकले गेल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातही सुमारे ९१ पूर्णांक ६६ टक्के मतदान झालं. राज्यात दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून एकूण ९२ टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालसह, आसाम, केरळ, तमिळनाडू, आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची येत्या चार तारखेला मतमोजणी होणार आहे.

****

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी काल ही घोषणा केली. यासंदर्भात दानवे यांनी आकाशवाणीशी बोलतांना, आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या. ते म्हणाले…

बाईट- शिवसेना नेते अंबादास दानवे

 

दुसरीकडे काँग्रेसही या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलं आहे.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत नावाची घोषणा करण्यात येईल आणि आज उमेदवारी अर्ज भरला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. भाजपने या निवडणुकीसाठी आपले पाच उमेदवार यापूर्वीच जाहीर केले आहेत.

१३ मे ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जण निवृत्त होत आहेत. त्याआधी १२ मे ला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगच्या सरपंचपदी स्वरुपानंद देशमुख यांचा विजय झाला. देशमुख यांनी, दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव केला. संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून निघृण हत्या झाल्यानंतर हे सरपंचपद रिक्त होतं.

****

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींपैकी एक असलेल्या शरद कळस्करला मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि आर. आर. भोसले यांच्या पीठानं हा आदेश दिला. ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात नरेंद्र दाभोळकर, यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती.

****

नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि लातूर इथली दयानंद शिक्षण संस्था यांच्यामध्ये काल शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशानं शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धतीची देवाण-घेवाण होणार आहे. या कराराद्वारे अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी सांगितलं.

****

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवर बेकायदेशीर नळ जोडणी करणाऱ्यांविरोधात जालना महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई केली. अंबड ते जालना या मुख्य जलवाहिनीवरील ‘एअर व्हॉल्व्ह’मधून अनधिकृतपणे पाणी उपसा होत असलेल्या एकूण ६८ नळ जोडण्या तोडण्यात आल्या. शहरात आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असताना, काही ठिकाणी २४ तास बेकायदेशीररीत्या पाणी वापरलं जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. अशा प्रकारांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

****

पीएम-सूर्यघर योजनेला गती देऊन सौर ग्राहकांना तत्पर सेवा द्या, असे निर्देश महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सूर्यघर योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते.

****

लातूर शहरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना आमदार अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचा एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवावा, अशा सूचनाही देशमुख यांनी केल्या.

****

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या रत्नाळी इथं विहिरीत पोहत असताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू झाला. कृष्णा माडगीनवाड आणि अविनाश तोंडाकुरवाड अशी मृतांची नावं आहेत.

****

संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधन असलेल्या तसंच सिंचनाची सोय असलेल्या लाभधारकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणं वितरीत करण्यात येणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी ५ मे पर्यंत आपले अर्ज आपल्या गावातल्या पशुवैद्यकिय संस्थेकडे सादर करावेत, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं केलं आहे.

****

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच ७२ रुग्णांची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १४ रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये सहा, गडचिरोली आणि रत्नागिरी इथं प्रत्येकी चार, तर अहिल्यानगरमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली. रायगड, पुणे, पालघर, जालना, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि धुळे इथं प्रत्येकी दोन, तर अमरावती, भंडारा, जळगाव, परभणी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत उष्माघात सदृश लक्षणं असलेल्या १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

****

दरम्यान, राज्यात काल कोकणात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली.

काल सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४२ पूर्णांक पाच, तर छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसात मेघगर्जनेसह वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात इतरत्र सर्वत्र हवामान कोरडं राहील.

****

No comments:

Post a Comment