Thursday, 30 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

जनगणना २०२७ कार्यक्रमासाठी जनतेनं सक्रिय सहभाग घेत पूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन जनगणना कार्यसंचालन आणि नागरिक नोंदणी विभागाच्या संचालक निरुपमा डांगे यांनी केलं आहे. जनगणनेतून मिळणारी माहिती शासनाच्या विविध योजना आणि धोरण निर्मितीसाठी उपयोगी ठरणार असून, पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोळा मे ते चौदा जून दरम्यान जेव्हा प्रगणक घरोघरी येतील तेव्हा त्यांना अचूक माहिती द्यावी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना याबद्दल जागरूक करावं, जेव्हा एक मे ते पंधरा मे मध्ये स्वगणना प्रक्रियेतही सहकार्य करण्याचं आवाहन डांगे यांनी केलं.

****

भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष उद्यापासून लेहमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. हे पवित्र अवशेष भारतीय हवाई दलाच्या एका विशेष विमानानं काल लडाखमधल्या लेह इथं आणण्यात आले. उद्याच्या बुद्धपौर्णिमेपासून ते १५ मे पर्यंत सामान्य नागरीकांच्या दर्शनासाठी हे अवशेष उपलब्ध असतील. लडाख पोलिसांनी या पवित्र अवशेषांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या स्वागतानिमित्त विविध धार्मिक विधी पार पडले.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौर्यावर आहेत. यादरम्यान ते भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं दर्शन घेणार आहेत.

****

जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून श्रीनगर–कटरा वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्तारित सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज होणार आहे. कटऱ्यापासून आता जम्मू तवीपर्यंत या सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचा शुभारंभ केला होता. ही गाडी आता २० डब्यांची झाल्याने प्रवाशांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून या सेवेचा अधिकाधिक लाभ होणार आहे.

****

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या विशेष प्राणीगणना आयोजित करण्यात आली आहे. याअंतर्गत ताडोबाच्या बफर क्षेत्रातल्या ५७ लोखंडी मचाणांवर दोन प्रगणक रात्रभर बसून वन्यप्राण्यांची नोंद करणार असून, कोअर क्षेत्रात वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गणना करतील. या उपक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली असून प्रति व्यक्ती साडेतीन हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे.

****

अंमली पदार्थ नियंत्रण संस्थेनं दाऊदचा हस्तक मोहम्मद सलीम डोला याला दिल्लीहून मुंबईत आणलं असून, आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. डोला हा अनेक वर्षांपासून फरार होता आणि त्याचे दाऊद इब्राहिमशी जवळचे संबंध असल्याचे आरोप आहेत.

****

शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी कृषी निविष्ठा विक्रेते गेल्या २७ एप्रिल पासून बेमुदत संपावर गेले होते. त्यांच्या मागण्या संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हा संप स्थगित करण्यात आल्याची माहती माफदा संघटनेच्या वतीने देण्यात आली.

****

धुळे शहर विधानसभा मतदारयादीचं सखोल पुनरीक्षणाच्या पूर्वतयारीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या १८ केंद्रस्तरीय बीएलओ अधिकाऱ्यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय तीस टक्क्यांपेक्षा कमी काम पूर्ण करुन देणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांचं १५ दिवसांचं वेतन कापण्याचे आदेशही दिले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथलं सिडको वाळूज महानगर परिसर आता छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित झालं असून यासाठी विकास आराखड्यासह निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगर विकास विभागाकडे त्वरीत सादर करावा, असे निर्देश नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिले. यासंदर्भात मुंबईत काल असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा तातडीनं विकसित करणं आवश्यक असल्याचं गुप्ता म्हणाले. तसचं या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांनी सातत्यानं पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

****

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच ७२ रुग्णांची नोंद झाली.

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १४ रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये सहा, गडचिरोली आणि रत्नागिरी इथं प्रत्येकी चार, तर अहिल्यानगरमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत उष्माघात सदृश लक्षणं असलेल्या १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

****

No comments:

Post a Comment